Thursday, April 25, 2024
Homeनगरई-लर्निंग सुविधेचा ज्ञानयज्ञ शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी

ई-लर्निंग सुविधेचा ज्ञानयज्ञ शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी

लोणी (प्रतिनिधी)- लॉकडाऊनच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या पुढील नवीन शैक्षणिक वर्षाचे नूकसान टाळण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील प्रवरा टिचर्स अ‍ॅकॅडमीने तयार केलेला अभ्यासक्रमाचा लाभ ई-लर्निग सुविधेतून सुमारे 23 हजार विद्यार्थी घेत आहेत. ग्रामीण भागातील ई-लर्निंगचा व्यापक स्वरुपातील पहिल्या प्रयत्नामुळे विद्यार्थी पालकांना मोठा दिलासा मिळाला असुन, इतर ई-लर्निंग सुविधेचा हा ज्ञानयज्ञ शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला असल्याचे मत संस्थेचे चेअरमन आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

कोरोनाच्या राष्ट्रीय संकटाचे सावट सर्वत्र गडद होत असताना प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने आपल्या शैक्षणिक संकुलातील सर्व वर्गाचे कामकाज थांबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पोहचविण्याची व्यवस्था केली. याबरोबरीनेच विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संस्थेतील टिचर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीने जून 2020 पासून सुरु होणार्‍या नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमाचा अंतर्भाव असेलेली लिंक विद्यार्थी व पालकांना उपलब्ध करुन दिली. या शैक्षणिक लिंकच्या माध्यमातून पुढील नवीन शैक्षणिक वर्षांच्या अभ्यासाचा एक चांगला सुसंवाद वर्क फ्रॉम होमच्या संकल्पनेतून यशस्वी ठरला असल्याचे आ. विखे पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

मागील पंधरा दिवसात संस्थेने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसारच या लिंकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत मार्गदर्शन केले जात आहे. बहुतांशी शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी या लिंकच्या माध्यमातून समूह चर्चा करुन विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन केल्याने पुढील शैक्षणिक वर्षांच्या अभ्यासाचा उत्साह विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला. ज्या भागामध्ये इंटरनेटची सुविधा नाही किंवा पालकांकडे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल नसल्याच्या अडचणी समोर आल्या तिथे शिक्षकांना पाठविण्याचे नियोजन संस्था पातळीवर सुरु केले.

यासंदर्भात आ.विखे पाटील यांनी पालक आणि विद्यार्थ्यांशी साधलेल्या पत्ररुपी संवादात सुध्दा प्रामुख्याने या संकटाच्या काळात थोडेही खचू नका, विचलित होवू नका, हा काळही आपल्या सर्वांच्या सामुदायीक प्रयत्नांतून निघून जाईल, असा दिलासा देतानाच, विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून संस्थेने घेतलेल्या निर्णयाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे समाधान व्यक्त केले.

पालकांकडून समाधान
या नवीन प्रयोगाबाबत पालकांनीही अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या सकारात्मक प्रतिक्रीया वर्ग शिक्षकांकडे व्यक्त केल्या आहेत. या सुविधेबद्दल समाधान व्यक्त करतानाच विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने मिळत असलेला होम वर्क, ऑनलाईन टेस्ट तसेच शिक्षकांकडुनच याबाबत मिळणारा प्रतिसाद हे पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालक हे दोघेही आता उत्सुक असल्याची प्रतिक्रीया समाज भूषण लक्ष्मण उगलमुगले या पालकांनी व्यक्त केली.

ई-लर्निंग सुविधेचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी संस्था पातळीवर अतिशय सुक्ष्म नियोजन केले. इयत्ता 10 वी आणि 12 वी मध्ये प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांना सुध्दा मार्गदर्शन केले जात आहे. तांत्रिक महाविद्यालयांमध्ये सुध्दा हाच प्रयोग आम्ही सुरु करुन ई-परिक्षा सुध्दा या माध्यमातून आम्ही घेत असल्याचे संस्थेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुस्मिता विखे पाटील यांनी सांगितले. या संदर्भात पालकांना अजुनही काही अडचणी असतील तर संबधित वर्ग शिक्षकांशी संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या