गोदावरी कालवे वाहते

jalgaon-digital
2 Min Read

रब्बीचे दुसरे आवर्तन

अस्तगाव (वार्ताहर) – रब्बीच्या आवर्तनासाठी नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीचे दोन्ही कालव्यांना शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता पाणी सोडण्यात आले आहे. जलद कालवा गेल्या 10 फेब्रुवारीलाच सोडण्यात आला आहे.

या आवर्तनासाठी दारणातून 700 क्युसेकने, मुकणेतून 950 क्युसेक तर वालदेवी 300 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. हे पाणी नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात येऊन तेथून गोदावरीचा उजवा कालवा 400 क्युसेक ने तर डावा कालवा 250 क्युसेकने सोडण्यात आला आहे. 10 फेब्रुवारीला वैजापूर गंगापूरच्या दिशेने वाहणारा जलद कालवा सोडण्यात आला आहे.

त्यातून 700 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरीचा राहात्याच्या दिशेने वाहाणार्‍या उजवा कालव्याचे पाणी उद्या सोमवारी दुपारपर्यंत राहाता भागात दाखल होईल. सोमावरी सायंकाळी अस्तगावच्या पुढे निघेल. पुढे ते पुणतांब्याकडे टेलला पिण्याच्या पाण्याचे तळे भरण्यासाठी जाईल. 4-5 दिवसानंतर सिंचनाचे आवर्तन सुरू होऊ शकेल. तर कोपरगाव भागातील डाव्या कालव्याचे पाणी आज दुपारपर्यंत पोहचेल असा अंदाज आहे.

हे आवर्तन आठ दिवस लवकर सोडावे यासाठी राज्याचे माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाअटील, आमदार अशुतोष काळे, कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक बिपीनराव कोल्हे यांनी आग्रह धरला होता. हे पाणी शेतकर्‍यांच्या शेता पर्यत पोहचावे म्हणून यासाठी असणार्‍या चार्‍यांमधील गवत, झुडपे काढले की नाही? हा प्रश्न आहे.

रब्बीचे हे दुसरे आवर्तन आहे. पहिल्या रब्बीच्या आवर्तनासाठी ज्यांनी सात नंबरचे फार्म भरले त्यांना या दुसर्‍या रब्बीच्या पाटपाण्याचा लाभ घेता येईल. पाणी पट्टी भरावी, बेकायदा पाणी उपसणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल. असे नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी सांगितले. तर उन्हाळी आवर्तन मार्च च्या शेवटच्या आठवड्यात अथवा एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल. या उन्हाळी आवर्तनासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत पाणी मागणीचे अर्ज दाखल करणयात येतील.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *