Thursday, April 25, 2024
Homeनगरजीवनावश्यक वस्तुची चढ्या भावाने विक्री

जीवनावश्यक वस्तुची चढ्या भावाने विक्री

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- एकीकडे प्रशासन जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक पुरवठा असल्याचे सांगत असताना शहराच्या अनेक भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार सुरू असून दुकानदार जादा भावाने वस्तूंची विक्री करीत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त होत आहेत. अनेक दुकानदारांनी आपला माल खपवण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंसोबत इतर न खपणार्‍या वस्तू घेण्याची सक्ती सुरू केली आहे.

साखर, शेंगदाणा, डाळी यांची जादा भावाने विक्री होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. शहराच्या विविध भागातील दुकानदारांनी दुकानातला माल संपला असून नवीन माल येत नसल्यामुळे आहे तो माल चढ्या भावाने विकायला सुरुवात केली आहे. याबाबत काही जागरूक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याची चर्चा होत आहे.

- Advertisement -

शासन सर्व नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला व दुधाचा पुरवठा कमी पडणार नसल्याचे वारंवार सांगत आहे. दूध आणि भाजीपाला मिळत असून किराणा मालातील अनेक वस्तूंची विक्री चढ्या भावाने होत असल्याच्या तक्रारी शहराच्या सर्वच भागातून येत आहेत. याबाबत प्रशासनाने अशा दुकानांना भेटी देऊन त्यांची तपासणी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. शेजारी राहुरी तालुक्यातील तहसीलदारांनी अशा अनेक दुकानांना भेटी देऊन जादा भावाने विक्री करणारांना नोटिसा दिल्या आहेत.

गायछाप सोबत इतर वस्तूंची सक्ती
शहरातील महावीर पथावर एक मोठा दुकानदार गाय छाप पुडीची विक्री चढ्या भावाने करीत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या दुकानात जाणार्‍या ग्राहकांना फक्त गायछाप पुडी दिली जात नसून त्यासोबत इतर वस्तू सुद्धा घेण्याची सक्ती केली जात आहे. गायछाप पुडीचा दरही वाढवून घेतला जात असल्याची तक्रार असून हा मोठा दुकानदार मोठ्या दिमाखात या वस्तू विकत असल्याचीही तक्रारी आहे. जीवनावश्यक वस्तू कायदा लागू असताना या चढ्या भावाने केल्या जाणार्‍या विक्रीकडे डोळेझाक केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या