Wednesday, April 24, 2024
Homeनगरगटनोंदणीअभावी ‘स्थायी’तील आठ जागा अद्याप रिक्तच!

गटनोंदणीअभावी ‘स्थायी’तील आठ जागा अद्याप रिक्तच!

सभापतिपदाची निवडही लांबली : अर्ध्या सदस्यांवर समितीचा कारभार सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेच्या पोटनिवडणुकीत प्रभाग सहामध्ये मोठ्या मताधिक्याने भाजपने विजय मिळविला असला, तरी नव्याने निवडून आलेल्या पल्लवी जाधव यांचा समावेश गटनोंदणीत करण्यासाठी अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. गटनोंदणी रखडल्याने स्थायी समितीतील रिक्त जागांवर नियुक्त्या राहिल्या असून, त्यामुळे स्थायी समितीला नवीन सभापती मिळण्यासही विलंब होत आहे.

- Advertisement -

प्रभाग सहा (अ) मध्ये मध्यंतरी पोटनिवडणूक झाली. यामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात लढत झाली. शिवसेनेच्या उमेदवार अनिता दळवी यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला असल्याने त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार ठरल्या. मात्र या निवडणुकीत भाजपने सतरापेक्षा जास्त मताधिक्याने शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला. महाआघाडी स्थापन झाल्यानंतर राज्यात इतरत्रही भाजपला धक्के बसत असताना नगरमध्ये मात्र महाआघाडीला मात्र नामुष्की पत्करावी लागली.

महापौर बाबासाहेब वाकळे प्रतिनिधीत्त्व करीत असलेला हा प्रभाग असल्याने त्यांनी व भाजप शहर जिल्हाध्यक्षपदी नव्यानेच नियुक्ती झाल्याने महेंद्र गंधे यांनी निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यांनी मोठ्या मताधिक्याने भाजप उमेदवाराला विजय मिळवून दिला.

यामुळे भाजपचे महापालिकेतील संख्याबळ एकने वाढले. याचा परिणाम शिवसेनेच्या मूल्यामध्ये घट झाली. त्यामुळे त्यांचा स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीतील एक सदस्य घटला. तेथे भाजपचा एक सदस्य वाढणार आहे. स्थायी समितीतील आठ सदस्य निवृत्त झाले आहेत. या रिक्त जागांवर नव्याने आठ सदस्यांची पक्षीय बलानुसार नियुक्ती करावयाची आहे. यामध्ये भाजपचा एक अधिकचा सदस्य जाणार आहे. त्यापूर्वी गटनोंदणी करणे बंधनकारक आहे.

गटनोंदणी झाल्यानंतरच भाजपचे मूल्य वाढणार आहे. भाजपचा एक अधिकचा सदस्य समितीत जाणार असल्याने गटनोंदणीचे अधिकृत पत्र आल्याशिवाय रिक्त आठ जागांवर नियुक्ती करण्यासाठी सभा काढायची नाही, असे महापौरांनी ठरविलेले आहे. रिक्त जागांवर सदस्य नियुक्ती केल्याशिवाय नवीन सभापती निवडला जाणार नाही. सध्याचे सभापती मुदस्सर शेख यांची मुदत संपलेली आहे. मात्र नव्याने सदस्य नियुक्ती न झाल्याने सध्या तेच सभापतिपदाचा कार्यभार पहात आहेत. शिवाय आठ जागा रिक्त असल्याने अवघ्या आठ सदस्यांच्या जोरावर समितीचा कारभार ते हाकत आहेत.

महापौर-शहर जिल्हाध्यक्षात मतभिन्नता
गटनोंदणीबाबत महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी दोन दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन गटनोंदणी केली असून, अद्याप गटनोंदणी झाल्याचे पत्र महापालिकेला मिळालेले नाही, असे सांगितले. तर शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांना याबाबत विचारले असता अद्याप गटनोंदणी झाली नसून, दोन दिवसांत ती करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. गटनोंदणीबाबत या दोघांमध्ये मतभिन्नता असल्याचे यामुळे समोर आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या