Sunday, April 28, 2024
Homeनगरगोदावरी कालवा नूतनीकरणासाठी जमा केलेल्या पैशाचा हिशोब द्यावा

गोदावरी कालवा नूतनीकरणासाठी जमा केलेल्या पैशाचा हिशोब द्यावा

काम सुरू करा नाहीतर शेतकर्‍यांचे पैसे परत करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

राहाता (तालुका प्रतिनिधी)- गोदावरी उजवा कालवा लोकसहभागातून नुतनीकरण करण्यासाठी शेतकर्‍यांकडून जमा केलेल्या पैशाचा हिशोब द्यावा तसेच काम तातडीने सुरू करावे नाहीतर गोळा केलेले शेतकर्‍यांचे पैसे परत द्यावेत, अशी मागणी शेतकर्‍यांनी समितीकडे केली आहे. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडू असा इशारा राहाता तालुक्यातील शेतकर्‍यांनी दिला आहे.

- Advertisement -

मागील वर्षी गोदावरी कालव्याचे लोकसहभागातून नुतनीकरण करण्यासाठी मोठी चळवळ गणेश परीसरात उभी राहिली होती. यासाठी मोठी जनजागृती करण्यात आली. सरकार निधी देत नाही. धरणात पाणी असताना फुटक्या कालव्यांमुळे शेतीला पाणी मिळत नाही. पर्यायाने पाण्याअभावी पिकांचे मोठे नुकसान होते यासाठी गोदावरी उजव्या कालव्याच्या रूंदीकरणासाठी या परिसरातील तरुण शेतकर्‍यांनी एकत्र येत गावोगाव जाऊन जनजागृती करत लोकसहभागातून या कालव्याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

यासाठी लोकांचा सहभाग असावा म्हणून आठमाही शेतकर्‍यांकडून 500 रुपये तर बागायती शेतकर्‍याकडून 1000 रुपये प्रति एकर प्रमाणे पैसे गोळा करण्यात आले. ऐन दुष्काळात राहाता, साकुरी परिसरातील शेतकर्‍यांनी लाखो रुपये गोळा केले. मात्र सहा महिन्यांचा कालावधी संपला तरी अद्यापही कालव्याच्या नुतनीकरणाचे काम सुरू झाले नाही.

यामुळे अनेक शेतकर्‍यांनी जमा केलेल्या पैशाचे काय केले याचा हिशोब द्यावा. या कालव्याच्या नुतनीकरणाची जबाबदारी ज्या समिती पदाधिकारी यांच्यावर होती. त्यांनी एक तर काम चालू करावे किंवा काम चालू होत नसेल तर शेतकर्‍यांचे पैसे परत करावेत, अशी मागणी करत आहे. प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकावर अनिल रामचंद्र बोठे, प्रमोद रोहोम, रावसाहेब बोठे, प्रताप सदाफळ, बाबासाहेब गुळवे, यशवंत मेहेत्रे, राधाकिसन कोल्हे, चंद्रभान मेहेत्रे, भानुदास बोठे, संजय बोठे, सुनील बोठे, राजेंद्र कोल्हे यांच्या सह्या आहेत.

कालव्याचे काम रखडले, समिती सुस्त
गोदावरी कालव्याच्या नुतनीकरणासाठी नाम फाउंडेशन, श्री श्री रविशंकर व टाटा फाउंडेशन यांच्यासह अनेक संस्थांनी या कामात सहभाग घेण्याचे आश्वासन दिले. स्वतःच्या संस्थेची प्रसिध्दी करून घेतली. मात्र प्रत्यक्षात कोणतीही मदत न दिल्याने शेतकर्‍यांनी याबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली. जलसंपदा विभागाने काही प्रमाणात काम केले मात्र गेल्या पाच महिन्यांपासून या कामासाठी आलेली मशिनरीही पडून आहे. राहाता व कोपरगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी व खासदारांचे मदतीच्या आश्वासनाचे काय झाले? असा सवाल सर्वसामान्य शेतकरी विचारत आहेत. तर या कालव्याच्या समितीत जाण्यासाठी कुरघोडी करणारे पदाधिकारी कोठे गायब झाले? हा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या