Wednesday, April 24, 2024
Homeनगरगोदावरीचे कालवे झाले वाहते

गोदावरीचे कालवे झाले वाहते

उजवा 450, डावा 250 तर जलद कालव्याला 700 क्युसेकने विसर्ग

अस्तगाव (वार्ताहर)– नांदूरमधमश्ेवर बंधार्‍यातून मंगळवारी सायंकाळी 5 वाजता गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना पाणी सोडल्याने हे दोन्ही कालवे वाहते झाले आहेत.
गोदावरी कालव्यांच्या तसेच वैजापूरच्या दिशेने वाहणार्‍या जलद कालव्यांच्या या आवर्तनासाठी 12 एप्रिलला दारणातुन 1900 क्युसेकने तर वालदेवी धरणातून 350 क्युसेक असे 2250 क्युसेकने पाणी खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या दिशेने सोडण्यात आले आहे. हे सोडलेले पाणी नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात पोहचल्याने व त्याची लेव्हल आल्याने मंगळवारी दि. 14 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता गोदावरीचा उजवा कालवा 350 क्युसेकने तर डावा कालवा 200 क्युसेकने सोडण्यात आला.

- Advertisement -

काल बुधवारी सकाळी 6 वाजता या दोन्ही कालव्यातील विसर्ग वाढविण्यात आला आहे. उजवा कालवा 450 क्युसेक तर डावा कालवा 250 क्युसेक इतका करण्यात आला आहे. वैजापूरच्या दिशेने वाहाणारा जलद कालवा या बंधार्‍यातुनच काल बुधवारी सकाळी 9 वाजता सुरुवातीला 300 क्युसेकने सोडण्यात आला. तो काल सायंकाळी 6 वाजता 700 क्युसेक इतका करण्यात आला.

गोदावरी कालव्यांचे हे उन्हाळी आवर्तन आहे. हे आवर्तन साधरणत: 22 ते 23 दिवस चालणार आहे. या आवर्तनात सुरुवातील पिण्याच्या पाण्याचे साठवण तलाव भरण्यात येणार आहे. त्यानंतर सिंचनासाठी पाणी देण्यात येणार आहे. टेल टू हेड असे पाणी देण्यात येणार आहे. मागील आवर्तन 14 मार्च रोजी बंद करण्यात आले होते.
गोदावरीच्या उजव्या कालव्यावर अडीच हजार हेक्टर क्षेत्राला पाण्याची मागणी आहे.

तर डाव्या कालव्यावर 2 हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाण्याची मागणी आहे. अशी एकूण साडेचार हेक्टरला दोन्ही कालव्यांवर मागणी आहे. उजव्या कालव्याचे आज गुरुवारी उशीरापर्यंत गणेश परिसरात हे पाणी दाखल होईल. तर डाव्याचे पाणी बुधवारी रात्रीच कोपरगाव भागात दाखल झालेले असेल.

सिंचनासाठी हे पाणी अधिकृत फळबागा, बारमाही पिके, हंगामी उभी पिके यांना पुरविण्यात येणार आहे. अनधिकृतपणे कुणी पाणी उचलु नये यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बेकायदा पाणी उपसा करीत असेल अशांवर कडक पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. लाभधारक शेतकरी बांधवांनी या आवर्तनासाठी सहकार्य करावे व आवर्तन कसे सुरळीत पार पडेल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जलसंपदाचे नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या