Saturday, April 27, 2024
Homeनगरविजेच्या भारनियमनामुळे शेतकर्‍यांची शेतातच ‘नाईट लाईफ’

विजेच्या भारनियमनामुळे शेतकर्‍यांची शेतातच ‘नाईट लाईफ’

दिवसा वीज देण्याची मागणी; 1 फेब्रुवारीपासून महावितरणने वेळापत्रक बदलले

देवळाली प्रवरा (वार्ताहर) – शेतीच्या वीजभारनियमनात महावितरणने बदल केला आहे. 1 फेब्रुवारीपासून शेतीसाठी रात्री 11.50 वा. वीज देण्यात येणार असून सकाळी 9.50 वा. हा वीजपुरवठा खंडीत केला जाणार आहे. महावितरणच्या फतव्यामुळे बिबट्याच्या धास्तीने दिवसाही शेतात जायला टाळाटाळ करणार्‍या शेतकर्‍यांना आता शेतातच ‘नाईट लाईफ’ करावी लागणार आहे. महावितरणने दिवसाच वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisement -

आता हा बदल शेतकर्‍यांच्या मुळावर उठला आहे. रात्री बारा वाजता विद्युत मोटार सुरू करण्यासाठी शेतात कसे जाणार? हा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. शेतीसाठी महावितरणने गेल्या काही महिन्यांपासून वीजभारनियमन केले जात आहे. यामध्ये शेतीसाठी आठ ते दहा तास वीजपुरवठा करण्यात येतो. एक आठवडा दिवसाचा व एक आठवडा रात्रीचा, असे वेळापत्रक करण्यात आले होते.

त्याप्रमाणे एक आठवडा सकाळी नऊ ते सायंकाळी पाच असा वीजपुरवठा करण्यात येत होता. तर दुसर्‍या आठवड्यात रात्री आठ ते पहाटे चार असा वीजपुरवठा करण्यात येत होता.परंतु यामध्ये 1 फेब्रुवारीपासून बदल करण्यात आला असून रात्रीचा वीजपुरवठा रात्री 11-50 ते सकाळी 9 -50 असा करण्यात आला आहे. तर दिवसाचा वीजपुरवठा सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत असा करण्यात आला आहे.

परिसरात बिबट्यांनी मोठा धुमाकूळ घातला असल्याने रात्री शेतात पाणी भरण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत. त्यातच मोटार सुरू करण्यासाठी बारा वाजता जाणे म्हणजे अत्यंत अवघड होऊन बसले आहे. त्यातच थंडीचा कडाका असल्याने आणखी कठीण झाले आहे. रात्री होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे गहू, कांदे या पिकांना अंधारात पाणी भरणे अवघड होऊन बसले आहे. भारनियमन असले तरी वीजपुरवठा सुरळीत नसतो. या काळात देखील अनेकदा वीज जाते.

त्यामुळे शेतीला पूर्ण आठ तास देखील वीजपुरवठा होत नाही. यावर कळस म्हणजे ही वीज अत्यंत कमी दाबाने मिळत असल्याने विद्युत मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले आहे. तर अनेक ठिकाणी जादाभार झाल्याने रोहित्र जळत आहेत. कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने मोटारी कमी पाणी देतात. परिणामी भरणे होत नाही. यंदा चांगल्या झालेल्या पावसामुळे विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी बरी आहे.

मात्र, महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे विहिरीत पाणी असून देखील विजेअभावी पिके जळण्याची वाईट वेळ शेतकरी बांधवावर आली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शेतीला दिवसा वीजपुरवठा करावा व रात्री सिंगल फेज सुरू ठेवावी. त्यामुळे वाड्यावस्त्यांवर रात्री अंधार होणारी नाही. याबाबत महावितरणच्या अधिकार्‍यांनी गांभीर्याने दखल घेऊन रात्रीचे अन्यायकारक भारनियमन त्वरित बंद करावे, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली असून यात बदल न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

महावितरणने शेतीसाठी दहा तास दिवसा वीजपुरवठा करावा.पुढे उन्हाळा तोंडावर असल्याने यामध्ये आत्ताच बदल करण्यात यावा. रात्री सिंगलफेज सुरू करावी. अन्यथा याबाबत महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन छेडले जाईल.
– राजेंद्र लोंढे, शेतकरी नेते

शेतीसाठी अश्वशक्ती पध्दतीने वीजपुरवठा करण्यात येतो. यामध्ये भारनियमनचा व पावसाळ्याचा विचार केला तर शेतीसाठी बारा महिन्यापैकी फक्त चार महिने वीजपुरवठा करण्यात येतो. आकारणी मात्र, बारा महिन्याची करण्यात येते. आधी हे बंद झालं पाहिजे व रात्रीचे भारनियमन बंद झाले पाहिजे. अन्यथा महावितरणला तीव्र आंदोलनाला समोरे जावे लागेल.
– केदारनाथ चव्हाण, शहराध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस

शेतीचे रात्रीचे भारनियमन बंद करून ते भारनियमन कंपन्यांवर टाकावे. त्यांना दिवसाऐवजी रात्री वीजपुरवठा सुरू करावा व शेतीसाठी दिवसाचा वीजपुरवठा सुरू ठेवावा. भारनियमन काळात पूर्णदाबाने वीजपुरवठा करावा. प्रत्येक रोहित्रावर एका वायरमनची नेमणूक करावी. रोहित्र जळाल्यास आठ दिवसांत बदलून मिळावे.
– अशोकराव मुसमाडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी सदस्य

- Advertisment -

ताज्या बातम्या