Sunday, May 5, 2024
Homeनगरबनावट कागदपत्रे दाखवून समता पतसंस्थेची फसवणूक

बनावट कागदपत्रे दाखवून समता पतसंस्थेची फसवणूक

आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी

कोपरगाव (प्रतिनिधी)- शहरातील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेतून डंपर खरेदीसाठी बनावट कागदपत्रे करून 21 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून त्याची विल्हेवाट लावल्याचा आरोप असलेल्या सात आरोपी पैकी विवेक अरुण उगले रा.नाशिक यास कोपरगाव शहर पोलिसांनी अटक करून कोपरगाव न्यायालयासमोर हजर केले. असता त्यास न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

समता नागरी पतसंस्थेच्या मुख्य शाखेतुन नाशिक येथील आरोपी फैज आरिफ खान, सातपूर, निलेश साहेबराव पवार, किरण दिलीप वैचाळे अशोकनगर, सोनाली साहेबराव पवार, विवेक अरूण उगले, साहेबराव पवार, गौरव प्रमोद कुलकर्णी आदींनी 24 जुलै 2019 रोजी आरोपीनी संगनमत करून समता नागरी पतसंस्थेतून भारत बेंझ कंपनीचा डंपर खरेदी करण्यासाठी त्या कंपनीचे सबडीलर के. जी. बी. अटो शोरूमची जमा पावती, अंदाजपत्रक, विमा, शोरूमचे खाते अशी बनावट कागदपत्रे तयार करून 21 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले.

वाहन खरेदी न करता स्वतःच्या फायद्या करिता वापरून पतसंस्थेची फसवणुक केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात 30 ऑक्टोबर 2018 रोजी पतसंस्थेचे अधिकारी योगेश साहेबराव मोरे यांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील आरोपी फैज अरिफखान हा ताब्यात असताना विचारपूस केली असता सदरच्या फसवणुकीच्या प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी एजंट आरोपी विवेक अरुण उगले याने मदत केल्याचे सांगितले.

आरोपी विवेक उगले यास अटक केली. आरोपीकडे विचारपूस केली असता तो पोलिसांना मदत करत नसल्याचे आढळून आले. सदर गुन्ह्यात कर्ज मंजूर करण्यासाठी कोणकोणती बनावट कागदपत्रे तयार केली. ती कोठून केली त्यासाठी कोणी कोणी मदत केली? हे अद्याप उघड होत नसल्याने त्याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. सदर आरोपी हा एजंट म्हणून काम करत होता. त्याने शिर्डी व येवला येथील शाखेत बनावट कर्ज प्रकरणात कर्जदार यांना मदत केली असल्याचा उघड झाले असून अजून अशी किती बनावट कर्जे आहेत याचा तपास करणे गरजेचे आहे.

बनावट कागदपत्रे तयार करताना कोणी-कोणी मदत केली. ती कोठे तयार केली आदी गोष्टींचा शोध घेणे गरजेचे असल्याचे सांगून पाच दिवस पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपी विवेक उगले यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील एस.ए.व्यवहारे यांनी काम पाहिले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या