Friday, April 26, 2024
Homeनगरकरोनानंतर जिल्ह्यातील शेतकर्‍यांपुढे टोळधाडीचे संभाव्य संकट !

करोनानंतर जिल्ह्यातील शेतकर्‍यांपुढे टोळधाडीचे संभाव्य संकट !

नेवासा- नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांपुढे टोळधाडीचे संभाव्य संकट उभे राहण्याची शक्यता असून या संकटाला सामोरे जाण्यासाठी जिल्ह्याचा कृषी विभाग सज्ज झाला आहे. टोळांचा प्रादुर्भाव आढळून आल्याबरोबर त्वरित कृषी विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.

राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाना, गुजरात, पंजाब, दिल्ली आणि महाराष्ट्रातील विदर्भात टोळधाडीने धुडगूस घातला असून पिके फस्त करण्यास सुरवात केली आहे. यामध्ये राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेशात सर्वाधीक नुकसान झाले आहे. करोना लॉकडाऊनचा शेतीला मोठा फटका बसला असतानाच आता हे नविन संकट शेतकर्‍यांपुढे आले आहे.

- Advertisement -

राज्यात डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत टोळधाडीचे आक्रमण झाले होते. त्यानंतर लगेच दोन महिन्यांनंतर पुन्हा हे संकट दाखल झाले आहे. इराण आणि पाकिस्तानमधील बलुचिस्तान येथे जन्मलेले आणि परिपक्व झालेले हे टोळ राजस्थानमध्ये दाखल होऊन इतर राज्यांमध्ये पसरले आहेत. राजस्थानमधील 18 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच अर्ध्या राज्यात टोळधाडीने आक्रमण केले आहे. तर उत्तर प्रदेशातील 17 जिल्ह्यांत टोळधाडीचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच मध्यप्रेदशातील 8 जिल्ह्यांमध्ये घालण्यास सुरुवात केली आहे.

राजस्थान आणि हरियाणातून टोळ दिल्लीमध्ये प्रवेश करत आहेत. टोळधाडीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्राच्या चार टीम आणि राज्य कृषी विभाग मिळून कीडनाशक फवारणी करत आहेत. देशात एरवी नोव्हेंबरपर्यंतच राहणारे टोळ फेब्रुवारीपर्यंत होते. शास्त्रज्ञांच्या मते देशातील पोषक वातवारणामुळे मे मध्ये त्यांचे आगमन झाले.
अमरावती व वर्धा जिल्ह्यात या टोळधाडीचा शिरकाव झालेला असून झाडाची कोवळी पालवी, भाजीपाला पिके, संत्रा ही पिके फस्त केली आहेत. हेच संकट नगर जिल्ह्यात देखील येऊ शकते या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.

काय आहे टोळधाड?
टोळ ही एक विध्वंसक कीड आहे. टोळांच्या एक थवा हा एक किलोमीटर ते शेकडो किलोमीटरपर्यंत असू शकतो. एक किलोमीटरच्या एका थव्यात जवळपास 8 कोटी टोळ असतात. एक टोळ जवळपास दोन ग्रॅम किंवा त्याच्या वजनाएवढी हिरवी वनस्पती फस्त करू शकतो. टोळधाड एका दिवसात 130 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. ‘एफएओ’च्या मते, चार कोटी टोळांचा एक थवा 35 हजार लोकांना पुरेल एवढे अन्न एका दिवसांत फस्त करतो. प्रतिमानसी 2.3 किलो अन्न गृहित धरण्यात आले आहे. म्हणजेच 80 हजार 500 किलो अन्न एक टोळांचा थवा एका दिवसांत फस्त करू शकतो.

या पिकांना धोका…
सध्या उन्हाळी मूग, कापूस, उडिद, मका, मिरची, भाजीपाला आणि फळबागा या पिकांना टोळधाडीचा फटका बसू शकतो. याशिवाय जवळजवळ सर्व पिकाचे पान, शेंडे, फुलं, फळं, बिया, फांदी आणि खोड असं सर्वच खातात. गहू, बाजरी, मका, ज्वारी, भात, ऊस, कापूस, सर्व फळबाग, भाजीपाला, कडधान्ये आणि गवत सुद्धा खातात.

उपाययोजना….
टोळधाड नियंत्रण उपायामध्ये अंडी घातलेल्या जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास त्यांच्या पिलांना अटकाव करणे शक्य होऊन नियंत्रणात ठेवता येते. नीम तेल प्रति हेक्टरी 2.5 लिटर फवारणी करावी. स्पीकर, काठवट, पराती, डब्बे, थाळ्या, ढोल, वाजवून, आवाज करून टोळ आपले शेतातून पळवून लावावेत. रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावयाचा झाल्यास मिथील पॅराथीआन 2 टक्के भूकटी 25 ते 30 किलो प्रति हेक्टरी धुरळणी करावी. बेंडीओकार्ब 80 डब्ल्युपी, क्लोरोपायरीयाफॉस 20 ईसी, 50 ईसी, डेल्टामेथ्रीन 2.8 युएलव्ही, डायफ्लुबेंझुरॉन 25 ईसी, लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 5 ई.सी व 10 डब्लूपी, मॅलाथिऑन 50 ईसी, 25 ईसी व 95 युएलव्ही या किटकनाशकांची टोळ नियंत्रणासाठी शिफारस अलिकडेच केंद्रीय किटकनाशक मंडळ व नोंदणी समितीने केलेली आहे. यापैकी एखादे कीटकनाशक निवडून फवारणी करावी.
– माणिक लाखे, कृषी विज्ञान केंद्र, दहीगाव-ने

कृषी विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना…
टोळधाडीच्या जिल्ह्यात येऊ पहाणार्‍या संभाव्य संकटावर मात करता यावी यासाठी आता पासूनच सावध राहण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांना देण्यात आलेल्या आहेत. संकट आल्यावर उपाययोजना करण्याऐवजी आतापासूनच काय काय उपाययोजना कराव्यात याबाबत तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक यांच्यामार्फत शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. शेतातील पिकावर टोळाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास शेतकर्‍यांनी कृषी विभागाशी त्वरीत संपर्क करावा.
– शिवाजीराव जगताप जिल्हा कृषी अधीक्षक, अहमदनगर

- Advertisment -

ताज्या बातम्या