Tuesday, April 23, 2024
Homeनगरशेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपचे उपोषण

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपचे उपोषण

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)– बळीराजाला अडचणीत आणणारा यंदाचा हा ओला दुष्काळ. कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाने तोलामोलात आलेलं सोन्यासारखं पीक स्वतःच्या डोळ्यादेखत खाक होऊन जातं,या काळात सरकार म्हणतं आम्ही बळीराजाच्या पाठीशी आहोत,घाबरू नका, योग्य ती मदत शासनाकडून दिली जाईल आणि विरोधक ओरडतात एवढीशी रक्कम पुरेशी नाही.मात्र ह्यांच्या भांडणात माझ्या बळीराजाच्या पदरात एकही रूपया पडत नाही.

आज सरकार स्थापन होऊन जवळपास 1 महिना उलटून गेला,अधिवेशनही संपलं पण घोषित केलेली ओल्या दुष्काळाची रक्कम अजूनही शेतकर्‍यांच्या खात्यात जमा नाही.ती हेक्टरी रक्कम लवकरात लवकर शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करावी या मागणीसह भाजपचे माजी पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र म्हस्के तहसील कार्यालय समोर सोमवार दिनांक 30 रोजी उपोषणाला बसणार आहेत.

- Advertisement -

प्रामुख्याने सरकारने कर्जमाफीची घोषणा केली मात्र खर्‍या अर्थाने आता ह्या डबघाईच्या अवस्थेत त्या कर्जमाफीची आस लावून माझा शेतकरी वर्ग बसला आहे, कुठेतरी त्याच्या भावनांचा विचार करून,त्याच्या मताच्या जीवावर आपण सरकारमध्ये आहात याची जाणीव ठेवून,घोषित केलेली कर्जमाफी लवकरात लवकर जमा करावी.तिसरी मागणी म्हणजे आताही ओल्या दुष्काळावर मात करून पुन्हा एकदा बळीराजाने कांदा,ऊस,गहू आदी पिकांची लागवड करून नव्याने सुरुवात केली आहे,त्याच्याकडे मुबलक प्रमाणात पाणी आहे.

मात्र आता त्याला महावितरणकडून अनियमितपणे दिल्या जाणार्‍या विजेच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे .काही शेतकरी वीज कनेक्शन पासून वंचित आहेत त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात पाणी आहे मात्र त्यांना नवीन वीज कनेक्शन गेल्या डिसेंबरपासून बंद केले आहे.तो नवीन कनेक्शनसाठी रक्कम भरू इच्छित आहे, मात्र महावितरण कंपनी नवीन कनेक्शन देत नाही. याचा त्रास ज्यांना कनेक्शन नाही अशा महाराष्ट्रातील 60% शेतकरी वर्गाला होत आहे.शेतकर्‍यांसाठी नवीन वीज कनेक्शन लवकरात लवकर चालू करण्यात यावेत व तसेच रात्री दिली जाणारी लाईट दिवसा देण्यात यावी, खरं तर आत्ताच हिवाळा देखील चालू झाला आहे.

असल्या थंडीत शेतकर्‍यांना रात्री मोटार चालू करण्यासाठी जावं लागतं तसेच रात्री काही डी.पी. पाशी अडचण आली तर त्याला स्वतःचा जीव धोक्यात घालून ती दुरूस्त करावी लागते.महाराष्ट्रातील किती तरी शेतकरी रात्री पिकाला पाणी देत असताना सर्पदंश होऊन दगावले आहेत,शेतकर्‍याचा जीव धोक्यात न घालता रात्री दिली जाणारी लाईट दिवसा देण्यात यावी.

चौथी मागणी म्हणजे तालुक्यातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था.खरं तरं श्रीगोंदा तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला प्रश्न पडलाय, रस्त्यात खड्डे आहेत कि खड्ड्यात रस्ता.आजी माजी लोकप्रतिनिधी सांगतात मी एवढे कोटी आणले मी तेवढे कोटी आणले पण आत्ताची सर्वच रस्त्यांची अवस्था पहाता तुमचे कोट्यवधी रुपये गेले कुठे? या रस्त्यांच्या दुरवस्थेचा त्रास सर्वसामान्य जनतेला होतोय म्हणून लवकरात लवकर सर्वच रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी.

तसेच आज तालुक्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे वाळू उपसा चालू आहे तो लवकरात लवकर थांबवण्यात यावा .तसेच तालुक्यातील कुकडी प्रकल्पासाठी भूसंपादित केलेल्या प्रामुख्याने डी वाय 13 व 14 वरील शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला लवकरात लवकर देण्यात यावा.हे सर्व प्रश्न मार्गी लागण्यासाठी मी सोमवार दि.30 डिसेंबर रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालय याठिकाणी उपोषणास बसणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या