Saturday, April 27, 2024
Homeनगरगडाखांना कॅबिनेट, तनपुरेंना राज्यमंत्रिपद

गडाखांना कॅबिनेट, तनपुरेंना राज्यमंत्रिपद

अजितदादा चौथ्यांदा उपमुख्यमंत्री : खातेवाटपाबाबत उत्सुकता : आज-उद्या जाहीर होण्याची शक्यता

मुंबई – उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 32 दिवसांनंतर ठाकरे सरकारचा पहिला विस्तार पार पडला. विधानभवन परिसरात महाविकास आघाडीच्या 36 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 36 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली.

- Advertisement -

यात नगर जिल्ह्यातील नेवाशाचे ‘क्रांतिकारी’चे आमदार शंकरराव गडाख यांनी कॅबिनेट पदाची तर राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्रिपदाची शपथ घेतल्याने जिल्ह्यातील मंत्र्यांची संख्या तीन झाली आहे. शंकरराव गडाखांच्या रुपाने नेवाशाला आणि प्राजक्त तनपुरेंच्यारूपाने राहुरीला प्रथमच मंत्रिपद मिळाल्याने दोन्हीही तालुक्यांत समर्थकांनी जल्लोष केला.

काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विस्तारामध्ये राष्ट्रवादीच्या 14, शिवसेनेच्या 12, तर काँग्रेसच्या 10 मंत्र्यांनी शपथ घेतली. अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, आदित्य ठाकरे यांच्यासह 36 मंत्र्यांचा शपथविधी झाला. यावेळी मंत्र्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.

विस्तारामध्ये राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मिळाली आहेत. आतापर्यंत तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोघांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांचे अनुक्रमे 16-14-12 अशी मंत्रिपदं आहेत.या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचेच वर्चस्व दिसते.

दरम्यान, उद्या अथवा परवा खातेवाटप जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली आहे. कुणाला कोणते खाते दिले जाते याबाबत उत्सुकता आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- मंत्री शंकरराव गडाख यांची प्रतिक्रिया

अहमदनगर (प्रतिनिधी)- आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यावेळी मी कोणत्याही पदाची अपेक्षा व्यक्त केली नव्हती. पण शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला मंत्रिपदाचा शब्द दिला होता. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी तो शब्द पाळला आणि मला कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली.

त्यांनी माझ्यावर व्यक्त केलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली आहे. मंत्री शंकरराव गडाख म्हणाले, माझे वडिल यशवंतराव गडाख यांनी राजकारणात चार दशके काम केले. आयुष्यभर नवनिर्मिती करून त्यांनी हजारो संसार फुलविले. सर्वसामान्यांच्या, शेतकर्‍यांच्या समस्या सोडवितांना त्यांनी समाजाला सांस्कृतिक विकासाचा वारसाही दिला. मला मिळालेले मंत्रीपद हा त्यांनी घेतलेले कष्ट आणि त्यांची पुण्याई यांचे प्रतीक आहे. त्यांचा संस्कार आणि वारसा यांचा मला कधीही विसर पडणार नाही. गडाखसाहेबांच्या संपूर्ण पिढीच्या या ऋणातून उतराई होण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन.

आपल्या पुढील राजकीय भूमिकेविषयी बोलतांना मंत्री गडाख म्हणाले, विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातून शिवसेनेचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. जिल्ह्यातील पक्षाचे संघटनही विस्कळीत झाले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या संधीमुळे जिल्ह्यातील पक्षाचे संघटन वाढविणे व कार्यकर्त्यांना बळ देणे ही आपली प्राथमिकता असणार आहे. या पदामुळे नेवासा तालुक्याला पहिल्यांदाच मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. मी नेवासा तालुक्यातील मतदारांचा व कार्यकर्त्यांचा मन:पुर्वक आभारी आहे. आता माझ्यावर राज्याची जबाबदारी असणार आहे. नेवासा तालुक्यातील सुजाण जनता मला या कामात निश्चित सहकार्य करील आणि माझ्यावरचा विश्वास कायम ठेवील, याची खात्री आहे.

जिल्ह्यातील प्रश्न शंकरराव ताकदीने सोडवतील

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केला विश्वास

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वतंत्र्यानंतर पहिल्यांदा ना. शंकरराव गडाख यांच्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या रुपाने नेवासा तालुक्याला न्याय मिळालेला आहे. इतक्या वर्षात पहिल्यांदा नेवासा तालुक्याचा मंत्रिमंडळात समावेश झालेला असून त्याचा आनंदच आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजयी होऊन एवढे मोठे पद मिळणे कठीणच असते. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शंकरराव गडाख यांच्यावर मोठा विश्वास टाकला असून हा विषय ते सार्थ ठरवतील. मिळालेल्या मंत्रीपदाच्या माध्यमातून शंकरराव हे जिल्ह्यातील महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी ताकदीनी प्रयत्न करतील. विशेषत: पश्चिमेला घाटमाथ्यावरून वाया जाणारे पाणी जिल्ह्यात आणण्यासाठी ते मंत्रिपदाच्या माध्यमातून प्रयत्न करत, असा विश्वास ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व्यक्त केला आहे.

गतवैभव प्राप्त होईल
राहुरीला मंत्रिपद मिळावे ही तालुक्यातील व मतदार संघातील जनतेची इच्छा होती. ती पवार साहेबांनी पूर्ण केली. गेल्या 15 वर्षांपासून जी मतदार संघाची अधोगती झाली त्यासाठी या मंत्रिपदाच्या माध्यमातून संपूर्ण मतदार संघाला गतवैभव प्राप्त होईल.
-डॉ. उषाताई तनपुरे, माजी नगराध्यक्षा.

संधीचं सोनं करणार
राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील जनतेने अभुतपूर्व विश्वास दाखविल्याने देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेबांनी जी संधी दिली त्या संधीचे सर्वांच्या सहकार्याने सोने करतानाच पाच वर्षात राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघाचा कायापालट करून मॉडेल मतदार संघ करू.
– ना. प्राजक्त तनपुरे

महाआघाडीच्या सरकारमध्ये घराणेशाही जिंदाबाद

पिता-पुत्र एकाच मंत्रिमंडळात प्रथमच, मामा-भाचे, मामासासरे-भाचेजावईही

मुंबई- महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात घराणेशाहीचा वरचष्मा पाहायला मिळाला. तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र, या सत्तेत सामान्य आमदारांना मंत्रिपद देण्याऐवजी सत्तेतील सोयरे सकळ, खूश राहतील याची काळजी घेण्यात आली आहे. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सोयर्‍यांचा गोतावळा पाहायला मिळत आहे.

‘सत्तेतील सोयरे सकळ’, या उक्तीची सार्थ प्रचिती मंत्रिमंडळाच्या विस्तारात पाहायला मिळाली आहे. पिता-पुत्र एकाच मंत्रिमंडळात असल्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात कदाचित पहिल्यांदा पाहायला मिळाले आहे. ठाकरे पितापुत्राने एकत्रितपणे संसदीय राजकारणात पदार्पण केले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे राहुरीचे प्राजक्त तनपुरे भाचे आहेत.

मंत्रिपदाच्या यादीत अकोलेचे आमदार लहामटे यांचे नाव होते. पण जयंत पाटलांनी आपल्या भाच्यासाठी आग्रह धरल्याने पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर विधानसभेत पाऊल ठेवणार्‍या माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव प्राजक्त तनपुरे यांना मंत्रिपदाची संधी मिंळाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचेजावई असलेले शंकरराव गडाख यांचीही मंत्रिपदी वर्णी लागली आहे.
आदित्य ठाकरे यांची शिवसेनेने थेट कॅबिनेटमंत्रिपदी वर्णी लावली आहे. मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे ही ठाकरेशाही सत्तेत चांगलीच रमली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घराणेशाहीवर नेहमीच टीका केली. मात्र, प्रिन्स सूटमधल्या आदित्य ठाकरेंनी शिवसेनेतल्या घराणेशाहीवर शिक्कामोर्तब केल्याचे शपथविधी सोहळ्यात दिसून आले.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव लातूर मतदारसंघातून सलग तिसर्‍यांदा निवडून आले. आणि तिसर्‍यावेळी थेट कॅबिनेटमंत्रिपदापर्यंत अमित देशमुख पोहोचले.

दोन वेळा मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणारे अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र होय. बालपणापासून सत्तेचे खेळ आणि कायम सत्तेच्या विविध पदांवर असणारे अशोक चव्हाण सकळ सत्तेचे कायमचेच सोयरे आहेत, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.

गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि पंकजा मुंडेंचे चुलत बंधू असलेले धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या मुशीत तयार झाले. भाजयुमोमध्ये मोठी जबाबदारी त्यांनी सांभाळली. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि आता कॅबिनेट मंत्रिपदावर त्यांनी झेप घेतली.

जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत बडे नेते अंकुशराव टोपे यांचे पुत्र राजेश टोपे आघाडी सरकारमध्येही मंत्री होते. अंकुशराव टोपे आमदार आणि खासदार म्हणून निवडून आले होते.

काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र असलेले विश्वजीत कदम यांनी राज्य काँग्रेसमध्ये अनेक जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत. भारती विद्यापीठाचे सचिव असलेले विश्वजीत कदम राज्यातल्या बड्या राजकीय कुटुंबातून येतात.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांची कॅबिनेटमंत्रिपदी वर्णी लागली आहे. धारावी मतदारसंघातून सातत्याने निवडून येणार्‍या वर्षा गायकवाडांना काँग्रेसने संधी दिली आहे. मात्र, मुंबईतून प्रतिनिधीत्व देताना काँग्रेसने घराणेशाहीच कायम ठेवली.

खासदार आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे पहिल्यांदाच निवडून येऊन थेट राज्यमंत्री बनल्या आहेत. रायगड जिल्ह्यातले बडे प्रस्थ असलेल्या तटकरे कुटुंबानंही घराणेशाहीलाच प्राधान्य दिल्याचे दिसून येते.

अजितदादा चौथ्यांदा उपमुख्यमंत्री अनोखा विक्रम नावावर
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार चौथ्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. यासोबत अजित पवारांच्या नावे तीन वेगवेगळ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद भूषवण्याचा अनोखा विक्रमही रचला गेला आहे.
आधी काँग्रेस, त्यानंतर भाजप आणि आता शिवसेना अशा तीन विविध पक्षांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा विक्रम अजित पवारांनी नोंदवला आहे. अवघ्या सव्वा महिन्यांच्या कालावधीत अजित पवारांनी दुसर्‍यांदा शपथ घेतली. विशेष म्हणजे दोन्ही वेळा अजित पवारांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंत्रिपदाची शपथ दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या