जिल्ह्यात शिवरायांना मानाचा मुजरा

ठिकठिकाणी विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- हिंदवी साम्राज्याचे संस्थापक, एक आदर्श शासनकर्ता छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात पार पडली. ठिकठिकाणी भव्य मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे ‘जय भवानी जय शिवाजी’ जयघोषाने जिल्हा दुमदुमून गेला होता.

शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या शिवस्मारकावरील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले. विवाहातील मानपान, सत्कार, हार-तुरे, शाल या अनावश्यक खर्चाला फाटा देत पुणतांबा येथील डी. जी. धनवटे यांनी आपल्या मुलाच्या विवाहात पुणतांबा येथील धनवटे वेशीवर साकारण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामासाठी अकरा हजार एकशे अकरा रुपयांची आर्थिक मदत देत गावासाठी सामाजिक बांधिलकी जपत एक चांगला संदेश दिला आहे. भिंगारमध्ये मुस्लिम बांधवांनी रॅली काढली.

पाथर्डी तालुक्यातील मुस्लीम समाज्याच्या वतीने शिवजयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीतील शिवप्रेमींना सरबत वाटप करण्यात आले यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नासीर शेख, जुनेद पठाण, फारुख शेख, मुन्ना खलिफा, किशोर डांगे, शन्नो पठाण, एजाज शेख, परवेज मणियार, अमजद आतार, पप्पू चौधरी, लाला शेख, मुन्ना पठाण, आरिफ आतार, मुन्ना शेख, उपस्थित होते. नेवाशातील मुक्तापूर शाळेतील मुलांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.

नागराज- रितेश साकारणार ‘शिवत्रयी’
दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ‘महागाथा’ प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. शिवजयंतीचं औचित्य साधत या ‘महागाथा’ची घोषणा करण्यात आली आहे. या शिवत्रयी अंतर्गत ‘शिवाजी’, ‘राजा शिवाजी’ आणि ‘छत्रपती शिवाजी’ अशा तीन चित्रपटांची निर्मिती करण्यात येणार असल्याचं समजते आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *