Type to search

Breaking News ब्लॉग मुख्य बातम्या

वीर योध्याची शौर्यगाथा : तानाजी द अनसंग वॉरियर

Share
वीर योध्याची शौर्यगाथा : तानाजी द अनसंग वॉरियर Latest News Hitchat Review Of Tanhaji The Unsung Warrior Film By Ajay Devgn

आजच्या युगात इतिहासाचे कथानक वापरून अनेक चित्रपट बॉलीवूड मध्ये येत आहेत. एखाद्या गोष्टीचा इतिहास माहित असणे आणि तो इतिहास भव्यदिव्य दाखवणे यात जो फरक आहे, तो ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ यात नीटनेटका मांडला आहे. शेवटी इतिहास तो इतिहासच असतो, मग त्याला भरजरी शालू नेसवून समोर आणा किंवा शाल श्रीफळ देऊन आणा त्यात काही बदल होत नाही. पण आजच्या काळात या आणि अशा घटनांवर चित्रपट काढायचे म्हणजे मोठे दिव्यच म्हणावे लागेल. कारण त्या घटनेची असलेली नोंद, त्याबद्दलचे दाखले, त्याबद्दल कोणी लिखाण केले असेल तर लिखाण करत असताना लेखकाने वापरलेले संदर्भ यांचा धांडोळा घेऊन कथानक बनवावे लागते. म्हणजेच वास्तवाला धक्का न लावता अभ्यास, संशोधन आणि तर्क या त्रिकुटाच्या संयोगाने घटनेची मांडणी करून कथानक बनविणे हे दिग्दर्शक पर्यायाने लेखकासमोर मोठे आव्हान असते.

तान्हाजी : द अनसंग वॉरियर हा चित्रपट मात्र कथानकाची गरज म्हणून थोडा बदल गृहीत धरूनच बघावा लागतो. त्यामुळे चित्रपट आणि त्याचे कथानक प्रेक्षकांना एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. ओम राउत या नवख्या दिग्दर्शकाने आपल्या पहिल्याच हिंदी चित्रपटात तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा अगदीच भव्यदिव्य अशा थाटात मांडली आहे.

लहानपणापासूनच मराठी मनावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असलेल्या स्वराज्यकथांचे गारुड असतेच. ओम राउत या दिग्दर्शकाने हिंदी चित्रपटाच्या पदार्पणातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एका ऐतिहासिक घटनेचा चित्रपट बनवला सोबतच बॉलीवूड मधील ख्यातनाम कलावंतांचा खुबीने वापर करून चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मात्र यामध्ये ओम राउत याने इतिहासापेक्षा कोणीच मोठे होणार नाही याची देखील काळजी घेतली आहे.

अजय देवगण निर्मिती मध्ये व्हीएफएक्सचा वापर करत त्याला थ्री-डी तंत्रज्ञानाची जोड दिलेली असलेला तान्हाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या उजवाच ठरतो.

चित्रपटाची सुरुवात जरी संयत झालेली असली तरी देखील चित्रपट पुढे कधी सरकतो आणि चित्रपटाचा मध्यान्ह कधी येतो ते समजत नाही. नावाप्रमाणे हा चित्रपट तानाजी मालुसरे यांच्यावर असला तरी प्रेक्षकांना उदयभान राठोड नक्की कोण? आलमगीर बादशहाच्या चाकरीत साधा सैनिक असलेला उदयभान नक्की एवढा मोठा कसा होतो कि बादशहा त्याला दख्खनची जबाबदारी देतो? असे काहीतरी वेगळे देण्याचा घाट दिग्दर्शकाने घातला आणि त्यात तो यशस्वी देखील होतो.

स्वराज्यावर जेव्हा संकट आले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत २३ किल्ले आणि इतर काही गोष्टींचा तह केला. त्यात कोंढाणा हा भरभक्कम किल्ला आलमगीर बादशहाच्या सेवेत गेला. तीन चार वर्षांनी दख्खनची राजधानी करायची म्हणून आलमगीर बादशाह आपल्या विश्वासू सेवकाला म्हणजेच उदयभान राठोड ला किल्लेदार म्हणून पाठवतो. हि खबर महाराजांना लागताच महाराज किल्ले कोंढाणा हि मोहीम हाती घेता पण मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलेला तानाजी ही जबाबदारी आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग रायबाचे असे म्हणत स्वतः अंगावर घेतो आणि मग सुरु होतो प्रवास कोंढाण्यावर भगवा फडकण्याचा..

अजय देवगण याने केलेली तानाजीची भूमिका शंभर टक्के न्याय देऊन जाते तर काजोलने निभावलेली तानाजी मालुसरे यांच्या पत्नीची या सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत असलेल्या आणि महाराजांचा अभिमान असलेल्या एका सुनेची भूमिका भाव खाऊन जाते. लहानग्या शिवाजी सोबत रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेणारा तान्ह्या तसेच संकट आल्यावर उजवा हाताने संकट बाजूला करायचे असते, त्यांच्यासमोर मान नसते असे म्हणत जीवाची बाजी लावण्यास तयार असलेला मित्र या आणि अश्या अनेक गोष्टींमधून शिवाजी महाराज आणि तान्हाजी यांची मैत्री समोर आलेली दिसते.

महाराजांच्या भूमिकेत असलेला शरद केळकर, सुर्याजीच्या भूमिकेत असलेला देवदत्त नागे यांनी आपापल्या भूमिकेला न्याय देत चित्रपटाची शोभा वाढविलेली दिसते. यामध्येच ज्याचा उल्लेख तान्हाजी पेक्षा काकणभर का होईना उजवा अभिनय केलेला सैफ अली खान उदयभान राठोड याचा करावा लागेल. विक्षिप्त, जिद्दी आणि जिंकण्यासाठी कोणताही स्तर गाठणारा असा उदयभान सैफने जिवंत केलेला दिसून येतो.

महाराजांचा इतिहास आपल्याला आपला वाटण्यासाठी आणि तो तितकाच प्रभावी आणि सरळ वाटण्यासाठी त्यासोबतच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत प्रेक्षकांसमोर आणण्याचे यशस्वी शिवधनुष्य दिग्दर्शक ओम राउत यांनी पेललेले आहे.

-वैभव सुरेश कातकाडे, नाशिक

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!