मान्सूनपूर्व पावसाची जिल्ह्यात दमदार हजेरी

jalgaon-digital
6 Min Read

श्रीरामपूर, मुसळवाडी, खंडाळा, सलाबतपूरमध्ये अतिवृष्टी

अहमदनगर (प्रतिनिधी)- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जिल्ह्यात 1 जूनच्या पहाटे मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. यात श्रीरामपूर, राहरिी तालुक्यातील मुसळवाडी, राहात्यातील खंडाळा आणि नेवाशातील सलाबतपूरमध्ये अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक नोंद मुसळवाडीत 105 मिमी, सलाबतपूरमध्ये 97 आणि श्रीरामपूरात 71, खंडाळा मंडळात 77 मिमी पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात 11 तालुक्यात पाऊस झाला आहे. पहिल्याच दिवशी जिल्ह्यात या वर्षीच्या सरासरीच्या 388.6 मिमी म्हणजेच 5.39 टक्के पाऊस झाला आहे. तर संगमनेर, अकोले आणि राहाता तालुक्यात पावसाची प्रतिक्षा आहे.

हवामान खात्याने रविवारी जिल्ह्यात येणार्‍या तीन दिवसांत पावसाचा इशारा दिला होता. त्यानूसार जिल्ह्यात बहुतांशी भागात रविवारी रात्री 8 पासून वादळी वार्‍यासह पावसाला सुरूवात झाली. सुरूवातीला वादळी वार्‍यासह विजांचा कडकडाट होता. मात्र, रात्री 12 नंतर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरूवात झाली. एकनंतर पावसाचा जोर चांगलाच वाढला. यामुळे जूनच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. मात्र, या पावसाने संगमनेर, अकोले, राहाता आणि कोपरगावला हुलकावणी दिली आहे.

नेवासा तालुक्यातील तालुक्यातील सलाबतपूर मंडलात 97 मि.मी., श्रीरामपूर महसूल मंडलात 71 मि.मी. तर टाकळीभान मंडळात 70 मि.मी. झाला आहे. तर अकोले तालुक्यातील शेंडी मंडलात 12 मि.मी., कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका मंडलात 5 मि.मी., राहाता तालुक्यातील बाभळेश्वर मंडळात 39 मि.मी., पुणतांबा आणि लोणी मंडलात प्रत्येकी 25 मि.मी. वगळता या तालुक्याची एकूण सरासरी शुन्य टक्के असल्याची जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीत स्पष्ट करण्यात आले आहे.
तालुकानिहाय सरासरीत सर्वाधिक पाऊस श्रीरामपूर 71 मि.मी., पारनेर 58 मि.मी., कर्जत 55 मि.मी., राहुरी 42.6 मि.मी. नेवासा, शेवगाव आणि श्रीगोंदा प्रत्येकी 31 मि.मी., पाथर्डी 29 नगर 21 मि.मी. आणि जामखेड 15 मि.मी. आणि कोपरगाव 4 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी याच दिवशी जिल्ह्यात पावसाची सरासरी शुन्य टक्के होती.

चार मंडलात अतिवृष्टी
जिल्ह्यात पहिल्याच पावसात जिल्ह्यातील 97 महसूल मंडलापैकी चार मंडलात 65 मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. 65 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाल्यास तो अतिवृष्टीमध्ये गणला जातो. जिल्ह्यातील सलाबतपूर, श्रीरामपूर, टाकळीभान, बेलवंडी या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

मंडलनिहाय पाऊस (मि.मी.मध्ये),
श्रीगोंदा 31, पेडगाव 11, काष्टी 46, चिंबळा 27, बेलवंडी 66, दैवदैठण 35, मांडवगण 48, कोळेगाव 35, कर्जत 55, राशिन 2.5, भांबोरा 4, कोंभळी 18, मोहीजळगाव 15, मिरजगाव 13, जामखेड 15, खर्डा 37, नायगाव 20, अरणगाव 4, नान्नज 15, श्रीरामपूर 71, उंदीरगाव 45, बेलापूर 33, टाकळीभान 70, राहुरी 42.6, वांबोरी 47, मसुळवाडी 105, देवळाली प्रवरा 36, सात्रळ 50, ब्राम्हणी 62, टाकळीमिया 39, ताहाराबाद 9, राहाता 0, पुणतांबा 25, बाभळेश्वर 39, लोणी 25, शिर्डी 0, नेवासा खु 31, नेवासा बु 28, सलाबतपूर 97, कुकाणा 52, चांदा 17, घोडेगाव 37, वडळा बहिरोबा 31, सोनई 56, नालेगाव 21, जेऊर 7, रुईछत्तीसी 20, कापूरवाडी 3, केडगाव 19, चास 39.5, भिंगार 19, नागापूर 9, वाळकी 28, चिंचोडी पाटील 24, सावेडी 15, पाथर्डी 29, टाकळीमानूर 22, कोरडगाव 12, करंजी 9, मिरी 12, माणिकदौंडी 14, शेवगाव 31, बोधेगाव 17, चापडगाव 12, भातकूडगाव 40, एरंडगाव 20, ढोरजळगाव 25, पारनेर 58, सुपा 16, वडझीरे 22, निघोज 59, टाकळीडोकेश्वर 37, वाडेगव्हाण 31, पळशी 10, भाळवणी 29, संगमनेर 0, धांदरफळ 2, आश्वी बु 11, शिपलापूर 2, तळेगाव 0, समनापूर 0, साकूर 23, घागरगाव 42, डोळासणे 20, पिंपरनेर 2, अकोले 0, राजूर 0, शेंडी 12, ब्राम्हणवाडा 0, समशेरपूर 0, कोतूळ 1, वीरगाव 0, साकरीवाडी 0, कोपरगाव 4, पोहेगाव 0, सुरेगाव 0, दहिगाव 5, रवंदे 0 असे आहेत.

भंडारदरात 10 दलघफू आवक
भंडारदरा पाणलोटात रविवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने धरणात नव्याने 10 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. भंडारदरात 12, रतनवाडीत 24 मिमी पावसाची नोंद झाली. धरणात सध्या 3884 दलघफू पाणीसाठा असल्याची माहिती भंडारदरा वार्ताहराने दिली.

नगर जिल्ह्यात 98 टक्के पाऊस

ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांचा अंदाज

पुणे (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडेल असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. त्यामध्ये पाच टक्के कमी अधिक पाऊस पडण्याची शक्यता गृहित धरण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, कराड, सोलापूर, राहुरी आणि पुणे 98 टक्के पावसाचा शक्यता असल्याचे डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले आहे.

डॉ. रामचंद्र साबळे हे दरवर्षी महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज वर्तवतात. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वार्‍याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषांवर आधारित आहे. डॉ. साबळे यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यंदा ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील. तसेच कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड असे हवामान राहील.

राज्याच्या सर्वच विभागांमध्ये सरासरीच्या तुलनेत 98 टक्के पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात 98 टक्के पावसाची शक्यता आहे. माञ काही ठिकाणी कमी दिवसात जास्त पाऊस आणि काही काळ पावसाचे मोठे खंड असतील. अशा परिस्थितीत 65 मिलिमीटर पावसाची ओल असली तरच शेतकर्‍यांनी पेरणी करावी, असा सल्ला साबळे यांनी दिला आहे.

पश्चिम विदर्भात यंदा साधारण 670 मिलिमीटर पाऊस पडेल म्हणजेच सरासरी टक्केवारी 98 टक्के पाऊस पडेल. मध्य विदर्भात सरासरी 938 मिलिमीटर म्हणजेच 98 टक्के, पूर्व विदर्भ विभागात 1167 मिलिमीटर, म्हणजे सरासरीच्या 98 टक्के, मराठवाडा विभागात 798 मिलिमीटर पाऊस म्हणजे सरासरीच्या 98 टक्के, कोकण विभाग 3272 मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या 98 टक्के, निफाड, धुळे, जळगाव या उत्तर महाराष्ट्रात सरासरीच्या 98 टक्के आणि पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, कराड, सोलापूर, राहुरी आणि पुणे 98 टक्के पावसाची शक्यता डॉ. साबळे यांनी वर्तवली आहे.

जून, जुलैत मोठे खंड
यंदा वार्‍याचा वेग, सूर्य प्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यात राहुरी, कोल्हापूर, अकोला, पाडेगाव येथे पावसात मोठे खंड पडण्याची शक्यता असून दापोली, पुणे, सोलापूर, धुळे, निफाड, जळगाव, सिंदेवाही व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता असल्याचे डॉ. साबळे यांनी म्हटले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *