Friday, April 26, 2024
Homeनगरतरुणांनी एकत्र येऊन जीवन उत्कर्षाचे तत्त्व पाळावे

तरुणांनी एकत्र येऊन जीवन उत्कर्षाचे तत्त्व पाळावे

निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर : शिवजयंतीनिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने कीर्तनाचे आयोजन

कोपरगाव (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजांवर लहान वयात जिजाऊंनी संस्कार केले म्हणून ते घडले, तसे तरुणांनी एकत्र येऊन जीवन उत्कर्षाचे तत्त्व पाळावे, व्यवसायाकडे वळावे, प्रामाणिकपणे प्रयत्न करावे त्यात यश आहे आणि तोच शिवजयंती साजरी करण्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केले.

- Advertisement -

कोपरगावात 1 मार्च रोजी त्यांच्या कीर्तनाला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली. तोंडावर गोड बोलणारी माणसं आपला घात करत असतात. जोपर्यंत गरिबी आहे तोपर्यंत आपल्याला शत्रू नाही असेही ते म्हणाले.

कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी शिवजयंतीचे औचित्य साधन संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आजचा युवक दिशा आणि दशा या विषयावर आयोजित कीर्तनप्रसंगी ते बोलत होते. विवेक कोल्हे यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या पाच वर्षात केलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास इंदोरीकर महाराजांनी पुष्पहार अर्पण केला. 17 वर्षे भारतीय लष्कर सेवेतून संवत्सरचे नितीन कुहिले सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा इंदोरीकर महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कोपरगाव तालुका महिला स्वयंसाहाय्यता बचत गटाच्या अध्यक्ष रेणुका कोल्हे, उपनगराध्यक्ष योगेश बागुल, विजय वाजे, अप्पासाहेब दवंगे, विजय आढाव, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक आदींनी त्यांचे स्वागत केले.

निवृत्ती महाराज इंदोरीकर पुढे म्हणाले की, संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आजवर विविध सामाजिक कामे केली आहेत. त्यांना मोठ्यांचे आशीर्वाद आहेत. पूर्वीचा आणि आताचा काळ बदलला. भांडणात आपलेच नुकसान आहे. युवकांनी नम्र व्हावे, पैसा जपून वापरावा, विवाहात कर्ज काढून हौस मौज करू नका, फेटे, फटाके, बँडबाजा आदी वायफळ गोष्टींवर पैसा खर्च न करता त्यातून गरिबांना मदत करा.

मानपानापायी आपल्याला भिकारी व्हायची वेळ आली आहे. ही धरती, हा देश येथील माती, भारतीय लष्कर आपली माता आहे त्याचा सन्मान करा. ज्यांनी देशासाठी बलिदान केले त्यांचा स्वाभिमान बाळगा. कोपरगावकर नशीबवान व भाग्यवान आहेत. गोदावरी नदीकाठी तुमचा जन्म झाला आहे. गोदावरी नदी ही माता आहे. तिचे पावित्र्य आपणच राखले पाहिजे.

अंत्यविधीची राख नदीत विसर्जित न करता पर्यावरण संतुलन राखण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावेत. त्याच राखेवर झाडे लावा तेच तुम्हाला सावली देतील. देव कधीही संपत्ती देत नाही, कष्ट करून ती मिळवावी लागते. ज्ञान असल्याशिवाय जगात आपल्याला किंमत नाही म्हणून ज्या तरुणांना अभ्यास, कीर्तन, शाळा, गायन, स्पर्धा परीक्षा, व्यवसाय आदींची आवड आहे तेथे प्रामाणिक प्रयत्न केल्यास त्यात यश तुम्हाला निश्चित गवसणी घालेल. हृदयात देव आहे त्याची साधना करा, लाकडात अग्नी आहे घर्षण करा, दुधात लोणी आणि उसात साखर आहे क्रिया करा ते ते तुम्हाला मिळेल. संताशिवाय जग कुणी सुधारू शकत नाही.

कोपरगावकरांनी इंदोरीकर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दीड तासाच्या कीर्तनात भाविकांना पोट भरून हसविले आणि देवाचे दृष्टांत दिले. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर व पोलिसांनी मोठा बंदोबस्त दिला होता. विविध वाहिन्यांवर त्यांच्यावर होत असलेल्या टीकेमुळे त्यांनी सुरुवातीपासूनच कॅमेरे बंद ठेवण्याची सूचना केली होती. कोकमठाणचे अरुण भैय्या पगारे यांच्या साई स्वर नादब्रह्म कलाकारांनी व पंचक्रोशीतील सर्व गावच्या भजनी मंडळांनी कीर्तनास टाळ साथ दिली. इंदोरीकर महाराज हे स्वतः व्यासपीठावर टाळकर्‍यांना प्रोत्साहन देत होते, त्यांच्या लयबद्ध नाचण्यावर तरुणाई जाम खुश होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या