Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

‘गोदावरी’ची चार आवर्तने

Share
‘गोदावरी’ची चार आवर्तने, Latest News Godavari Avartan Meeting Astgav

रब्बी एक, उन्हाळी तीन आवर्तने मिळणार || कालवा सल्लागार समितीच्या बैठका लाभक्षेत्रात,
विखे पाटील यांच्या सुचनेला सकारात्मक प्रतिसाद

अस्तगाव (वार्ताहर)- गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील रब्बी पिकांसाठी एक तर उन्हाळी पिकांसाठी तीन आवर्तने देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबईत मंत्रालयात झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील सिंचनाच्या आवर्तना संदर्भात काल दुपारी मुंबई येथे मंत्रालयात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, श्रीरामपूरचे आमदार लहु कानडे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, निफाडचे आमदार दिलीप बनकर, जलसंपदाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती आहेरराव, मुख्यअभियंता श्री. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, राहाता उपविभागाचे उपअभियंता गायकवाड, कोपरगावचे उपअभियंता दिघे यांच्यासह सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ, गणेशचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, संचालक अ‍ॅड. शिवराम गाडेकर, अ‍ॅड. रघुनाथ बोठे यांच्यासह कालवा सल्लागार समितीचे सदस्य, अधिकारी उपस्थित होते.

याबैठकीत माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी रब्बीत एक तर उन्हाळी तीन आवर्तन देण्याची मागणी केली. या मागणीस लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधी तसेच सल्लागार समितीच्या अन्य सदस्यांनी दुजोरा दिला. या बरोबरच कालवा सल्लागार समितीच्या बैठका या मुंबईत मंत्रालयात न होता, त्या जिल्हा पातळीवर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व्हाव्यात अशी महत्वपूर्ण मागणी आमदार विखे पाटील यांनी केली. याबाबत मंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवत याबाबत संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी चर्चा करुन तसेच शासन परिपत्रकातही बदल करुन अंतिम निर्णय होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे आता गोदावरीच्या लाभक्षेत्राला रब्बीचे एक तर उन्हाळी तीन आवर्तने मिळणार आहेत. या आवर्तनांचे योग्य नियोजन करण्याच्या सुचना यावेळी संबंधीत अधिकारी यांना देण्यात आल्या.

गोदावरी कालव्यांच्या रुंदीकरणाचे काम, वहन क्षमता वाढविण्याची गरज, गोदावरी च्या चार्‍यांचे दरुस्तीचे काम, हे काम लवकरात लवकर करण्यात यावे, याकडे मंत्री महोदय व अधिकार्‍यांचे लक्ष आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी वेधले. त्यास कोपरगावचे आमदार अशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दुजोरा दिला. त्यावर मंत्री भुजबळ यांनी या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनास देण्यात आले असून, पाणी पट्टीच्या रक्कमेतूनच याबाबतची अंमलबजावणी करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या. त्यामुळे पुढील कालवा सल्लागार समितीच्या बैठका लाभक्षेत्रात होऊ शकतील.

असे असेल संभाव्य नियोजन
रब्बी आवर्तन 3 जानेवारी ते 6 फेब्रुवारी(सध्या सुरू असलेले), तसेच उन्हाळी पहिले आवर्तन 1 मार्चला सुटेल त्यापुढील उर्वरित दोन उन्हाळी आवर्तने 30- 30 दिवसांचे असतील. साधरणत: उन्हाळी दोन आवर्तनांत 10 दिवसांचेही अंतर असू शकेल. 120 दिवसांत तीन उन्हाळी आवर्तने पूर्ण होतील. असे नियोजन जलसंपदाला करावे लागणार आहे. प्रत्येक आवर्तनात सुरुवातीला बिगरसिंचनासाठी (पिण्यासाठी) पाणी देण्यात येणार आहे. रब्बीसाठी उजव्या कालव्यावर साडेतीन हजार तर डाव्या कालव्यावर अडीच हजार हेक्टर क्षेत्राला पाण्याची मागणी आहे. सध्या दारणातून आवर्तन सोडण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!