Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगर50 रुपयांत कोंबडी; कोरोनामुळे कुक्कुटपालक आर्थिक संकटात

50 रुपयांत कोंबडी; कोरोनामुळे कुक्कुटपालक आर्थिक संकटात

बेलपिंपळगाव (वार्ताहर)- देशात कोरोनाने हाहाकार उडवला असून याचा अनेक व्यवसायांना फटका बसला असला तरी कोरोनाचा कुक्कुटपालक शेतकर्‍यांना मोठा फटका बसला असून अवघ्या 50 रुपयांना एक या दराने कोंबड्या विकण्याची वेळ कुक्कुटपालकांवर आली असून मोठा तोटा सहन करण्याची वेळ आली आहे.
बेलपिंपळगाव येथील शेतकरी रत्नदीप कांबळे शेतीला जोडधंदा म्हणून सुगुणा कंपनीतर्फे ब्रॉयलर कोंबडी पालनाचा व्यवसाय गेल्या सहा वर्षापासून करत आहेत. कंपनी त्यांना पक्षी व त्यांना लागणारे खाद्य पुरवत असते.

साधारणपणे पक्षी मोठा होण्यासाठी 45 दिवस लागतात.त्यानंतर कंपनी तो माल घेऊन जाते व बाजारात विकला जातो. याच्या बदल्यात श्री. कांबळे यांना साडेतीन हजार पक्ष्यांच्या एका लॉटमधून 40 ते 42 हजार रुपयांचा नफा मिळत असायचा. त्यांनी दिडशे फुटाचे अद्ययावत शेड उभारले असून यातून ते हा व्यवसाय करत होते पण सध्या जग कोरोनाच्या धास्तीने त्रस्त आहे.

- Advertisement -

पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार आपल्याकडे देखील बंद पाळण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात हा व्यवसाय पूर्णपणे मोडकळीस आला आहे. कांबळे यांच्याकडील मालाच्या विक्री मधून किमान पाच लाख रुपये होणार होते पण आज मात्र एक लाख रुपये देखील आले नाहीत.

ग्रामीण भागात चिकन, मटण, मासे खाल्ले तर हा रोग होतो अशा अफवांचा या व्यवसायाला मोठा फटका बसला. कांबळे यांच्याकटे दीड ते दोन किलो वजनाच्या कोंबड्या आहेत. पूर्वी याच मालासाठी ग्राहक 300 ते 400 रुपये देत असत. आता मात्र गावात एक कोंबडी 50 रुपयांना विकली जात आहे. त्यामुळे या शेतकर्‍याच्या हातातोंडाशी आलेला घास मात्र कोरोनाच्या धास्तीने गेला.

गाव व परिसरातील नागरिक येथे येऊन कोंबड्या विकत घेण्यासाठी सरसावले आहेत. खबरदारी म्हणून शेडच्या काही अंतरावर दोरी बांधून तीन मीटर अंतरावर ग्राहकांना उभे राहण्याची व्यवस्था केली आहे. ग्राहक लांबूनच या कोंबड्या घेत आहेत.

अफवा पसरवू नका
सध्या चिकन, मटण, मासे खाल्ल्याने कोरोना होतो या अफवांमुळे हा व्यवसाय करणार्‍या शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसत असून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. अशा अफवा कोणी पसरवू नयेत कारण त्याचा फटका कुक्कुटपालकांना बसतो.
-रत्नदीप कांबळे कुक्कुटपालक.

- Advertisment -

ताज्या बातम्या