Friday, April 26, 2024
Homeनगरउत्पादन शुल्कच्या ‘त्या’ निरीक्षकाचा अहवाल राज्य आयुक्तांनी मागितला

उत्पादन शुल्कच्या ‘त्या’ निरीक्षकाचा अहवाल राज्य आयुक्तांनी मागितला

क्वारंटाईनचा आदेश न पाळण्याचा प्रकार अंगलट येण्याची शक्यता

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल झालेले राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षकांना डॉक्टरांना शिवीगाळ करणे, क्वारंटाईनचा आदेश धुडकावून गायब होणे चांगलेच भोवणार आहे. डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या कोरोना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन असलेल्या दुय्यम निरीक्षकांच्या वागणुकीची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. याची दखल वरिष्ठांनी घेतली असून राज्य उत्पादन शुल्कच्या राज्याच्या आयुक्तांनी याप्रकरणी अहवाल मागितला आहे. नगर अधीक्षकांनी झालेल्या घटनाक्रमाचा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. यावर वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील, असे उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर यांनी सांगितले.

- Advertisement -

कोरोनासारख्या घातक आजाराने हाहाकार केला आहे. फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. कोरोना संशयित व्यक्तींची जिल्हा रुग्णालयात तपासणी केली जाते. 11 एप्रिलला सकाळी जिल्हा रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर असलेले डॉ. श्रीकांत पाठक व आरोग्य कर्मचारी कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करत होते. त्यावेळी राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक कोरोना संशयित म्हणून तपासणीसाठी दाखल झाले. ते पुणे येथून आले असल्याने व त्यांना खोकला व ताप येत असल्याने डॉ. पाठक यांनी त्यांचे स्त्राव घेतले.

त्यांची तपासणी झाल्यानंतर त्यांना क्वारंटाईन राहण्याचे आदेश देण्यात आले. परंतु, याचा राग संबंधित दुय्यम निरीक्षकांना आला. याच रागातून त्यांनी डॉ. पाठक व इतर कर्मचार्‍यांना शिवीगाळ करून धमकी दिली. मोठ मोठ्याने आरडाओरडा करून डॉ. पाठक यांच्या कामात अडथळा निर्माण केला. कोरोना संसर्गाचे लक्षणे असल्याने संशयित निरीक्षकांपासून त्यांच्या कुटुंबाला व इतरांना धोका निर्माण होऊ शकतो, हे माहिती असतानाही व क्वारंटाईनचा आदेश असतानाही त्याच दिवशी ते रुग्णालयातून निघून गेले.

कोरोना संशयित दुय्यम निरीक्षक रुग्णालयातून निघून गेल्याने तोफखाना पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्कच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबत कल्पना दिली. तसे लेखी पत्र त्यांना दिले. वरिष्ठ अधिकार्‍यांनी दुय्यम निरीक्षकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचे लेखी आदेश दिले. बेजबाबदार दुय्यम निरीक्षक लेखी आदेश मिळाल्यानंतर 12 एप्रिलला रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. सध्या त्यांना जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.

तपासणी करताना दुय्यम निरीक्षकाची वागणूक बेजबाबदार होती. तपासणी दरम्यान डॉक्टर व कर्मचार्‍यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी व जिल्हाधिकारी यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याने याची सर्वत्र चर्चा झाली. उत्पादन शुल्कचे राज्य आयुक्तांनी याची दखल घेतली. त्यांनी झालेल्या घटनाक्रमाचा अहवाल अधीक्षक नवलकर यांना मागितला. अधीक्षक यांनी तातडीने अहवाल सादर केला आहे. 14 दिवस जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन असलेल्या बेजबाबदार दुय्यम निरीक्षकावर उपचारानंतर कारवाई केली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या