Friday, April 26, 2024
Homeनगरजिल्ह्यात 15 शाळांमध्ये प्रारंभिक भाषाविकास कार्यक्रम

जिल्ह्यात 15 शाळांमध्ये प्रारंभिक भाषाविकास कार्यक्रम

संगमनेर (वार्ताहर)- विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमतांचा विकास करून पहिलीच्या स्तरावरच अध्ययन निष्पत्ती साध्यतेच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्यातील 15 जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये प्रारंभिक भाषा अभियानाच्या प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या भाषा विकासासाठी या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात या शैक्षणिक वर्षात पथदर्शक स्वरूपात कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील एका शाळेची निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

महानगरपालिका क्षेत्रातील ही एका शाळेची निवड झाली आहे. एकूण 15 शाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गाला अध्यापन करणार्‍या शिक्षकांना नुकतेच पुणे येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर त्या केंद्राच्या केंद्रप्रमुखांना जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांची अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया शिक्षण शास्त्राच्या दृष्टीने जाणून घेणे. त्यासाठी प्रभावी प्रक्रिया करणे. त्यासाठीचा दृष्टिकोन विकसित करणे या गोष्टी या टप्प्यावर ती घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रकल्पाची दिशा निश्चित करण्यात आलेली आहे. सुमारे दोन महिने चालणार्‍या या उपक्रमाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी शिक्षकांना कृती कार्यक्रम देण्यात आला आहे.

प्रभावी कार्यक्रमाची अंमलबजावणी
प्रारंभिक भाषा विकास कार्यक्रमांतर्गत वर्ग स्तरावर करावयाचा मौखिक, लिपीची जाण, ध्वनीची जाणीव, वाचन व लेखन प्रक्रिया व शाळा पूर्वतयारी या संदर्भाने विविध कृतींचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी दैनिक नियोजन, आठवडा नियोजन व मासिक नियोजन, शाळा उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याप्रमाणे दररोज प्रत्येक क्षेत्राच्या कृतीची 20 मिनिटे अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. या अंमलबजावणीचे सातत्याने सर्वेक्षण करण्यात येणार असून जिल्हा स्तराबरोबरच राज्य स्तरावरून देखील पडताळणी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेनंतर राज्यभर कार्यक्रम अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने दिशा निश्चित करण्यात येणार आहे.
– डॉ. अचला जडे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था

विद्यार्थ्यांना समृद्ध करणारा कार्यक्रम
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी प्रारंभिक भाषा विकास कार्यक्रमाची अमलबजावणी प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येत असली, तरी प्राथमिक स्तरावरील भाषिक अध्ययन निष्पत्ती साध्य करण्या बरोबरच अध्ययन प्रक्रिया कृतिशील, आनंददायी व मानसशास्त्रीय दृष्ट्या घडण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या वाचन लेखन कौशल्य सोबतच शाळा पूर्व तयारी, श्रवण व भाषण कौशल्यांचा विकासासाठी देखील या प्रशिक्षणाचा अधिक फायदा विद्यार्थ्यांना होणार आहेत. यातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावणार आहे.
– रंजना लोहकरे, ज्येष्ठ अधिव्याख्याता मराठी विभाग

प्रभावी अंमलबजावणीची गरज
राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्या वतीने या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी आरंभी राज्यस्तरावर त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानंतर विभाग स्तरावर शाळातील सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे आले आहे. नंतर संबंधित शिक्षकांच्या पर्यवेक्षीय यंत्रणेलाही प्रशिक्षण देण्यात आले आहेत. अत्यंत सूक्ष्म स्वरूपाचे नियोजन विद्या प्राधिकरणाकडून करून देण्यात आले आहे. वाचन कौशल्य विकसित करण्याबरोबरच भाषिक कौशल्य विकासासाठी अत्यंत सूक्ष्म स्वरूपाचे नियोजन वर्ग स्तरावर करण्यासाठी या कार्यक्रमाचा उपयोग होणार आहेत. मुलांची भाषा व शिक्षण मुलांना वाचते करताना, लिहिते करताना करावयाच्या कृती करताना खरंच चुका होतात का? आपण ज्या चुका म्हणतो त्या चुका आहेत का? तसेच अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक गतिशील होण्यासाठी विद्यार्थ्यांची ज्ञानेन्द्रिय अधिक उपयोगात आणण्याच्या दृष्टीने व शिकणे अधिक परिणामकारक करण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
– संदीप वाकचौरे, राज्य तज्ज्ञ, प्रारंभिक भाषा विकास कार्यक्रम.

- Advertisment -

ताज्या बातम्या