Friday, April 26, 2024
Homeनगरपरदेशी नागरिकांना रूग्णालयातून सुटताच अटक

परदेशी नागरिकांना रूग्णालयातून सुटताच अटक

पोलीस तयारीत : व्हिसाच्या उद्दीष्टाचे उल्लंघनासह इतर गुन्हे

अहमदनगर (प्रतिनिधी)- तबलिगी जमातीच्या कार्यक्रमासाठी परदेशातून आलेल्या 29 नागरिकांवर व सहा परराज्यातील नागरिकांवर अटकेची टांगती तलवार आहे. पर्यटन व्हिसा असताना या सर्वांनी धर्मप्रसार केला, तसेच जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, काहींना क्वारंटाईन केले आहे. यांची रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर सर्वांच्या हाती बेड्या पडणार आहेत. तशी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करत आहे.

- Advertisement -

दिल्ली येथे तबलिगी जमातीच्या कार्यक्रमासाठी अनेक परदेशी व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्यांनी संपूर्ण भारतात प्रवास केला. त्यात जगभर कोरोना संसर्गने धुमाकूळ घातला आहे. याच परदेशी नागरिकांमधील जिबुती, बेनिन, डिकोटा, आयव्हरी कोस्ट, घाना, इंडोनेशिया, ब्रुनई या देशातील 29 नागरिकांनी नगर शहरासह, नेवासा, जामखेड येथील धार्मिकस्थळी वास्तव्य केले. त्यातील चौघांना कोरोना झाला आहे. तसेच, त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली.

यामुळे परदेशी नागरिकांसह त्यांना आश्रय देणार्‍याविरुद्ध भिंगार, नेवासा, जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या सर्व परदेशी नागरिकांनी व्हिसाचा गैरवापर केल्याचे पोलीस तपासात सिद्ध झाले आहे. या सर्वांना पर्यटन व्हिसा दिलेला असताना यातील अटींचे उल्लंघन करून त्यांनी धर्मप्रसार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यामुळे नगरला आलेल्या 29 परदेशी व सहा भारतीयांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. परदेशी नागरिकांचे पासपोर्ट, व्हिसा व इतर कागदपत्रे पोलिसांनी तपासले आहेत.

यामुळे त्यांच्या विरुद्ध परदेशी नागरिक कायदा, भारतीय साथरोग प्रतिबंधक कायदा, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करणे आदी कलमान्वये गुन्हे नोंदविले आहे. देशातील काही भागात परदेशी नागरिकांना अटक झाली आहे. नगरमध्ये आढळलेले सर्व परदेशी नागरिक कोरोनामुक्त झाल्यानंतर पोलीस प्रशासन पुढील कारवाई करणार आहे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दाखल गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन अधिकार्‍यांकडे दिला आहे. याबाबत परदेशी नागरिकांच्या भारतीय दूतावासाशी पत्रव्यवहार झाला आहे. या सर्वांची रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर अटक केली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या