Wednesday, April 24, 2024
Homeनगरसंतप्त उद्योजकांचा महावितरणवर मोर्चा

संतप्त उद्योजकांचा महावितरणवर मोर्चा

त्वरित समाधान न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

संगमनेर (प्रतिनिधी)- संगमनेर औद्योगिक वसाहत येथे सतत खंडित होणार्‍या वीज पुरवठ्याला कंटाळून वसाहतीतील उद्योजकांनी एमआयडीसी सबस्टेशनवरती धडक मोर्चा काढला. यावेळी औद्योगिक वसाहतीतील उद्योजक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

- Advertisement -

संगमनेर औद्योगिक वसाहतीसाठी वीजपुरवठा करणार्‍या सबस्टेशनवर निमोण, मालदाड, साखर कारखाना परिसर आदी अतिरीक्त फीडर जोडण्यात आले आहेत. या अतिरीक्त जोडणीमुळे सदर गावांमध्ये कुठेही वीजपुरवठ्यात अडचण आल्यास औद्योगिक वसाहतीत वीजपुरवठा खंडित होतो. वारंवार असे प्रकार घडल्यामुळे येथील उद्योजकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते.

या सबस्टेशनवरील अतिरीक्त भार कमी करून तो फक्त औद्योगिक वसाहतीसाठीच वापरावा यासाठी महावितरणच्या अधिकार्‍यांसमवेत वारंवार बैठका व पत्रव्यवहार करण्यात आले, परंतु हे सर्व करूनही यावर योग्य ती उपाययोजना संबंधित अधिकार्‍यांकडून करण्यात आली नाही. यामुळे त्रस्त झालेल्या उद्योजकांनी महावितरणवर मोर्चा काढला व हा प्रकार बंद होत नाही तोपर्यंत तेथून न हलण्याचा निर्णय घेतला.
घटनास्थळी महावितरणचे अभियंता श्री. मुळे, अभियंता श्री. जाधव व अभियंता श्री. जायभाये व महावितरणचे कर्मचारी हजर झाले .

पुन्हा वीज खंडित होणार नाही म्हणून त्वरीत उपाययोजना करू असे लेखी आश्वासन दिले. शनिवार दिनांक 4 जानेवारीपर्यंत ठोस उपाययोजना न केल्यास यासाठी तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा उद्योजकांनी दिला.

यावेळी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन भाऊसाहेब एरंडे, व्हा. चेअरमन श्रीकांत गग्गड, सुधाकर सरोदे, विलास वर्पे, संदीप कर्पे, नानासाहेब वर्पे, कचेश्वर चव्हाण, शेखर साबळे, शतानंद खामकर, तुकाराम वदक, महेश राहतेकर, सोमनाथ पाबळकर, नाना आत्रे, अयाज पटेल, कपील चांडक, आनंद हासे, अभिजीत दिघे, पुष्कर घुले, दर्शन सरोदे, सुदीप हासे, रोहित चौधरी आदींसह उद्योजक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या