Sunday, April 28, 2024
Homeनगरघाटकोपरहून प्रवरानगरला आलेली महिला व मुलगा करोना संक्रमित

घाटकोपरहून प्रवरानगरला आलेली महिला व मुलगा करोना संक्रमित

…तरीही लोणी बुद्रुक होणार आजपासून ‘अनलॉक’

लोणी (वार्ताहर)- घाटकोपर (मुंबई) येथून प्रवरानगर येथे माहेरी आलेली 35 वर्षीय महिला व तिचा 10 वर्षांचा मुलगा करोना पॉझिटिव्ह निघाल्याने लोणीकरांची चिंता वाढली आहे. प्रशासनाने या महिलेच्या संपर्कात आलेल्या सात जणांना क्वारंटाईन केले असून त्यांचे स्राव तपासणीसाठी नगर येथे पाठवले आहेत. दरम्यान सहा दिवसांपासून लॉकडाऊन असलेले लोणी बुद्रुक गाव आजपासून अनलॉक करण्यात येऊन सकाळी 9 ते 5 यावेळेत व्यवहार सुरू करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात कोपरगाव येथील एका शाळेचा व लोणी खुर्द येथे स्थायिक असलेला क्लार्क करोना पॉझिटिव्ह निघाल्याने लोणी खुर्द व बुद्रुक ही दोन्ही गावे लॉक करण्यात आली होती. सुदैवाने त्याच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने लोणीकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र घाटकोपर येथून प्रवरानगर (लोणी खुर्द) येथे एक महिला आपल्या मुलासह माहेरी आली होती. त्या दोघांना दहा दिवस लोणीतील रयतच्या विद्यालयात क्वारंटाईन करण्यात आले. दहा दिवसांनंतर ते प्रवरानगरला गेले. मात्र 3 जून रोजी त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना लोणीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

प्रवरा कोव्हिड 19 सेंटरमध्ये त्यांचे घशातील स्राव घेऊन नगरला तपासणीसाठी पाठवण्यात आले. रविवारी त्यांचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. या महिलेला क्वारंटाईन करण्यात आले तेव्हा तिच्या खोलीत ठेवण्यात आलेल्या एक वृद्ध व्यक्ती व एक मुलगी यांच्या सोबतच महिलेचे दोन भाऊ, त्यांच्या पत्नी, आई व मुले अशा सात जणांना तपासणीसाठी प्रवरेच्या कोव्हिड सेंटरमध्ये पाठवण्यात आले. त्यांच्या स्रावाचे नमुने नगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. बाधित महिला घाटकोपर येथून येताना तिची सासूही सोबत होती. मात्र सासू अकोले तालुक्यातील वाघापूर या आपल्या गावी गेली आणि दोन दिवसांपूर्वी तीही पॉझिटिव्ह निघाली आहे.

या नवीन दोन पॉझिटिव्ह रुग्णांमुळे लोणीकरांची चिंता मात्र वाढली आहे. लोणी खुर्द गाव 14 जूनपर्यंत लॉकडाऊन असून गेल्या सहा दिवसांपासून लॉकडाऊन असलेले लोणी बुद्रुक गाव आज सोमवारपासून अनलॉक करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. सकाळी 9 ते 5 यावेळेत गावातील व्यवहार सुरू राहतील. सलून दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली आहेत. हॉटेल फक्त पार्सल देऊ शकतील. गावातील भाजीपाला विक्री सोमवार, गुरुवार व शनिवार याच दिवशी दु.12 वाजेपर्यंत सुरू राहील. बाहेरगावच्या भाजी विक्रेत्यांना गावात विक्रीसाठी मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्स, मास्क हे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या