Saturday, April 27, 2024
Homeनगरपाथर्डी : फुंदेटाकळीत एक संशयित; तपासणीसाठी नगरला

पाथर्डी : फुंदेटाकळीत एक संशयित; तपासणीसाठी नगरला

मोहोज देवढे येथील 25 जणांना पाथर्डीत केले क्वारंटाईन

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)- पाथर्डी तालुक्यात राज्यातील विविध भागातून ऊसतोड मजूर परतले असून यातील बहुतांशी मजुरांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तालुक्यातील फुंदेटाकळी येथे सोमवारी दुपारी एक 30 वर्षीय ऊसतोड मजूर करोना संशयित आढळून आल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, मोहोज देवढे येथील पंचवीस जणांना पाथर्डीत क्वारंटाईन करण्यात आले आहे.

- Advertisement -

राज्यातील ऊसतोड मजुरांना घरी पाठविण्याबाबत राज्य शासनाचा आदेश झाल्यानंतर पाथर्डी तालुक्यात राज्यातील विविध भागांमधून 1430 ऊसतोड मजूर गावांकडे परतले आहेत. या मजुरांना शासनाच्या आदेशप्रमाणे घरी जाऊ न देता गावातील शाळेत किंवा इतर ठिकाणी क्वारंटाईन करणे गरजेचे आहे. मात्र अशा ठिकाणी स्वच्छतागृहांची सुविधा तसेच सध्या चालू असलेल्या उन्हाळ्यामुळे उकाडा सहन होत नसल्यामुळे बहुतांशी ऊसतोड मजुरांना आरोग्य विभागाकडून घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांकडून तसेच गावातील आशा सेविकांकडून त्यांच्या हातावर शिक्के मारण्यात आलेले आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे व आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, सोमवारी दुपारी फुंदेटाकळी येथे पुणे जिल्ह्याती विघ्नहर साखर कारखान्याहून दहा ते बारा दिवसांपूर्वी आलेल्या एका 30 वर्षीय ऊसतोड मजुराला घशामध्ये त्रास होत असल्याचे आढळले. त्याला पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणले. संबंधित रुग्णाला करोना सदृश्य लक्षणे आढळल्यामुळे अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात चाचणीसाठी पाठविले आहे. याबाबत आरोग्य विभागाकडून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दरम्यान, मोहोज देवढे येथील 25 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयातून सोमवारी दुपारी पाथर्डी येथे आणले. त्या सर्वांना गायछाप कारखान्याजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. मोहोज देवढे येथील रुग्णाच्या संपर्कातील 27 लोकांची चाचणी करण्यात आली होती.

त्यापैकी 25 लोकांचे निगेटिव्ह अहवाल रविवारी रात्री आले. त्यांच्यावर डॉ. महेंद्र बांगरसह आरोग्य विभागातील कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. पालिकेचे प्रशासकीय अधिकारी अय्युब सय्यद व पालिकेचे कर्मचारी त्यांना मदत करत आहेत. तसेच श्री तिलोक जैन विद्यालयात कोविड-19 सेंटरमध्ये राजस्थानहून आलेल्या चार जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या