देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या दोन कामगारांविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा

jalgaon-digital
3 Min Read

देवळाली प्रवरा (वार्ताहर)- करोनो संसर्गजन्य आजार आटोक्यात ठेवण्यासाठी देवळाली प्रवरा नगरपालिकेने नाकाबंदी केली असून लाख रस्त्यावरील नाकाबंदीच्या ठिकाणावरील झोपडपट्टीत राहणार्‍या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नगरपालिकेच्या दोन कामगारांविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कामगारांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पालिका कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, देवळाली प्रवरा नगरपालिकेने विविध ठिकाणी नाकाबंदी केली आहे. लाख रस्ता या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. नाकाबंदी ठिकाणी झोपडपट्टी आहे. येथील एक महिला शेतमजुरीसाठी जाते. ती कामावरून घरी येत असताना या नाक्यावरील नगरपालिका कामगार नंदू रत्नाकर शिरसाठ व दत्तात्रय मुक्ताजी मोरे या दोघांनी गेल्या काही दिवसापासून अश्लील भाषा वापरून छेड काढत होते.

शुक्रवार दि.15 रोजी सायंकाळी 5.30 वाजता ती महिला शेतमजुरी करून घरी आली असता घरासमोर हातपाय धूत असताना नंदू शिरसाठ हा फिर्यादी महिलेस तुझा पाय वाकडा पडत आहे. असे म्हणाला असता, तू असे का बोलतोस? अशी विचारणा केली असता नगरपालिकेच्या दोन्ही कामगारांनी फिर्यादी महिलेस मारहाण करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्यावरून त्या महिलेने या दोघां विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यातील दत्तात्रय मोरे कर्मचार्‍यास देवळाली प्रवरा विटभट्टी नाकाबंदीच्या ठिकाणी 2 ते 5 नाकाबंदीसाठी नेमणूक केलेली आहे. या ठिकाणावरील नाकाबंदी संपवून तो लाख रस्त्यावरील नाकाबंदीच्या ठिकाणी जाऊन बसत होता. अनेक दिवसांपासून छेड काढण्याचा प्रकार चालू होता.शुक्रवार दि.15 रोजी लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले. हा सर्व प्रकार फिर्यादी महिलेने घरी सांगितला. घरच्यांनी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. याप्रकरणी या दोघांवर गुन्हा र. नं. 353/20 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या दोन कामगारांनी दलित महिलेचा विनयभंग केला. त्या महिलेने फिर्याद देताना जातीवाचक शिविगाळ व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला होता. परंतु मी स्वतः हस्तक्षेप करून फिर्यादी महिलेस तुला जातीवर शिवीगाळ केलेली नाही. तर जातीवाचक शिवीगाळ करण्याचा खोटा गुन्हा दाखल कशासाठी करताय? यातून देवळाली प्रवरात जातीय तेढ निर्माण होईल. फिर्यादी महिलेने जातीवाचक शिवीगाळ करण्याचा गुन्हा दाखल न करता विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती आर.पी.आयचे उत्तर जिल्हाप्रमुख सुरेंद्र थोरात यांनी दिली. नगराध्यक्ष या दोन्ही कामगारांना पाठीशी घालीत आहे. असा आरोप थोरात यांनी केला.

नगरपालिकेचे कामगार दत्तात्रय मोरे, नंदू शिरसाठ या दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या दोघांना नोटीस बजावण्यात आली आहे. या दोन्ही कामगारांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
– अजित निकत, मुख्याधिकारी.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *