अकोलेत वर्षात 460 महिलांच्या प्रसूती व 127 शस्त्रक्रिया

अकोले (प्रतिनिधी) – रुग्णांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन काम करणार्‍या अकोले ग्रामीण रुग्णालयात जानेवारी ते डिसेंबर 2019 पर्यंतच्या एका वर्षात 460 महिलांच्या प्रसूती व 127 प्रसूती शस्त्रक्रिया (सिझर) यशस्वी पार पडल्या आहेत. आर्थिक परिस्थिती चांगले असणारे रुग्णही आता उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात येत असल्याचे चित्र दिसत आहेत.

अकोले तालुक्यात ग्रामीण रुग्णालयांना अपुर्‍या सोयी सुविधा असतांनाही वैद्यकीय अधिकारी व अन्य डॉक्टर्सच्या चांगल्या सेवेमुळे रुग्णांचा कल ग्रामीण रुग्णालयाकडे वाढला आहे. अकोले ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे ही अनेक वर्षांपासून अकोलेकरांची मागणी आहे. तसा प्रस्तावही शासनाला सादर करण्यात आला आहे. मात्र अद्याप शासनाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा अकोले ग्रामीण रुग्णालयास देण्यासाठी मुहूर्त सापडत नसल्याचे चित्र दिसत आहे.

शासनाकडून आवश्यक सोयी-सुविधा, औषधे वेळेत अकोले ग्रामीण रुग्णालयाला उपलब्ध होत नाहीत, तरी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय घोगरे व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. बाळासाहेब मेहेत्रे यांच्या सेवाभावी वृत्तीने काम करण्याच्या पद्धतीने या रुग्णालयात येणार्‍या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

गोरगरीब महिलांसह सर्वसामान्य कुटुंबातीलही महिलाही या ठिकाणी प्रसूतीसाठी येतात. गेल्या काही वर्षापासून या रुग्णालयात अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया होत आहेत. मागील वर्षी जिल्ह्यात सर्वाधिक प्रसूती शस्त्रक्रिया व प्रसूती पश्चात तांबी बसविणे यात जिल्ह्यात दुसरा क्रमांक होता. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक विभागाने अकोले ग्रामीण रुग्णालयाला पुरस्कारही दिला होता.

चालू वर्षीही जानेवारी ते डिसेंबर 2019 या वर्षभरात महिलांच्या प्रसूती व सिझर (प्रसूती शस्त्रक्रिया), कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, हर्निया, अपेंडिक्ससह इतर शस्त्रक्रिया, गर्भ पिशवी काढणे, गर्भ पिशवीला टाका टाकणे, कॉपर टी (तांबी) बसवणे, प्रसूती पश्चात कॉपर टी (तांबी) बसवणे, सुरक्षित गर्भपात करणे अशी मोठमोठ्या शस्त्रक्रिया वर्षभरात रुग्णालयात झालेल्या आहेत.

अकोले ग्रामीण रुग्णालयात अधिकारी चांगली सेवा रुग्णांना देत असताना स्वच्छतेबाबत मात्र रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक समाधानी दिसत नाहीत. याकडे वैद्यकीय अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळविण्यासाठी आ. डॉ. किरण लहामटे यांनी शासनाकडे प्रयत्न करण्याची गरज तालुक्यातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

अकोले ग्रामीण रुग्णालयात गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरिकांचा कल वाढला आहे. महिलांची सुरक्षित प्रसूती होत असल्याने प्रसूतीसाठी सरकारी रुग्णालयात येण्याचे महिलांचे प्रमाण वाढले आहे. तसेच गरज असलेल्या महिलांची सिझरही रुग्णालयात केले जाते.
डॉ. बाळासाहेब मेहेत्रे, स्त्रीरोग तज्ज्ञ (सर्जन) ग्रामीण रुग्णालय, अकोले.

अकोले ग्रामीण रुग्णालयाचे काम अतिशय चांगले आहे. गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना प्रसूतीसाठी चांगली सुविधा येथील डॉक्टर देत आहेत. आर्थिक पिळवणुकीपासूनही बचत होते. ग्रामीण रुग्णालयात वाढत्या रुग्णांची संख्या पाहता लवकरात लवकर शासनाने या रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय तयार करावे.
-अरुण भालचंद्र शेळके, माजी सदस्य, पं. स. अकोले


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *