Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

सोनईत आगीचे तांडव, जिवीतहानी टळली

Share

स्टेशनरी दुकानासह गोडावून व राहते घर खाक, एक ते दीड कोटीच्या नुकसानीचा अंदाज

सोनई (वार्ताहर) –  नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुख्य बाजारपेठेतील एकाच इमारतीतील जनरल स्टोअर्स, राहते घर व गोडावून यांना लागलेल्या आगीत सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले.

सोनईतील मुख्य बाजारपेठेतील तीन मजली इमारतीत दिलीप चंगेडीया यांचे खालच्या मजल्यावर मनोज जनरल स्टोअर्स हे स्टेशनरी दुकान, दुसर्‍या व तिसर्‍या मजल्यावर दुकानाचे गोडावून व राहते घर होते. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास खालच्या मजल्यावरील जनरल स्टोअर्स दुकानाला आग लागली. या आगीत चंगेडिया यांचे स्टेशनरी दुकान, गोडावून व राहते घर असे तीनही मजले खाक झाले.

यात सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सकाळी 8 वाजता आग लागल्याने पेठेत एकच खळबळ उडाली. इमारतीतून धुराचे लोळ व अग्नी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी गर्दी हटविण्याचा प्रयत्न केला परंतु धुराचे लोळ आकाशात उंचच उंच उठलेले असल्याने सर्व बाजूचे लोक आग पाहण्यासाठी येत होते. मुख्य बाजारपेठेत जवळपास सर्व इमारती दुमजली आहेत. चंगेडिया यांच्या दुकानाचा खालचा मजला अगोदरच पेटला. शेजारी व ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

परंतु वह्या-पुस्तके, स्टेशनरी, प्लास्टिक इत्यादी सर्व ज्वालाग्रही वस्तूंनी पेट घेतल्याने आग भडकत राहिली. दुकानाचे दुसरे व तिसरे मजल्यावर गोडाऊन व निवास व्यवस्था होती. आग तिनही मजल्यावर पोहोचली. शनैश्वर देवस्थान, मुळा कारखाना, भेंडा कारखाना, अहमदनगर महानगरपालिका, देवळाली प्रवरा नगरपालिका, राहुरी नगर नगरपालिका, श्रीरामपूर नगरपालिका अशा 7 अग्निशामक दलाचे युनिट घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु सतत 3 तास ही आग धुमसत होती .

अहमदनगरचे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार रुपेश सुराणा, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, सोनईचे सहायक निरीक्षक जनार्दन सोनवणे, ज्ञानेश्वर थोरात, तलाठी श्री. जायभाय यांच्यासह एस. आर. पी. प्लाटून घटनास्थळी आलेले होते.

अग्निशामक दलाचे युनिटांनी सतत 3 ते 4 तास अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सकाळी 8 वाजता लागलेली आग दुपारी 12 चे दरम्यान आटोक्यात आली.
जिल्हा परिषद अर्थ समितीचे सभापती सुनील गडाख, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुगळे हे घटनास्थळी उपस्थित होते. आग नेमकी कशामुळे लागली याची निश्चित माहिती मिळू शकली नाही. मात्र विजेच्या शॉर्टसर्किटने आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार 1 ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुर्दैवी घटना
सोनई बाजारपेठेत लागलेली आग ही दुर्दैवी घटना आहे. सर्वांनीच आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले म्हणून जवळपासची दुकाने वाचू शकली.
-ना. शंकरराव गडाख जलसंधारण मंत्री

आगीचे निश्चित कारण समजू शकलेले नसले तरी ही आग दिवसा लागली म्हणून आजूबाजूची दुकाने वाचली; अन्यथा या आगग्रस्त दुकानाशेजारी असलेली कापड दुकाने, ज्वेलर्सची दुकानासह सर्व दुकानांना आग लागण्याची शक्यता होती. परंतु सुदैवाने आग दिवसा लागली म्हणून मोठी वित्त व जीवितहानी टळली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!