Type to search

Featured नाशिक

शालेय दप्तरात चुकीची दुरुस्ती करता येणार

Share

नाशिक । प्रतिनिधी

विद्यार्थ्याच्या शालेय दप्तरात अनवधानाने झालेल्या चुकीची दुरुस्ती आता कधीही करता येणार आहे. या निर्णयामुळे आता शाळा सोडलेले विद्यार्थीही आपल्या शालेय प्रमाणपत्रावर झालेली चूक दुरूस्त करू शकणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न वराळे, न्या. पुखराज बोरा व न्या. अविनाश घारोटे यांच्या त्रिसदस्यीय पीठाने हा निर्णय दिला आहे.

शालेय दप्तरात झालेल्या साधारण चुकांमुळे आता अनेक विद्यार्थ्यांना नोकरी व्यवसायापासून मुकावे लागणार नाही. जनाबाई हिंमतराव ठाकूर (रा. अमळनेर) यांनी आपल्या शाळा सोडण्याच्या प्रमाणपत्रात दुरुस्ती करून मिळावी यासाठी जळगाव जि. प. माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्‍यांकडे अर्ज केला होता. शिक्षणाधिकारी यांनी जनाबाई यांचा अर्ज फेटाळत अशा प्रकारची दुरूस्ती करता येत नसल्याचे स्पष्ट केले होते. माध्यमिक शाळा संहिता नियम 26.3 व 26.4 अन्वये फक्त शाळेमध्ये सद्यस्थितीत शिक्षण घेत असलेल्या पाल्याच्या शालेय रेकॉर्डमध्ये दुरूस्ती करता येते. एकदा शाळा सोडल्यानंतर दुरुस्ती करता येत नाही असे शासनाचे म्हणणे होते.

सुनावणीप्रसंगी खंडपीठाच्या निदर्शनास औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठाचे निर्णय आणून देण्यात आले. औरंगाबाद खंडपीठाच्या तीन निर्णयात दुरुस्ती करता येते असे म्हटलेले असून नागपूर खंडपीठाच्या एका निर्णयात दुरुस्ती करता येत नसल्याचे म्हटलेले आहे. खंडपीठाच्या निर्णयामधील विसंगती लक्षात घेता प्रकरण त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणीस ठेवण्यात आले. औरंगाबाद खंडपीठाचे यासंबंधीचे निर्णय व्यापकता दर्शविणारे असून नागपूर खंडपीठाचा निर्णय संकुचित वाटतो असे त्रिसदस्यीय पीठाने स्पष्ट केले. त्रिसदस्यीय पीठाने चारही निर्णयाबद्दल असमर्थता दर्शविली. शालेय रेकॉर्डमध्ये नजरचुकीने अथवा अनवधानाने चूक झाली असेल तर ती कधीही दुरुस्त करता येईल असा निर्णय दिला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!