अजून किती बळी गेल्यावर बिबट्याचा बंदोबस्त करणार ?

jalgaon-digital
4 Min Read

गळनिंब येथील घटनेच्या निषेधार्थ वनविभाग व महावितरण विरोधात रास्ता रोको

गळनिंब (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील तीन वर्षाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या भागातील ही दुसरी घटना असल्याने अजून किती बळी गेल्यानंतर वनविभागाला जाग येणार, असा संतप्त सवाल करीत गळनिंब-कोल्हार रस्त्यावर गळनिंब, कुरणपूर, फत्याबाद, मांडवे, कडित, कडित, खुर्द, तांबेवाडी, चांडेवाडी, उक्कलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गळनिंब-कोल्हार रस्त्यावर अडीच तास रस्तारोको करत ठिय्या ठिय्या मांडला. ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा उचलत वनविभाग व महावितरणच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले. तर घटनेमुळे गळनिंब गाव बंद ठेवण्यात आले होते.

गळनिंब येथे शुक्रवारी सायंकाळी नामदेव मारकड यांच्या वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात ज्ञानेश्वरी नामदेव मारकड हिचा मृत्यू झाला.
या परिसरामध्ये सातत्याने बिबट्यांचा वावर असतानाही वनविभाग बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पावले उचलत नाही. काही दिवसांपूर्वी दर्शन देठे या बालकांच्या मृत्यूच्या घटनेने परिसराला धक्का बसलेला असतानाही त्या धक्क्यातून सावरत असतानाच ही दुसरी घटना घडली.

त्यामुळे वन विभागाच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले होते. काल सकाळ पासूनच गळनिंब-कोल्हार रस्त्यावर गळनिब, कुरणपूर, फत्याबाद, मांडवे, कडीत, कडीत खुर्द, तांबेवाडी, चांडेवाडी, उक्कलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अडीच तास रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी गळनिंब पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी वनाधिकारी कर्मचार्‍यांच्या आणि महावितरणाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत वनविभाग व महावितरणचा विरोधात घोषणाबाजी करीत संताप व्यक्त केला.

घटनेची माहिती कळताच आमदार लहू कानडे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, प्रांताधिकारी अनिल पवार, अर्थ बांधकाम माजी सभापती बाबासाहेब दिघे, मार्केट कमिटीचे माजी सभापती सचिन गुजर, नायब तहसीलदार बापूसाहेब तेलोरे, लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, एपीआय एस. बी. सुर्यवंशी, गवांदे, आहेर, भोसले पोलीस पथकासह वनविभागाचे अहमदनगर वरिष्ठ अधिकारी आर. जी. देवखिळे, कोपरगाव वरिष्ठ वनक्षेत्रपाल एस. एम. जाधव. वन अधिकारी बी. एस. गाढे, महावितरणचे शरद बंड आदी दाखल झाले होते.

बेजबाबदारपणाच्या वनाधिकार्‍याला तातडीने निलबिंत करा, दोषी अधिकार्‍यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, शेतकर्‍यांना दिवसाची थ्री फेज वीज देऊन रात्रीला सिंगल फेज द्यावी, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी महावितरणकडे केली. या सुधारणा न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता नगर-मनमाड रस्त्यावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी महावितरण व वन विभागाच्या अधिकार्‍यांना दिला आहे आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाल्याने गळनिंबसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करत गळनिंब गाव बंद ठेवून निषेध व्यक्त केला. या भागात एक बिबट्या नसून दहा ते पंधरा बिबटे आहे. परिसरात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने बिबट्या वावर मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे असल्याची मागणी करण्यात आली.
यावेळी आमदार लहू कानडे म्हणाले, वेळोवेळी बिबट्याच्या हल्ल्याच्या गंभीर घटना घडत आहे. या प्रश्नाकडे तातडीने लक्ष घालत विधानसभेत प्रश्न मांडू तसेच विलंब न करता ग्रामपंचायतीने प्रस्ताव तयार करुन आमदार निधीतून गळनिंबच्या वाड्या-वस्त्यांवर 25 ते 30 पथदिवे बसविण्यात येतील याची तातडीने अंमलबजावणी करु असे आश्वासन दिले.

तर तातडीची मदत म्हणून मृत पावलेल्या ज्ञानेश्वरी मारकड या मुलीच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत करण्यात येईल असे सहायक वनसंरक्षक अधिकारी देवखिळे यांनी सांगितले. तर गळनिंब सह परिसरात पिंजरे, टॅप कॅॅमेरे, दोन वाहनांसह वनकर्मचारी यांची तातडीने नेमणूक करण्यात येईल. तसेच वन संरक्षण अधिकारी देवखिळे यांनी वनविभागाच्या दोषी अधिकार्‍यांवर तातडीने निलंबनाची कारवाईचा प्रस्ताव दाखल करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.

गळनिंब भागातील ओव्हर लोड प्रमाण जास्त असल्याने नियमित विद्युत पुरवठा होत नाही. येथील काही भागातील लोड कमी करुन इतर सबटेशनमधून जास्त विद्युत पुरवठा घेतला जाईल व नियमित विद्युत पुरवठा सुरळीत करु असे महावितरणचे अधिकारी शरद बंड यांनी सांगितले.

बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव प्राणी मृत पावल्यानंतर पंचनामा करण्याकरिता शेतकर्‍यांकडून पैसे घेतले जातात. पंचनामे करण्यासाठी पैसे का घेतले जातात, ते घेणारा मधला दलाल कोण ते सांगा? अशी काही ग्रामस्थांनी वनविभागाकडे विचारणा केली. तर गळनिंब परिसरातील अशी व्यक्ती कोण? अशी चर्चा आंदोलन झाल्यानंतर सुरू होती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *