Thursday, April 25, 2024
Homeनगरशासकीय आरोग्य संस्थांनी कोरोनाचा घेतला ‘धसका’

शासकीय आरोग्य संस्थांनी कोरोनाचा घेतला ‘धसका’

जिल्हा परिषद करणार दररोजचे रिपोर्टिंग : डॉक्टरांची कार्यशाळाही घेतली

अहमदनगर (प्रतिनिधी)- चीनमध्ये न्यूमोनियाचे अनेक रुग्ण आढळले असून, या न्यूमोनियाचे कारण कोरोना विषाणू असल्याचे सिद्ध झाले आहे. चीननंतर हा विषाणू आता जगभरात पसरू लागला आहे. भारतातही या आजाराने शिरकाव केला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. नगर जिल्ह्यात या आजाराचा फारसा धोका दिसत नसला, तरी आरोग्य विभागाने जिल्हा आरोग्य विभागांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. याच सोबत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग स्वाईन फ्ल्यू प्रमाणे कोरोनाचे दररोज रिपोर्टिंग करणार आहे.

- Advertisement -

दिवसंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने दक्षता म्हणून जिल्हा रुग्णालयात यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील शिर्डी विमानतळ व आरोग्य केंद्रांना याबाबत सूचना दिल्या आहेत. चीनमधील काही प्रांतांत या आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळले आहेत. या आजारामुळे काही जणांचा मृत्यूही झाला आहे. अन्य देशांतही या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने या आजाराची दखल घेतली आहे. याला प्रतिबंध करण्यासाठी काय उपाययोजना आवश्यक आहेत, याबाबत सूचना दिल्या आहेत.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याबाबत माहिती देण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयांच्या सिव्हील सर्जनना समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व आरोग्य उपकेंद्रांना पत्र पाठवून त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली. पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था येथे नमुने तपासणी व्यवस्था आहे. तपासणीसाठी नमुने कशा पद्धतीने घ्यावेत, प्रयोगशाळेत कसे पाठवावेत याबाबत संस्थेच्या वेबसाइटवर सूचना दिल्या आहेत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

कोरोना संदर्भात जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्ह्यातील सरकारी डॉक्टर आणि औषध निर्माण अधिकार्‍यांची कार्यशाळा घेण्यात आली असून आजराचे लक्षणे आणि त्यावर करावयाचे उपचार याची माहिती देण्यात आली. यासह स्वाईन फ्लू प्रमाणे दररोज रिपोर्टिंग करण्यात येणार असून यासाठी जिल्हा साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके यांचावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आजाराची लक्षणे
पाच वर्षांवरील वयोगट : अचानक येणारा तीव्र ताप, खोकला, घसा बसणे, दम लागणे, श्वसनास अडथळा येत असल्यास तातडीने रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता आहे. पाच वर्षांखालील वयोगट : न्यूमोनिया, रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता आहे.

रुग्णालयांना हे महत्त्वाचे…
रुग्णालयात या आजाराच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष असावा, हात धुण्याची व्यवस्था असावी, जैववैद्यकीय कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावावी, गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर, तसेच जीवनावश्यक प्रणाली सुविधा रुग्णालयात आहे का, याची खात्री करावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या