लॉकडाऊनच्या नथीतून नगराध्यक्षांवर हेव्यादाव्याचा तीर

jalgaon-digital
3 Min Read

देवळाली प्रवरात रंगला सत्ताधारी आणि विरोधकांचा कलगीतुरा

देवळाली प्रवरा (वार्ताहर)- देवळाली प्रवरामध्ये एकीकडे लॉकडाऊन सुरू असताना दुसरीकडे मात्र, शहराच्या एकंदर राजकीय सारीपाटावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारणाचा डाव रंगला आहे. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर हुकूमशहाचे आरोप करीत विरोधकांनी त्यांच्यावर लॉकडाऊनच्या नथीतून हेवेदाव्यांचा तीर मारला आहे. तर त्यांच्या डावपेचाला कंटाळून नगराध्यक्ष कदम यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा ‘ना’राजीनामा देऊन त्यांना काटशह देण्याचा प्रयत्न केला आहे. या शह-काटशहाच्या राजकारणामुळे लॉकडाऊनमध्येच शहराचे राजकारण ढवळून निघाले आहे.

दरम्यान, नगराध्यक्ष कदम यांनी तहसीलदारांकडे दिलेल्या नाराजीनाम्यात माझ्यासह विरोधकांनाही ‘क्वारंटाईन’ करण्याची अजब मागणी केल्याने देवळाली प्रवरा शहरातील राजकारणाचा रंगलेला डाव सध्या वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचला आहे. सध्या करोना व्यवस्थापना वरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला आहे. विरोधकांनी नगराध्यक्ष हे करोना व्यवस्थापनाच्या नावाखाली हुकूमशाही करीत असल्याचे सर्वपक्षीय निवेदन तहसीलदारांना दिले होते. हे प्रकरण थंड होत नाही तोच नगरपरिषदेच्या दोन कर्मचार्‍यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.

यानंतर लगेच म्हणजे सोमवार दि.18 मे रोजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्षपदाचा राजीनामा संबंधितांकडे पाठवून दिला. या सर्व घाडामोडी खूप वेगाने झाल्या. यामुळे सत्ताधारी व विरोधक यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू झाले असून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. सुमारे साडेतीन, चार वर्षापूर्वी देवळाली प्रवरा नगरपरिषदेमध्ये सत्तांतर झाले. काँग्रेस-राष्ट्रवादी ची सत्ता जाऊन भाजपाची सत्ता आली. थेट जनतेमधून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून जनतेने सत्यजित कदम यांना निवडून दिले.

या कालावधीत कदम यांनी जास्त निधी देवळाली प्रवरासाठी आणला व मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. परंतु सुरूवातीपासूनच नगराध्यक्ष व सर्वपक्षीय विरोधक यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून खटके उडत राहिले. करोना विषाणूचा परिसरात शिरकाव होऊ नये म्हणून सुरूवातीपासूनच नगराध्यक्ष कदम व त्यांचे सहकारी नगरसेवक यांनी दक्षता घेतली. हे होत असताना चौकी पाहार्‍यावर असणार्‍या कर्मचार्‍यांकडून नागरिकांना होणारा त्रास व परप्रांतियांना झालेली मारहाण या घटनेमुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले व आरोपांना सुरूवात झाली. त्यातूनच हुकूमशाहीबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

कदमांनी आपत्ती व्यवस्थापन समितीचा राजीनामा दिल्याला चोवीस तास होत नाही तोच सर्व चौक्या पाहारे पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरात गस्त घालून दुपारी बारानंतर अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकाने बंद करण्याचे सांगितले. ज्यांचे चालू होते, त्यांना चांगलीच तंबी दिली. तर सकाळी सोसायटी डेपोवर विनाकारण गर्दी करणार्‍यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला. त्यामुळे आता देवळाली पुन्हा लॉकडाऊनच्या प्रभावी अंमलबजावणीखाली असताना राजकीय घडामोडीही वेगवान झाल्या आहेत.

माझ्यासह विरोधकांना क्कारंटाईन करा !
नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पाठविलेल्या राजीनाम्यात म्हटले, मी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचा नगराध्यक्ष असलो तरी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. म्हणून आपणास विनंती करतो की, सर्व परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मला आपत्ती व्यवस्थापनाच्या जबाबदारीतून मुक्त करावे व माझ्या गावाला करोना संकटापासून वाचविण्यासाठी माझ्यासह सर्वच राजकीय व सामाजिक द्वेष पसरविणार्‍या निवेदन देणार्‍या सर्वच व्यक्तींना आपल्या स्तरावरून समज देऊन क्वारंटाईन करावे व बाहेर पडण्यास बंदी घालण्यात यावी, अथवा आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतूदीच्या आधारे त्यांना इतरत्र हलवावे, अशी विनंती करण्यात आली आहे. यामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *