Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रसरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नियुक्तीमुळे न्यायव्यवस्थेला नवचैतन्य : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नियुक्तीमुळे न्यायव्यवस्थेला नवचैतन्य : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई:

महाराष्ट्राचे सुपुत्र शरद बोबडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाल्यामुळे अभिमानाने ऊर भरून आले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे न्यायव्यवस्थेला नवचैत्यन्य मिळेल, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत व्यक्त केली.

- Advertisement -

मूळचे नागपूरचे असलेले शरद बोबडे यांचे अभिनंदन नागपूरच्याच अधिवेशनात करता आले, हा दुर्मिळ योगायोग असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. सध्या शरद ऋतू सुरू असल्याचा उल्लेख करीत हा ऋतू म्हणजे नवचैत्यन्याचा असून सरन्यायाधीश बोबडेंच्या रूपाने नवचैत्यन्य येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्या. बोबडे यांनी प्रयत्न केले आहेत. सरन्यायाधीशपदाच्या कारकिर्दीत ते अन्नदात्याला नवचैतन्य मिळवून देतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बोबडे कुटुंबाचे नागपूरमधील निवासस्थान म्हणजे कायद्याचे झाड असून त्या माध्यमातून अनेक निष्णात कायदेतज्ज्ञ तयार झाले आहेत. रामशास्त्री बाण्याने ते न्यायदान केल्याशिवाय राहणार नाही, अशी खात्री बाळगतो असे सांगत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुपुत्राचे अभिनंदन केले.

बोबडे शेतकऱ्यांचे कैवारी होते. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. ते सामान्यांचे वकिल होते, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरन्यायाधीश बोबडे यांचे अभिनंदन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या