Thursday, April 25, 2024
Homeनगरप्रत्येक जिल्ह्यात 10 रुपयांत ‘शिवभोजन’

प्रत्येक जिल्ह्यात 10 रुपयांत ‘शिवभोजन’

शासन निर्णय जारी

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातल्या गरीब आणि गरजू जनतेला केवळ दहा रुपयांत शिवभोजन उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळानं बैठकीत मान्यता दिली आहे. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे.

- Advertisement -

योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात किमान एक भोजनालय सुरू करण्यास शासनानं मान्यता दिली आहे. भोजनालये दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत कार्यरत राहतील. याला मिळणारा प्रतिसाद पाहून ही योजना इतर भागात राबवण्यात येईल.

भोजनालय चालविण्यासाठी सद्यस्थितीत सुरू असलेल्या खानावर, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट अथवा मेस यापैकी सदर योजना राबविण्यास सक्षम असलेल्या भोजनालयाची त्या त्या स्तरावरील समिती निवड करणार आहे. तसंच जिल्हा रूग्णालये, बस स्थानके, रेल्वे स्थानक, बाजारपेठा, शासकीय कार्यालये या ठिकाणीही शिवभोजन दिलं जाईल. सदर थाळीची किंमत शहरी भागात प्रतिथाळी 50 रूपये व ग्रामीण भागात 35 रूपये राहिल.

प्रत्येक ग्राहकाकडून प्राप्त झालेल्या 10 रुपयाव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून या विभागाकडून थेट जिल्हाधिकार्‍यांना देण्यात येवून त्यांच्यामार्फत संबंधितांना वितरित करण्यात येईल. शहरी भागासाठी प्रतिथाळी 40 रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रतिथाळी 25 रुपये अनुदान असेल. याबाबत दक्षता घेण्याची जबाबदारी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखालीृ गटविकास अधिकारी, पालिका/नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांची राहिल.

ही योजना राबविण्यासाठी सक्षम खानावर, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट अथवा मेस यांची निवड करण्यासाठी महानगरपालिका स्तरावर जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या आणि मनपा आयुक्त सदस्य आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सदस्य सचिव असलेली समिती असेल.

अशी असेल थाळी ?
शासनातर्फे सुरू करण्यात येणार्‍या भोजनालयात प्रत्येकी 30 ग्रॅमच्या दोन चपात्या, 100 ग्रॅमची एक वाटी भाजी, 150 ग्रॅमचा एक मूद भात, 100 ग्रॅमचे एक वाटी वरण समाविष्ट असलेली शिवभोजनाची थाळी 10 रुपयांत देण्यात येईल.शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागामध्ये प्रतिथाळी 50 रुपये आणि ग्रामीण भागामध्ये 35 रुपये इतकी राहणार आहे.

  • सदर भोजनालयात बाहेरचे जेवण घेऊन येण्यास आणि भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई आहे.
  • शासकीय कर्मचार्‍यांना तसेच ज्या ठिकाणी ही योजना राबविण्यात येईल तेथील आस्थापनेवरील कर्मचार्‍यांना सदर भोजनालयातील सवलतीच्या दराने जेवणास सक्त मनाई आहे.
  • कोणत्याही परिस्थितीत शिळे अथवा खराब झालेले अन्न ग्राहकांना पुरविता येणार नाही.
- Advertisment -

ताज्या बातम्या