Thursday, April 25, 2024
Homeनगरगडचिंचले येथील साधूंच्या हत्येचा श्रीक्षेत्र देवगड संस्थानकडून निषेध

गडचिंचले येथील साधूंच्या हत्येचा श्रीक्षेत्र देवगड संस्थानकडून निषेध

भास्करगिरी महाराजांनी पाठविले मुख्यमंत्र्यांना पत्र; कठोर कारवाईची मागणी

देवगडफाटा (वार्ताहर)- पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे दोघे साधू व त्यांच्या वाहन चालकाची जमावाने मारहाण करून केलेल्या हत्येच्या घटनेचा श्रीक्षेत्र देवगड देवस्थानचे महंत तसेच पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे विश्वस्त भास्करगिरी महाराज यांनी श्रीदत्त मंदिर संस्थान व श्रीक्षेत्र देवगड भक्तपरिवार व वारकरी सांप्रदायाच्यावतीने निषेध केला असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे.

- Advertisement -

पत्रात म्हटले की, सदर घटना काही बहाण्याचे निमित्त करून पूर्वनियोजित असावी असे वाटत आहे. पुरोगामी म्हणविल्या जाणार्‍या राज्यात प्रशासनासमोर घडलेली ही लाजिरवाणी व चिंतेची बाब आहे. या घटनेने नागा साधू संतप्त आहेत. संबंधितांवर तातडीने कारवाई न झाल्यास लॉकडाऊननंतर नागा साधू आक्रमक होऊ शकतात. तसे झाल्यास वाईट परिस्थिती उद्भवू शकते.

श्री पंचदशनाम जुन्या आखाड्याचे संत कल्पवृक्ष गिरी, हे त्यांचे गुजरातस्थित गुरू श्री महंत रामगिरीजी यांच्यावर अंत्यसंस्कार आटोपून त्यांचे अनुयायी सुशील गिरी व वाहनचालक निलेश तेलगडे यांच्यासह गुजरातकडून मुंबईकडे येत असताना पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या गडचिंचले गावाच्या हद्दीत सुमारे 100 ते 125 लोकांच्या बेकायदेशीर जमावाने या तिघांच्या वाहनावर जोरदार दगडफेक केली.

ही खबर एका स्थानिक वनसंरक्षक कर्मचार्‍याने संबंधित पोलीस स्टेशनला दिल्यामुळे पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतलेले असतानाही या जमावाने या तिघांना लाठी-काठी-दगड इ.मिळेल त्या साधनाने पोलिसांसमक्ष बेदम मारहाण केल्यामुळे या तिघांनाही प्राणास मुकावे लागले. या घटनेचा श्रीदत्त मंदिर संस्थान, श्रीक्षेत्र देवगड, श्रीक्षेत्र देवगड भक्तपरिवार तसेच समस्त वारकरी सांप्रदाय जाहीर निषेध करत आहे.

संपूर्ण देशभरामध्ये लॉकडाऊन सुरू असून एकट्या दुकट्यालाही घराबाहेर पडणे मुश्किल झालेले असताना या घटनेच्या वेळी एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित असूनही पोलीस प्रशासनाची फक्त बघ्याची भूमिका शंकास्पद वाटते. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हणविल्या जाणार्‍या आपल्या राज्यात अशी घटना घडते व प्रशासनासमोर घडते ही खरोखरीच अत्यंत लाजिरवाणी व चिंतेची बाब आहे.

संबंधित साधूंचे वय विचारात घेता केवळ काही बहाण्याचे निमित्त करून घडलेली ही घटना पूर्वनियोजित असावी असे वाटते. एवढी करुणामयी घटना घडूनही तथाकथित संस्कृतीरक्षक तसेच मानवतावादी कार्यकर्त्यांनी व तत्पर मीडियाने याची दखल न घेणेही निंदनिय आहे. कृपया आपण या प्रकरणामध्ये लक्ष घालून संबंधितांवर कठोर कारवाई करावी तसेच संबंधित पोलीस कर्मचार्‍यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना तातडीने कठोरात शिक्षा व्हावी.

नागा साधू आक्रमक होऊ शकतात
या घटनेमुळे श्री पंचदशनाम जुन्या आखाड्याचे सर्व नागा साधू अत्यंत संतप्त झालेले असून या घटनेची चौकशी होऊन संबंधितांवर तातडीने कारवाई न झाल्यास लॉकडाऊननंतर हे नागासाधू आक्रमक होऊ शकतात व तसे झाल्यास अत्यंत वाईट परिस्थीती उद्भवू शकते, तरी आपण याप्रकरणी तातडीने कारवाई करावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या