Monday, April 29, 2024
Homeनगरशिवसेना पदाधिकारी हत्या प्रकरणात वापरण्यात आलेली गाडी ताब्यात

शिवसेना पदाधिकारी हत्या प्रकरणात वापरण्यात आलेली गाडी ताब्यात

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – नागपूर महामार्गावरील तालुक्यातील कीरतपूर शिवारातील एका शेतवस्तीवर आढळून आलेली ती स्विफ्ट गाडी कोपरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. भोजडे ( ता. कोपरगाव) येथील सुरेश गिर्‍हे यांच्यावर रविवारी झालेल्या हल्ल्यात वापरण्यात आलेली ही गाडी वैजापूर पोलिसांनी मंगळवारी कोपरगाव पोलिसांकडे सुपूर्द केली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील कीरतपूर शिवारात रस्त्याच्या बाजूला शेतवस्तीवर एक स्विफ्ट गाडी दोन दिवसांपासून उभी असल्याची माहिती पोलीस पाटील सूर्यकांत मोटे यांनी वैजापूर पोलिसांना दिली. त्यानुसार वैजापूरचे सहायक फौजदार रज्जाक शेख, सागर बोराडे यांनी या वस्तीवर धाव घेत या गाडीची पाहणी केली. रविवारी रात्री सेनेचे कोपरगाव उपतालुकाप्रमुख सुरेश गिर्‍हे यांची सहा जणांनी गोळी झाडून हत्या केली होती. पांढर्‍या स्विफ्ट गाडीतून व मोटरसायकलवरून आलेल्यांनी गोळीबार केल्याचे सुरेश यांच्या नातेवाईकांनी पोलीसांना सांगितले होते.

- Advertisement -

त्यानुसार कोपरगाव पोलीस या दोन्ही वाहनांचा शोध घेत असून लगतच्या सर्व पोलीस ठाण्याला याची माहिती कळविली आहे. दरम्यान कीरतपूर शिवारात स्विफ्ट गाडी उभी असल्याची माहिती वैजापूर पोलिसांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ गाडीची पाहणी करून याबाबत कोपरगाव पोलिसांना कळविले. त्यानुसार कीरतपूर येथे आलेल्या कोपरगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नागरे यांच्या ताब्यात ही गाडी वैजापूर पोलिसांनी दिली. रविवारी रात्री फरार होतांना या गाडीचे चाक पंक्चर झाल्याने ती हल्लेखोरांनी कीरतपूर शिवारात सोडून दिली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

वैजापुरातील बंधूंची कसून चौकशी
भोजडे येथील सुरेश गिर्‍हे यांच्यावर रविवारी झालेल्या हल्ल्याप्रकरणाचे काही धागेदोरे पोलिसांना मिळाले असून वैजापूरमधील एका हॉटेलच्या दोन बंधूंना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या दोघांची रात्री उशीरापर्यंत कसून चौकशी सुरू होती. त्यातून आणखी काही माहिती हाती येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या