Thursday, April 25, 2024
Homeनगरजिल्ह्यात अवकाळीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश

जिल्ह्यात अवकाळीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश

नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील 50 गावांना दणका

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात रविवारी झालेल्या अवकाळी आणि गारपिटीचा 50 गावांना फटका बसला आहे. यात 14 गावे गारपिटग्रस्त असून 36 गावांत अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. यात गहू, मका, हरभरा, ज्वारी, कांदा, फळपिके आणि टरबूज यांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा प्राथमिक अंदाज राज्य सरकारला सादर केला आहे.

- Advertisement -

दोन दिवसांपासून राज्यभरात अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. नगर जिल्ह्यातील तीन तालुक्यांना त्याचा फटका बसलेला आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने संबंधित तालुक्यांमध्ये तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. रविवारी दुपारी जिल्ह्याच्या दक्षिण भागात काही तालुक्यांत गारपीटही झाली. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे फळबागा, तसेच गहु, ज्वारी यासारख्या पिकांचं सुद्धा मोठे नुकसान झालेले आहे. नगर जिल्ह्यामध्ये शेवगाव, पाथर्डी, नेवासा, तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झालेले आहे.

सोमवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाकडे संकलित झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक माहितीमध्ये पाथर्डी तालुक्यातील 31 गावांत अवेळी पावसाचा फटका बसला आहे. यात 19 गावांत अवकाळी तर 12 गावांत गारपिट, नेवासा तालुक्यातील एका गावात गारपिट आणि शेवगाव तालुक्यातील 17 गावांत अवेळी आणि 1 गावात गारपिट झालेली आहे. यात गहू, मका, हरभरा, ज्वारी, कांदा, फळपिके आणि टरबूज पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे.

पाथर्डी तालुक्यात अवकाळी पावसामुळे 435 हेक्टवरील गहू, मका, हरभरा, ज्वारी आणि बाजरी पिकांचे नुकसान झाले आहे. तर 192 हेक्टवरील गहू, मका, हरभरा आणि ज्वारी पिकाचे गारपिटीने नुकसान झालेले आहे. नेवासा तालुक्यात 9.5 हेक्टवर गारपिटीने गहू आणि कांदा पिकांचे नुकसान झालेले आहे. तर शेवगाव तालुक्यात 615 हेक्टवर गहू, हरभरा, फळपिके, केळी व लिंबू बागाचे अवकाळी पावसाने तर 2.7 हेक्टरवर गारपिठीने टरबूज पिकांचे नुकसान झालेले आहे.

नगर तालुक्याला टाळल्याने नाराजी
नगर तालुक्यातील खडकी, चिचोंडी परिसराला वादळी वार्‍यासह पावसाचा तडाखा बसल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खडकी येथे वार्‍याचा वेग जास्त असल्याने मोठ्या प्रमाणात तोडणीला आलेल्या संत्रा गळाल्या. 150 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील संत्रा बागांना फटका बसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. खडकीसह बाबुर्डी बेंद, खंडाळा, धोंडेवाडी, जाधववाडी या भागात संत्रा फळबागांचे प्रमाण मोठे आहे. तेथेही फटका बसला. तरीही पंचनामे करण्याचे आदेश देण्यात न आल्याने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या