Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

घनकचरा व्यवस्थापन निविदा मंजुरीचा ठराव बहुमताने फेटाळला

Share
घनकचरा व्यवस्थापन निविदा मंजुरीचा ठराव बहुमताने फेटाळला, Latest News Garbage Management Tender Rejected Shrirampur

सत्ताधारींसह 24 नगरसेवकांचा विरोध तर नगराध्यक्षांसह 12 नगरसेवकांचे समर्थन

निविदेबाबत विनाकारण राजकारण : अनुराधाताई आदिक
हा तर नगरसेवक पोसण्याचा ठेका : ससाणे गट

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर नगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापनच्या ठेक्यात सुमारे 9 लाख रुपयांची वाढ करून 23 लाख रुपयांचा ठेका 32 लाख रुपयाला देण्यास सत्ताधारी नगरसेवकांसह 24 नगरसेवकांनी विरोध दर्शवला. तर केवळ 12 नगरसेवकांनी त्याचे समर्थन केले. त्यामुळे सदर ठेका रद्द करण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर ओढावली.

काल पालिकेची विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. विषय पत्रिकेवरील विषय क्रमांक 1च्या घनकचरा व्यवस्थापनांतर्गत साफसफाई बाबतची नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण करून घेण्याबाबत सर्व नगरसेवकांच्या घरी सर्क्युलर पद्धतीने जाऊन त्यांची मते घेण्यात आली. या ठेका वाढीच्या निविदेला सत्ताधारी नगरसेवकासह 24 नगरसेवकांनी विरोध केला. तर नगराध्यक्षांसह 12 नगरसेवकांनी याचे समर्थन केले आहे.

ससाणे गटाचे उपनगराध्यक्ष करण ससाणे, पक्षप्रतोद संजय फंड, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे, नगरसेविका सौ. मीरा रोटे, नगरसेवक मनोज लबडे, सौ. आशा रासकर, श्रीमती भारती परदेशी, मुजफ्फर शेख यांनी त्यास विरोध केला. तसेच पालिकेत सत्ताधारी गटास पाठिंबा असलेल्या नगरसेवक अंजुम शेख, राजेश अलघ, ताराचंद रणदिवे, सौ. समीना अंजुम शेख, जायदा कलीम कुरेशी, जयश्री विजय शेळके यांनी याबाबत सध्या काम करत असलेली मे. दिशा एजन्सी, पुणे हे मागील सभेने मंजूर केलेल्या निविदेवरच साफसफाईचे काम करत आहे.

परंतु नगरपालिकेने वाढीव दराने निविदा मंजूर केलेली आहे. सध्या देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली असल्याने वाढीव दराने निविदा मंजूर करण्यात येऊ नये असे, म्हणत त्यात विरोध दर्शवला आहे. घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका कितीही वाढवून दिला तरी शहरात निकृष्ट दर्जाची स्वच्छता आहे. त्यामुळे नगरसेवक जितेंद्र छाजेड यांनी ही सदर ठेक्यास विरोध केला आहे. सदर ठेक्याचे दर कीतीही वाढवले तरीही शहरात स्वच्छतेचा विषय गंभीर बनला आहे. त्यामुळे या वाढीव ठेक्यास नगरसेविका भारती कांबळे यांच्यासह नगरसेविका शीतल गवारे, स्नेहल केतन खोरे, दीपक चव्हाण, वैशाली चव्हाण यांनीही त्यास विरोध दर्शवला आहे.

तसेच वाढीव दराने निविदा मंजूर करून गावाचे नुकसान करू नये, असे प्रसिद्ध करत किरण लुणिया यांनीही त्यास विरोध दर्शवला आहे. तर सत्ताधारी गटाच्या नगरसेविका हेमा गुलाटी यांनी हा विषय चर्चा करून मंजूर करावयाचा असल्याने मी घरी बसून निर्णय देवू शकत नसल्याने सांगून विरोध दर्शविला आहे, तर नगराध्यक्षा अनुराधा अदिक, नगरसेवक शामलिंग शिंदे, अक्सा पटेल, राजेंद्र पवार, प्रणिती दीपक चव्हाण, शाह मुक्तार ताहेर, प्रकाश ढोकणे, चंद्रकला डोळस, सुभाष गांगड, रवी पाटील, शेख निलोफर महम्मद, शेख तरन्नुम रईस आदींनी या निविदा मंजुरीच्या ठरावास समर्थन दिले. यात नगसेवक रवी पाटील यांनी निविदेची रक्कम करून मंजुरी करण्यास संमती दिली आहे.

हा तर नगरसेवक पोसण्याचा ठेका
नगरपरिषदेचा घनकचरा व्यवस्थापन ठेका हा शहर स्वच्छतेचा ठेका नसून नगरसेवक पोसण्याचा ठेका असल्याचा आरोप ससाणे गटाच्या नगरसेवकांनी केला आहे. 2016 साली घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका हा 16 लाख रुपये दरमहा होता. त्यानंतर 2017-18 मध्ये सदर ठेक्यात दरमहा पाच लाख रुपयांची वाढ करुन 22 लाख रुपये करण्यात आला. 22 लाख रुपये प्रतिमहिना ठेकेदाराला देवूनसुद्धा शहर स्वच्छतेचे तीनतेरा वाजलेले आहेत. याबाबत सभागृहामध्ये वारंवार तासन तास चर्चा झाल्या. त्यामध्ये नगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांनी शहर स्वच्छतेबाबत असमाधान व्यक्त केले होते. असे असताना 22 लाख रुपये महिन्यांवरुन 32 लाख रुपये प्रतिमहिना स्वच्छतेचा ठेका देण्याचा घाट नगराध्यक्षांसह काही ठराविक संधीसाधू नगरसेवकांनी घातला आहे असा आरोप करुन हा ठराव बहुमताने फेटाळल्याने सत्ताधारी नगराध्यक्षांचा हा मोठा पराभव असल्याचेही ससाणे गटाने म्हटले आहे.

निविदेबाबत विनाकारण राजकारण
घनकचरा व्यवस्थापणासाठी तुलनात्मकदृष जी कमी दराची निविदा प्राप्त झाली, ती सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आली. सदस्यांनी आपआपली मते मांडलेली आहे. करोनाच्या संकटाच्या काळात आपल्या सफाई कर्मचार्‍यांनी अतिशय उत्कृष्ट कार्य केलेले आहे. नवीन एजन्सीस या सर्व कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढ करण्यास कामगार प्रतिनीधींशी चर्चा करुन सुचविलेले आहे. करोनाचे संकट सर्वांसमोर असतांना विनाकारण या निविदेबाबत राजकारण करण्यात आले आहे. मी श्रीरामपूर शहरवासीयांच्या आरोग्यासाठी चांगलाच निर्णय घेईल, कारण माझी बांधिलकी जनतेशी आहे.
– अनुराधाताई आदिक, नगराध्यक्षा, श्रीरामपूर न.पा.

मी घरी बसल्या सर्क्युलर पद्धतीच्या या विशेष सभेमधे या महत्त्वाच्या विषयाबाबत निर्णय देऊ शकत नाही. जनतेचे आरोग्य हे अति महत्त्वाचा विषय असून याबाबत सर्क्युलर मिटिंगचा हा विषय मला मान्यच नाही. आरोग्य या विषयाबाबत सर्व सदस्यांच्या समोर सर्व समस्यांबाबत साधक-बाधक चर्चा होऊनच आरोग्याच्या ठेक्याचा विषय घेतला गेला पाहिजे. म्हणून त्वरित सर्वसाधारण सभा बोलावून घेऊन हा विषय सर्वसाधारण सभेमध्ये घेऊनच मंजूर करण्यात यावा.
– सौ. हेमा रवींद्र गुलाटी, नगरसेविका.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!