Wednesday, April 24, 2024
Homeनगरनगरमध्ये आणखी तिघे बाधित, श्रीरामपुरातही शिरकाव

नगरमध्ये आणखी तिघे बाधित, श्रीरामपुरातही शिरकाव

एकूण संख्या 24+1

आलमगीरमधील दोघे तर सर्जेपुरातील एकाचा समावेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- रविवारी रात्री उशीरा संशयीत कोरोना रुग्णांचे 54 तर सोमवारी दुपारी एकाचा असे 55 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र, सोमवारी रात्री दहाच्या सुमारास पुन्हा तिघाजणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा आता 24 वर पोहचला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एका दिव्यांग व्यक्तीवर थेट पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या 25 वर पोहचला आहे.

दोन दिवसांपूर्वी नगरजवळील भिंगार परिसरातील आलमगीर येथे कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या एका रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 15 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल सोमवारी रात्री प्राप्त झाला.

- Advertisement -

यात आलमगिर परिसरातील दोघे कोरोना बाधीत असून यासह नगर शहरात गजबलेल्या परिसर म्हणून ओळखल्या जाणार्‍या सर्जेपूरा भागातील एकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.

बघता बघता जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा 24 पर्यंत पोहचला आहे. सध्या नगरच्या बुथा हॉस्पिटलमध्ये 19 कोरोना बाधीतांवर उपचार सुरू आहेत. तर जिल्हा रुग्णालय आणि जुन्या दीपक हॉस्पिटमध्ये संशयीत रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत. जिल्ह्यात अशा प्रकारे आरोग्य संस्थांमध्ये क्वारंटाईन केलेल्यांची संख्या 181 वर पोहचली आहे.

जिल्हा रुणालयाच्यावतीने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेत 667 संशयीत कोरोना बाधीतांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यातील 618 निगेटिव्ह आले असून 6 नमुने रिजेक्ट करण्यात आलेले असून 21 जणांचा कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. सोमवारी रात्री प्रतिक्षा असणार्‍या 31 व्यक्तींचे अहवाल जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाला. यात आलमगीर येथील दोघांना तर सर्जेपूरा येथील एकाला कोरानाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्ह्यातील 24 व्यक्तींना कोरानाची बाधा झाली असून श्रीरामपूर येथील एकावर स्वतंत्रपणे पुण्यात उपचार सुरू असल्याने जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या 25 झाली आहे.

होम क्वारंटाईन वाढले
जिल्ह्यात संशयीत कोरोना अथवा कोरोनाची 14 दिवसांचा उपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांना, परदेशातून आलेल्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार संबंधीतांच्या हातावर शिक्के मारण्यात येत असून असे सध्या जिल्ह्यात 466 होम क्वरांटाईन असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले.तसेच बाधीत व्यक्ती या अनुक्रमे 54, 48 आणि 27 वर्षे वयाच्या आहेत.

आलमगीर, सर्जेपुरातील तपासणी
सोमवारी रात्री आलमगीर येथील दोघे तर सर्जेपूरातील एकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर येताच आरोग्य विभाग हादरले आहे. यामुळे आलमगीर आणि सर्जेपुरातील बाधीतांचा संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. सर्जेपुरातील संसर्ग हा कम्युनिटी संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. तसेच बाधीत व्यक्ती या अनुक्रमे 54, 48 आणि 27 वर्षे वयाच्या आहेत.

गोवर्धनपूरला आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, परिसर लॉक

श्रीरामपूर, नाऊर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यातील गोदाकाठच्या गोवर्धनपूर गावात एका तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. काल त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली. तालुक्यातील हा पहिलाच रुग्ण असल्याने प्रशासनाने हा परिसर पूर्णपणे सील केला आहे. परिसरातील सर्वच गावे शंभर टक्के लॉकडाऊन केले आहे.

तालुक्यातील गोवर्धनपूर येथील एका 28 वर्षीय तरुणाला दि. 4 एप्रिल रोजी फिटचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याला हरेगाव येथे एका दवाखान्यात आणले. त्याला बालपणापासून या आजाराचा त्रास असल्याने त्याला लोणी येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र, तेथूनही नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. तेथेही पाच ते सहा तास ठेवून दि. 4 रोजी पुढील उपचारासाठी पुणे येथे ससून रुग्णालयात हलवण्यात आले.

याबाबत गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांशी या युवकाबद्दल चर्चा केली असता, सदर तरुण दिव्यांग असून त्याचा गावात कोणाशीही संपर्क नसतो व गावातील कोणीही त्याच्या संपर्कात नाहीत. त्याच्या संपर्कात कोणी आले का? आले असतील तर कोण आले त्यालाही काही सांगता येईल का? नाही तर मग मात्र या परिसरात जास्त धोका निर्माण होऊ शकतो. मात्र पुण्यातून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेच प्रांताधिकारी अनिल पवार, पोलीस उपअधिक्षक राहुल मदने, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक मसूद खान, वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत जमधडे, डॉ. मोहन शिंदे यांनी तात्काळ गोवर्धनपूर येथे जाऊन त्याची सर्व माहिती घेतली. तीन दिवसांसाठी पूर्ण गाव लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आता तरी घरात बसा असा सल्ला प्रशासनाने नागरिकांना दिला आहे.

बाधिताचा बाहेर काहीही संपर्क नसताना देखील कोरोना कसा?
यासंदर्भात डॉ. मोहन शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित रुग्ण हा काही दिवसांपासून आजारी असल्याने हरेगाव येथील एका खाजगी डॉक्टराकडे व नाऊर येथील एका खाजगी डॉक्टराकडे तपासले असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित डॉक्टर व त्याच्या नातेवाईकांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सदर रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती कमी असून त्याला उच्च रक्तदाब आहे, तो कुठेही बाहेर गेला नसल्याचे समजते. त्यामुळे त्याला कोरोना झाला कसा? असा सवाल उपस्थित होत आहे.

हरेगाव, उंदिरगावात तीन दिवस लॉकडाऊन
शिरसगाव वार्ताहराने कळविले की, श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन येथे कोरोनाग्रस्त सापडल्याने एकच खळबळ उडाली असून त्यामुळे पुढील दक्षता घेण्यासाठी तातडीने पावले उचलून हरिगाव, व उंदिरगाव ग्रामपंचायत वतीने दि. 6 एप्रिलपासून 9 एप्रिलपर्यंत कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी व ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पूर्ण हरेगाव, उंदिरगाव पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्व रस्ते गावात येण्यासाठी व जाण्यासाठी गल्ली बोळा नाकाबंदी करून बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती सरपंच सुभाष बोधक उपसरपंच रमेश गायके व दीपक नवगिरे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या