Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

हरभर्‍यावर ‘मुळकूज’ रोगाचे थैमान

Share
हरभर्‍यावर ‘मुळकूज’ रोगाचे थैमान, Latest News Gram Crop Problems Mahegav

30 टक्के हरभरा पीक जळाले; कृषी विभागाचे दुर्लक्ष

माहेगाव (वार्ताहर)- राहुरी तालुक्याच्या पूर्वभागात हरभरा पिकाचे माहेरघर समजल्या जाणार्‍या खुडसरगाव, पाथरे खुर्द, माहेगाव परिसरात हरभरा पिकाला मोठ्या प्रमाणात मुळकूज आल्याने हरभरा पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होणार असल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत.

गेल्या चार वर्षाच्या सलग दुष्काळी परिस्थितीने शेतकरी आर्थिकदृष्ट्या पुरता कोलमडला असताना यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी आनंदीत झाला. जिल्ह्याला वरदान ठरलेले मुळा धरण भरल्याने शेतकर्‍यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. मुळा धरणाच्या डाव्या कालव्याखाली असणारे बरेच क्षेत्र हरभरा या कडधान्यासाठी प्रसिद्ध आहे. या भागात यंदा शेवटच्या पावसाच्या ओलीवर शेतकर्‍यांनी हरभरा पीक केले.

परंतु या पिकाला मोठ्या प्रमाणात मररोग आल्याने 25 ते 30 टक्के हरभरा वाळून गेल्याने उत्पादनावर याचा मोठा परिणाम होणार आहे. शेतकर्‍यांना योग्य तो मोबदला मिळणार नसल्याने शेतकर्‍यांमध्ये मोठी नाराजी दिसत आहे. मररोग कमी करण्यासाठी कृषी विभाग व राहुरी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी पाहणी करून योग्य सल्ला मिळण्याची गरज आहे. राहुरीचे कृषी विद्यापीठ तालुक्यातील शेतकर्‍यांच्या बांधाला असताना मात्र, या विद्यापीठाचा काहीच उपयोग होत नाही.

शेतकरी विद्यापीठात माहिती घेण्यासाठी गेले तर ती माहिती कुणाकडून घ्यायची? याची सुध्दा माहिती दिली जात नाही. शासनाकडून कडधान्य उत्पादनावर मोठा भर दिला जातो. मात्र, पाणी असणार्‍या पट्ट्यात शेतकरी हरभर्‍यासारखे कडधान्याचे पीक घेत असताना कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. अशी परिस्थिती राहिली तर शेतकरी कडधान्याकडे नक्की पाठ फिरवेल. तरी कृषी विभागाने पाहणी करून यावर उपाय सांगावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

हरभरा पिकाला मररोगापासून वाचविण्यासाठी बुरशीनाशक औषधाची बीजप्रक्रिया केली असताना सुध्दा मोठ्या प्रमाणात मररोगाने हरभरा पीक वाळत आहे. यावर विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
– बाळासाहेब जाधव, शेतकरी पाथरे खुर्द.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!