हुंडेकरी अपहरणातील मास्टरमाइंड अजहर अटकेत

file photo
file photo

एलसीबीची मध्यप्रदेशात कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगरचे प्रतिष्ठीत उद्योजक अब्दुल करीम सय्यद (हुंडेकरी) याच्या अपहरण प्रकरणातील मास्टरमाइंड आरोपी अजहर मंजूर शेख याला नगर पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली. वेषांतर करत जीव धोक्यात घालून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अजहरच्या मुसक्या आवळल्या.

18 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटेच्या वेळेस शहरातील नामांकित उद्योजक अब्दुल करीम हुंडेकरी यांचे अपहरण करण्यात आले होते. 25 लाखाच्या खंडणीसाठी त्यांचे अपहरण केल्याची फिर्याद सय्यद अफरोज यांनी पोलिसांत दिली. या अपहरण प्रकरणात एलसीबी पोलिसांनी निहाल उर्फ बाबा मुशरफ शेख याला जालन्यातून एका अल्पवयीन साथीदारासह अटक केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेला अजहर शेख हा पोलिसांना चकवा देत पळाला होता. अटकेतील दोघांकडे केलेल्या चौकशीत या अपहरणामागे अजहर मंजूर शेख हा मास्टर माईंड असल्याचे समोर आले. तेव्हापासून एलसीबी पोलिस त्याच्या मागावर होते.

पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना गुन्हेगार अजहर शेख हा मध्यप्रदेशातील शिवनी या खेडेगावी असल्याची माहिती खबर्‍याकडून मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक तयार करून मध्यप्रदेशात पाठविले. शिवनी हे गाव पेंच अभयारण्य परिसरात असून, अजहर हा दिवसभर या अभयारण्यामध्ये असतो. रात्री पिंपरवाणी, खवासा या गावामध्ये मुक्कामी येत असल्याची माहिती पोलिसांनी काढली.

पोलिस पथकातील अधिकारी आणि कर्मचारी दोन दिवस तेथे तळ ठोकून होते. दरम्यानच्या काळात पोलिसांनी अझहरची सगळी माहिती संकलीत केली. वेषांतर केलेल्या पोलिसांनी अजहर रहात असलेल्या घराची पाहणी केली. मात्र, दोन दिवस अजहर घरी आलाच नाही. त्यामुळे पोलिसांचा तेथील मुक्काम वाढला. तिसर्‍या दिवशी मात्र अजहर घरी येत असतानाच पोलिसांनी त्याला झडप घालून पकडले.

खून, जबरी चोरी अन् अपहरणाचे गुन्हे
अजहरविरोधात कोतवाली, तोफखाना, भिंगार पोलिस ठाण्यांत खून, विनयभंग आणि जबरी चोरी असे 9 गुन्हे दाखल आहेत. संगमनेर पोलिस ठाण्यात विवाहितेचा छळ केल्याचा गुन्हाही त्याच्याविरोधात दाखल आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com