Saturday, April 27, 2024
Homeनगरफायनान्स कंपनीचे हप्ते भरण्यासाठी कर्जदारांमागे तगादा

फायनान्स कंपनीचे हप्ते भरण्यासाठी कर्जदारांमागे तगादा

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)- कोरोनाने थैमान घातले असल्याने संपूर्ण देशात संचारबंदी, लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात जनतेला घरातच बसून राहावे लागत असल्यामुळे आर्थिक ताण निर्माण होणार आहे. शासनाने कोणत्याही बँकेचे अथवा फायनान्सचे तीन महिने हप्ते भरण्यासाठी वाढीव मुदत दिली असल्याचे सांगितले जात असले तरी श्रीगोंदे तालुक्यात फायनान्स कंपन्यांनी लोकांना गृहउपयोगी वस्तू घेण्यासाठी दिलेल्या कजार्या वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. आता हप्ता आणि त्याचा दंड दोन्ही भरण्यासाठी कंपनीने वसुलीसाठी नेमलेल्या पंटरचे फोनवर फोन कर्जदाराला हैराण करत आहेत.

श्रीगोंदे शहरात फायनान्सचे कार्यालय आहे. या फायनान्सकडून अनेकांनी वस्तू खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले आहे. या कर्जाची वसुली दर महिन्याला ग्राहकांच्या बँक खात्यातून केली जात आहे. बँकेतून हप्ता वसूल करण्याच्या तीन ते चार दिवस अगोदर व्हाट्सएपला सारखे मेसेज टाकत असतात, परंतु गेली एक ते दोन महिन्यांपासून कोरोना व्हायरस विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे शासनाने महामारी घोषित केली आहे. त्यातच भारत सरकारनेसुद्धा या महामारीमुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे सर्व काम धंदे बंद पडले आहेत.

- Advertisement -

रोजगार बंद झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्याने म्हणून शासनाने तीन महिने कोणत्याही बँकेचे अथवा खासगी फायनान्सचे कर्ज असल्यास ते पुढील तीन महिने भरू नका अथवा बँकांनी किंवा खासगी फायनान्सने तगादा लावू नये, असे स्पष्ट सांगितले आहे. असे असताना देखील श्रीगोंदे तालुक्यात फायनान्स कंपन्यांनी कर्जदारांकडून वसुलीसाठी कोणत्याही प्रकारचा अगोदर मेसेज न टाकता थेट त्याच्या वसुली करणार्‍या पंटरकडून ग्राहकांना फोन येत आहेत. ‘तुमचा हप्ता बाऊन्स झाला आहे.

तुम्ही लगेच दंडाच्या रकमेसह हप्ता भरा, नाहीतर तुमचे सीबील खराब होईल.तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जाईल, अशी तंबी दिली जात आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेकांनी फायनान्स कंपन्यांचा आणि फोन करणार्‍या पंटरचा धसका घेतला आहे. त्यात कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने बाहेर जाता येत नाही, कुणाकडे पैसे उसने मागता येत नाहीत.

या फायनान्सच्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यामध्ये जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालावे आणि फायनान्सची वसुली करणार्‍यांना समज द्यावी, अशी श्रीगोंदे तालुक्यातील लोकांची मागणी आहे. लॉकडाऊन झाल्यावर सर्वसामान्य जनतेवर आर्थिक ताण होऊ नये म्हणून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ‘कुणीही बँकेचे अथवा खासगी फायनान्सचे हप्ते तीन महिने भरू नये, कुणी मागितले तर मला फोन करा,’ असे सांगितले होते. या पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी याची दखल घेत फायनान्स कंपन्याकडून होणारी पिळवणूक थांबविण्याची मागणी होत आहे.

हप्त्याची अडचण तिथे दंडाची भर
याबाबत शहरात अनेक कर्जदारांनी सांगितले की, लॉकडाऊन असल्याने घराच्या बाहेर पडता येत नाही. यांचे हप्ते भरण्याची इच्छा असताना घरात बंद असल्याने हप्ते थकले आहेत. वेळेवर हप्ता भरला नाही तर फायनान्स कंपनी आकारत असलेला दंड अनेकांना परवडत नाही. त्यात आता चालू हप्ते भरता आले नाहीत. हप्त्यात दंडाची अधिकची भर पडली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या