Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

आरोग्य विभागाकडून होणारे सर्वेक्षण संशयाच्या भोवर्‍यात

Share
आरोग्य विभागाकडून होणारे सर्वेक्षण संशयाच्या भोवर्‍यात, Latest News Health Department Survey Problems Ahmednagar

कर्मचार्‍यांपासून वस्तुस्थिती लपविण्याचा प्रकार : दारातूनच केली जाते बोळवण

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोनाची लागण झालेले रूग्ण ज्या परिसरात राहतात, तेथे दक्षता म्हणून फवारणीसह घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी, माहिती घेतली जात आहे. मात्र दारावर आलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांना घरात न घेणे, दारातच उभारून कुटुंबप्रमुखाने माहिती देणे, कुटुंबातील इतर सदस्यांना समोर येऊ न देणे असे प्रकार घडत असल्याने हे सर्वेक्षण कितपत वस्तुस्थितीला उतरेल, याबाबत साशंकता होत आहे.

नगर शहरात सुरूवातीला अवघे तीन रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. मात्र त्यानंतर नगर शहरात ठराविक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळण्यास सुरूवात झाली. कोरोना बाधितांनी अनेकांच्या भेटी घेतलेल्या असल्याने हा संसर्ग वाढण्याचीही भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलले आहेत. ज्या भागात रूग्ण आढळला, त्या भागाला जिल्हा व पोलीस प्रशासनाने सील केले आहे. त्या भागातील लोकांचा इतर भागाशी संपर्क येणार नाही किंवा कमीत कमी येईल, यासाठी काळजी घेतली जात आहे. तेथील हातावर पोट भरणार्‍यांची अडचण होऊ नये म्हणून विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत फूड पॅकेट, जिवनावश्यक वस्तू पोहचविल्या जात आहेत.

एकीकडे ही काळजी घेतली जात असतानाच, दुसरीकडे आरोग्य विभागामार्फत या भागात सर्वेक्षण केले जात आहे. यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्याबाबत माहिती संकलित केली जात आहे. त्यामध्ये कुटुंबप्रमुखासह त्या घरातील सदस्यांची हिस्ट्री, आशात कुठे गावाला गेले होते का, सर्दी, खोकला, ताप आदी प्रकारचा आजार किंवा तशी लक्षणे कोणामध्ये आहेत का आदीबाबत ही माहिती असते. सर्व कुटुंबियांनी एकत्रितपणे ही माहिती देणे अपेक्षित असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून आरोग्य कर्मचार्‍यांना यासाठी सहकार्य मिळत नसल्याचे समोर आले आहे.

सर्वेक्षणात गेलेल्या कर्मचार्‍यांना एकतर लवकर दार उघडले जात नाही. उघडले तरी घरात घेतले जात नाही. कुटुंबातील एकच व्यक्ती, शक्यतो कुटुंबप्रमुख समोर येऊन प्रश्नांची उत्तरे दिली जातात. कोणालाच काही आजार नसल्याचे किंवा लक्षणे आढळत नसल्याचे सांगून आरोग्य कर्मचार्‍यांची बोळवण केली जात आहे. यामुळे संबंधित कुटुबांतील इतर सदस्य आरोग्य कर्मचार्‍यांसमोर येतच नसल्याने वस्तुस्थिती समजायला मार्ग नाही. इतरांना समोर बोलवा म्हटले तरी ते ऐकले जात नाही. अनेक ठिकाणी घरातून खोकल्याचा आवाज येतो, तरीही कोणतीच लक्षणे नसल्याचे सांगण्यात येते.

या प्रकारामुळे आरोग्य कर्मचारीही हवालदील झाले आहेत. महापालिकेचे कर्मचारी एकीकडे गावात साफसफाई, फवारणीचे काम करतात. दुसरीकडे स्थलांतरीत मजुरांची व्यवस्था करण्यासाठी निवारा केंद्र शोधत आहेत. तसेच गरजवंतांना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून फूड फॅकेट आणि किराणा माल पोहचवत आहेत. उपायुक्त सुनील पवार याच्या मार्गदर्शनाकाली हे काम सुरू असून, महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार दानशुरांकडून किराणा माल महापालिकेपर्यंत पोचविला जात आहे.

यासाठी उपायुक्त पवार यांनी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला ग्रुप तयार केला असून, सर्व काम मेसेजद्वारे होत आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचीही गरज नाही. असे असताना आरोग्य कर्मचार्‍यांकडून होणार्‍या सर्वेक्षणात मात्र सहकार्य मिळत नसल्याने अधिकारी, कर्मचार्‍यांमध्ये नाराजीची भावना आहे.

हेतूच साध्य होत नाही
सर्वेक्षण करण्यामागील मूळ उद्देश संबंधितांचे सहकार्य मिळत नसल्योन साध्य होत नाही. कोरोना रूग्ण आढळलेल्या परिसरातील वस्तुस्थिती प्रशासनासमोर न गेल्यास उपाययोजना कशा करणार? सर्वेक्षणाचा मूळ हेतू कसा साध्य होणार, असे प्रश्न यामुळे उपस्थितहोत आहेत.

दोन इमारती ताब्यात
नगर शहरातील वाढते रूग्ण लक्षात घेता विलगीकरण कक्ष वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानुसार प्रशासन तयारीला लागले आहे. महापालिकेने आज मुकुंदनगर भागातील एक शाळा आणि पत्रकार चौकातील पेमराज सारडा महाविद्यालयाची इमारत ताब्यात घेतली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!