Friday, April 26, 2024
Homeनगरअधिकार नसताना वेल्हाळेत कारवाईचा प्रयत्न मद्यपी नायब तहसीलदाराला दणका

अधिकार नसताना वेल्हाळेत कारवाईचा प्रयत्न मद्यपी नायब तहसीलदाराला दणका

संगमनेर (शहर प्रतिनिधी) – तालुक्यातील वेल्हाळे येथे अवैधरित्या वाळू वाहतूक करणार्‍या एका ट्रॅक्टर मालकावर गुरुवारी मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत एका नायब तहसीलदाराने कारवाई केली. मात्र हा अधिकारी अन्य जिल्ह्यातील असून त्याला कारवाई करण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचे वाळू वाहतूक करणार्‍यांच्या लक्षात येताच वाळू वाहतूक करणार्‍यांसह काही ग्रामस्थांनी या नायब तहसीलदाराला चांगलाच दणका दिला.

संगमनेर येथे काही वर्षे महसूल विभागात सेवा बजावून हा नायब तहसीलदार सध्या नाशिक जिल्ह्यातील एका तालुक्यात कार्यरत आहे. संगमनेर येथे कार्यरत असताना त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. वाळू तस्करांशी त्यांचे असणारे संबंध त्यावेळी चर्चेचा विषय बनला होता. वाळू तस्करांकडून वसुली करण्याची त्यांची जुनीच सवय अद्यापही कायम असल्याचे या प्रकरणावरुन पुढे आले आहे. या प्रकरणाची खमंग चर्चा सध्या संगमनेरात जोरदार झडत आहे.

- Advertisement -

गुरुवारी मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत असताना स्वतःच्या खाजगी वाहनात येऊन त्याने संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथे वाळूचा ट्रॅक्टर पकडला. तर्रर्र असलेल्या या नायब तहसीलदाराने ट्रॅक्टर चालक व मजुरांना मारहाणही केली. यानंतर ट्रॅक्टर मालक व इतर ग्रामस्थ घटनास्थळी आले. या अधिकार्‍याचा संगमनेर तालुक्यात काही संबंध नसल्याचे समजल्याने ग्रामस्थांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली हे प्रकरण नंतर एका राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचले त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर वादावर पडदा पडला.

संगमनेर तालुक्यात बाहेरील अधिकारी कारवाई करत असताना संगमनेरच्या महसूल अधिकार्‍यांना सुगावा देखील लागत नाही. नेमकं महसूल विभागाचं चाललयं काय? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. तर्र नायब तहसीलदार कोण? याबाबत उलटसुलट चर्चा संगमनेरात सुरु आहे.

दरम्यान हे प्रकरण आपल्या अंगलट आल्याचे लक्षात आल्यानंतर सदर नायब तहसीलदाराने संगमनेरच्या एका पथकाला बोलावून पकडलेला ट्रॅक्टर या पथकाच्या ताब्यात दिला. यानंतर या तर्र अधिकार्‍याने तेथून काढता पाय घेतला. सदर पथकाने ट्रॅक्टर संगमनेरला आणला व टॅक्टर प्रांत कार्यालयाच्या आवारात लावून दिला.

ट्रॅक्टर सोडवावा यासाठी संबंधित अधिकार्‍याला अनेकांनी संपर्क केला मात्र त्याने कुणालाच दाद दिली नाही या अधिकार्‍याचे आणि संगमनेरच्या पथकाचा काय संबंध असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.

याच मद्यपी नायब तहसिलदाराने गेल्या आठवड्यात संगमनेर शहरातील एका हॉटेल मध्ये काम करणार्‍या वेटरला मारहाण केली होती. त्यावेळी देखील तो तर्र असल्याने हॉटेल मालकाने त्यास तेथून जाण्यास सांगितले. अन्यथा त्याचवेळी त्याची धुलाई हॉटेल कर्मचार्‍यांनी केली असती, अशी चर्चा देखील संगमनेरात सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या