Saturday, April 27, 2024
Homeनगर1400 आरोग्य कर्मचार्‍यांचा उपाशी पोटी ‘करोना’शी लढा

1400 आरोग्य कर्मचार्‍यांचा उपाशी पोटी ‘करोना’शी लढा

एप्रिलपासून पगार थकला : आरोग्य विभागाचा उपसंचालक स्तरावर पाठपुरावा

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोना विरोधात लढा देणार्‍या जिल्हा परिषदेच्या 1 हजार 400 कर्मचार्‍यांचा एप्रिल महिन्यांपासूनचा पगार थकीत आहे. राज्य सरकारच्या 4 मे शासन निर्णयाचा फटका या कर्मचार्‍यांना बसला असून ऐन लॉकडाऊनमध्ये पदर मोड अथवा उसनवारी करण्याची वेळ या कर्मचार्‍यांवर आली आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात जिल्हा आरोग्य अधिकारी ते गाव पातळीपर्यंत आरोग्य सेवक महिला आणि पुरूष अशा विविध संवर्गातील अधिकारी आणि कर्मचारी सध्या लॉकडाऊनच्या काळात करोना विरोधात लढा देत आहेत. मात्र, या कर्मचार्‍यांवर केवळ सरकारच्या धोरणामुळे उपाशी पोटी लढा देण्याची वेळ आली आहे. विशेष करून यात आरोग्य सेवक महिला, आरोग्य सेवक पुरुष, औषध निर्माण अधिकारी आणि आरोग्य सहाय्यक महिला यांच्यासह तालुका पातळीवर कार्यरत असणार्‍या वैद्यकीय अधिकारी अ आणि ब गट यांना अधिका अधिक वेळ देवून काळजीपूर्वक करोना विरोधात काम करावे लागत आहे.

यासह करोना शिवाय अन्य आजारपणासंदर्भात उपचार करावे लागत आहेत. या सर्व कर्मचार्‍यांचा मार्च महिन्यांत 25 टक्के, तर अधिकार्‍यांचा 50 टक्के पगार कपात करण्यात आला. मात्र, त्यावर नाराज न होता हे कर्मचारी जोमाने कार्यरत आहेत. मात्र, आता एप्रिल महिन्याचा पगार थकीत असून मे महिन्यांतील 19 दिवस सरले आहेत. सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने सर्वत्र पैशाची चणचणी आणि महागाई गगनाला भिडली आहे. यामुळे पगार थकीत असणार्‍या कर्मचार्‍यांचे आर्थिक हाल होत आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाचे आरोग्य उपसंचालक यांच्याकडे पाठ पुरावा सुरू असून लवकरात लवकर कर्मचार्‍यांचे पगार करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

असे आहेत कर्मचारी
जिल्हा आरोग्य अधिकारी, कुटूंब कल्याण अधिकारी, जिल्हा माता बाल विकास अधिकारी, साहय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, साथरोग नियंत्रण अधिकारी, जिल्हा विस्तार अधिकारी माध्यम यांची प्रत्येकी एक पद, 14 तालुका वैद्यकीय अधिकारी, 217 वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक महिला 976, आरोग्य सेवक पुरुष 562, औषध निर्माण अधिकारी 102, आरोग्य सहाय्यक महिला 103, आरोग्य साहय्यक पुरूष 130, आरोग्य पर्यवेक्षक 19, प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकाारी 14, सफाई कामगार 96 यांच्यासह जिल्हा स्तरावर आरोग्य विभागात 45 कर्मचार्‍यांचा यात समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या