Monday, April 29, 2024
Homeनगरकर्जमाफीसाठी पात्र असणार्‍या 31 हजार शेतकर्‍यांचे ऑडिट पूर्ण

कर्जमाफीसाठी पात्र असणार्‍या 31 हजार शेतकर्‍यांचे ऑडिट पूर्ण

10 हजार शेतकर्‍यांचे बँकांशी आधार लिंकिंग नाहीत

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील दोन लाख 58 हजार 755 शेतकरी महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफी योजनेसाठी पात्र आहेत. पात्र असणार्‍या या शेतकर्‍यांच्या यादीतील 30 हजार शेतकर्‍यांच्या कर्ज खात्याचे सरकारी लेखापरीक्षकाकडून ऑडिट पूर्ण झाले असून आता शेतकर्‍यांची ही नाावे सरकारच्या कर्जमाफी या पोर्टलवर टाकण्यात येणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, जिल्ह्यातील नऊ हजार 731 शेतकर्‍यांचे बँक खात्याशी आधार लिंक नाहीत. यात जिल्हा बँकांची एक हजार 200 तर राष्ट्रीयीकृत बँकांचे आठ हजार 531 शेतकर्‍यांच्या खात्यांचा समावेश आहे. आधार लिंक नसणार्‍या शेतकर्‍यांच्या नावांच्या याद्या गावपातळीवर विविध विकास सेवा संस्था व ग्रामपंचायतींमध्ये लावल्या जाणार आहेत. संबंधित शेतकर्‍यांनी तातडीने आधार लिंकिंग करण्याचेही आवाहन केले जाणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

राज्यात महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून, यात दोन लाखांपर्यंतचे पीककर्ज तसेच कर्ज पुनर्गठण माफ केले जाणार आहे. या जिल्हा प्रशासन व सहकार खात्याने शेतकर्‍यांच्या कर्जखात्यांना त्यांचे आधार क्रमांक लिंकिंग करण्याचे काम सुरू केले आहे. त्याचसोबत पात्र असणार्‍या शेतकर्‍यांच्या खात्याचे सरकारी लेखा परिक्षकांकडून ऑडिट करण्यात येत आहेत. यात संबंधित शेतकर्‍यांची कर्ज कोणत्या कालावधीत घेतलेले आहे. त्या कर्जावर बँकांनी आकारलेले व्याज याची माहिती घेण्यात येत आहे.

विविध कार्यकारी सेवा संस्थांकडून 28 विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने थकबाकीतील शेतकर्‍यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. संकलित झालेल्या या माहितीची तपासणी करून 1 फेब्रुवारीला आपले सरकार पोर्टलवर कर्जमाफी पात्र शेतकरी व त्यांना मिळणारी कर्जमाफी रकमेची माहिती तसेच अपात्र शेतकर्‍यांची नावे दिली जाणार आहेत. तसेच दुसरीकडे जिल्ह्यातील सुमारे चौदाशे विविध कार्यकारी सेवा संस्थांमधील तसेच राष्ट्रीय बँका व व्यापारी बँकांच्या जिल्हाभरातील शाखांतून अल्पमुदत पीक कर्ज वितरित झालेल्या शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यांची तपासणी लेखा परीक्षकांद्वारे सुरू झाली आहे.

संबंधित शेतकर्‍याने एकापेक्षा अनेक ठिकाणी कर्ज घेतले आहे काय व ते सर्व मिळून दोन लाखांच्या आत आहे की जास्त आहे, याची खातरजमा या तपासणीतून केली जात आहे. शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सरकारने पहिल्या टप्प्यात दोन लाखांचीच कर्जमाफी जाहीर केली असली तरी भविष्यात दोन लाखांवरील थकबाकीदारांना तसेच नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांनाही दिलासा देण्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे या नव्या कर्जमाफीची व्याप्ती वाढीची आशा शेतकर्‍यांना आहे.

असे आहेत शेतकरी
अकोले 1 हजार 634, जामखेड 289, कर्जत 1 हजार 534, कोपरगाव 1 हजार 930, नगर 1 हजार 319, नेवासा 2 हजार 117, पारनेर 1 हजार 298, पाथर्डी 2 हजार 157, राहाता 1 हजार 435, राहुरी 2 हजार 365, संगमनेर 3 हजार 309, शेवगाव 8 हजार 391, श्रीगोंदा 1 हजार 720, श्रीरामपूर 1 हजार 143 असे 30 हजार 649 शेतकर्‍यांचा यात समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या