Friday, April 26, 2024
Homeनगरउत्पादन शुल्कच्या ‘त्या’ अधिकार्‍याविरूद्ध गुन्हा दाखल

उत्पादन शुल्कच्या ‘त्या’ अधिकार्‍याविरूद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना संशयित म्हणून रविवारी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या राज्य उत्पादन शुल्कच्या दुय्यम निरीक्षकांनी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनाच शिवीगाळ करत धमकी दिली. क्वारंटाईनचा आदेश असतानाही रुग्णालयातून गायब झाले. सोमवारी वरिष्ठांनी लेखी आदेश दिल्यानंतर हे निरीक्षक सोमवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. परंतु, तपासणी दरम्यान डॉक्टर व कर्मचार्‍यांना शिवीगाळ व धमकी केल्याप्रकरणी दुय्यम निरीक्षकांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर असलेले डॉ. श्रीकांत पाठक यांनी फिर्याद दिली आहे.

रविवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात डॉ. पाठक व आरोग्य कर्मचारी कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करत होते. त्यावेळी राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक कोरोना संशयित म्हणून तपासणीसाठी दाखल झाले. ते पुणे येथून आले असल्याने व त्यांना खोकला व ताप येत असल्याने डॉ. पाठक यांनी त्यांचे स्त्राव घेतले. त्यांची तपासणी झाल्यानंतर क्वारंटाईनचे आदेश देण्यात आले. परंतु, याचा राग संबंधित दुय्यम निरीक्षकांना आला. याच रागातून त्यांनी डॉ. पाठक व इतर कर्मचार्‍यांना शिवीगाळ करून धमकी दिली.

- Advertisement -

मोठ मोठ्याने आरडाओरडा करून डॉ. पाठक यांच्या कामात अडथळा निर्माण केला. कोरोना संसर्गाचे लक्षणे असल्याने संशयित निरीक्षकांपासून त्यांच्या कुटुंबाला व इतरांना धोका निर्माण होऊ शकतो, हे माहिती असतानाही व क्वारंटाईनचा आदेश असतानाही रविवारी ते निघून गेले.

कोरोना संशयित दुय्यम निरीक्षक रुग्णालयातून निघून गेल्याने तोफखाना पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्कच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना लेखी पत्र दिले. या वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्वतः दुय्यम निरीक्षकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचे लेखी आदेश दिले. लेखी आदेश मिळाल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. आता त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दरम्यान, तपासणी दरम्यान शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी व जिल्हाधिकारी यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दुय्यम निरीक्षकांविरुद्ध भादंवि कलम 270, 186, 188, 504, 506, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 ब, महाराष्ट्र कोव्हिड उपाययोजना नियम 11 साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम 1897 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घायवट करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या