धान्याचा काळाबाजार प्रकरणी स्वस्त धान्य दुकानदारावर गुन्हा

केडगावमधील प्रकार : आरोपी महापालिकेचा कर्मचारी

अहमदनगर (प्रतिनिधी) – केडगाव येथील इंदिरानगर परिसरात असलेल्या स्वस्त धान्य दुकानावर पुरवठा निरीक्षकांनी छापा टाकला असता, गहू व तांदूळ वाटपामध्ये तफावत आढळून आली. तसेच, छापा टाकण्यास गेलेल्या पुरवठा निरीक्षकांना अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याची घटना घडली.

या प्रकरणी स्वस्त धान्य दुकान परवाना धारक शिल्पा दिलीप पटेकर (वय- 30) व सचिन दिलीप पटेकर (वय- 43 दोघे रा. इंदिरानगर, केडगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर येथील अन्न-धान्य वितरण कार्यालयातील पुरवठा निरीक्षक घनश्याम गवळी यांनी फिर्याद दिली आहे. यातील सचिन पटेकर महापालिकेचे कर्मचारी आहेत.

केडगाव येथील इंदिरानगर भागातील लोकांसाठी शिल्पा पटेकर यांच्या नावाने स्वस्त धान्य दुकान (दुकान क्र.- 84) आहे. करोना महामारीमध्ये कोणीही लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासन काळजी घेत आहे. सर्व पुरवठा निरीक्षकांना यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुरुवारी पुरवठा निरीक्षक गवळी यांनी पटेकर यांच्या नावे असलेल्या स्वस्त धान्य दुकानावर छापा टाकला.

पटेकर यांचे एप्रिल 2020 करीता प्राधान्य व अंत्योदय योजनेचे एकुण 169 लाभार्थी आहेत. मात्र, त्यांनी 122 शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना गहू व तांदूळ वाटप केले. उर्वरित 47 शिधापत्रिका धारकांना धान्य वितरणापासून वंचित ठेवल्याचे आढळून आले. पुस्तकी साठा व प्रत्यक्ष आढळून आलेला साठा यातील तफावतमध्ये गहू 12 क्विंटल 73 किलो व तांदूळ 9 क्विंटल धान्याच्या काळाबाजार केला असल्याचे लक्षात आले. तसेच, छापा टाकला तेव्हा तेथे उपस्थित असलेले सचिन पटेकर याने निरीक्षक गवळी यांना अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *