Monday, April 29, 2024
Homeनगरराहुरी तालुक्यातील देसवंडी केटीवेअर बंधार्‍याला हिरवा कंदिल

राहुरी तालुक्यातील देसवंडी केटीवेअर बंधार्‍याला हिरवा कंदिल

तनपुरे पितापुत्रांचे बंधार्‍याच्या प्रश्नावर यश; लाभक्षेत्रातील शेतकरी खूश

राहुरी (तालुका प्रतिनिधी)- तालुक्यातील मुळा नदीवर देसवंडी येथे के टी वेअर बंधार्‍याच्या कामाला आता थेट मंत्रालयातून हिरवा कंदिल दाखविण्यात आल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisement -

दरम्यान, हा बंधारा बांधण्यासाठी तत्कालीन आमदार प्रसाद तनपुरे यांनी मंजुरी आणली होती. त्याबाबत शासन स्तरावर जोरदार हालचाली सुरू होताच काही राजकीय मंडळींनी वाळू तस्करांच्या मदतीने त्यास तीव्र विरोध केल्याने बंधारा होण्याची शक्यता मावळली होती. मात्र, आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच माजी आमदार प्रसाद तनपुरे व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या भागातील शेतकर्‍यांच्या मागणीमुळे जलसंपदा मंत्री जयंत पाटील व जलसंपदा अधिकारी यांची बैठक पुणे येथे होऊन देसवंडी बंधार्‍याच्या कामास हिरवा कंदील जलसंपदा मंत्री यांनी दिला आहे.

राहुरी तालुक्यातील मुळा व प्रवरा नदीवर केटी वेअरची मालिका उभी केल्यानंतर माजी आमदार प्रसाद तनपुरे यांच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या मुळा नदीवर देसवंडी येथे केटी वेअर बांधण्यासाठी तनपुरे हे आमदार नसताना राज्यात सत्तेवर आघाडी सरकार असताना 1998 साली देसवंडी बंधारा बांधण्यास मंजुरी आणून त्यासाठी 5 लाख रुपये टोकन रक्कम देऊन बंधार्‍यासाठी पाया घेण्याच्यादृष्टीने त्याची चाचणी घेण्यात आली.

प्रत्यक्षात देसवंडी बंधार्‍याचे काम सुरू होण्यापूर्वीच राजकीय डाव साधत तत्कालीन आमदार व त्यांच्या वाळू तस्कर समर्थकांनी त्यास विरोध करून या बंधार्‍याचे काम हाणून पाडले होते, अशी चर्चा होत आहे. 10 वर्षांनंतर राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच व तालुक्याला राज्यमंत्री म्हणून प्राजक्त तनपुरे यांना मंत्रिपदाची संधी मिळताच देसवंडी बंधार्‍याच्या लाभक्षेत्रात येणार्‍या अनेक शेतकर्‍यांनी बंधारा झालाच पाहिजे, अशी मागणी माजी आ. प्रसाद तनपुरे व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली.

राज्याचे जलसंपदा मंत्रिपद जयंत पाटील यांच्याकडे असल्याने बंधार्‍याच्या कामाला निश्चित चालना मिळू शकते. म्हणून माजी आ. तनपुरे यांनी शुक्रवारी जलसंपदामंत्री जयंत पाटील व जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन चर्चा केल्यानंतर मंत्री जयंत पाटील यांनी हिरवा कंदील दाखविला.

तनपुरे यांनी देसवंडी येथे मुळा नदीवर बंधारा बांधण्याचा प्रस्ताव शासनास आमदार असताना सादर केला होता. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने या बंधार्‍याचे काम रखडले होते. आमदारकी जरी गेली तरी राज्यात आघाडी सरकार सत्तेवर असल्याने तनपुरे यांनी देसवंडी बंधारा होण्यासाठी शासन दरबारी आपले वजन वापरून देसवंडी बंधारा बांधण्याच्यादृष्टीने आग्रह धरून हा बंधारा कोठे चांगल्या पद्धतीने होऊ शकतो? याचा सर्व्हे करण्यासाठी विशेष समिती नेमण्यात आली होती.

या समितीने मुळा नदीची पाहणी करून देसवंडी येथील देवनदी व मुळानदीच्या संगमा नजिकची जागा निश्चित केली शासनाने बंधार्‍यासाठी कोठे पाया घेण्यास व्यवस्थित जागा आहे? त्यासाठी कमीत कमी खर्चात चांगल्याप्रकारे पाणी साठेल अशा पद्धतीने जागेची निवड केल्यावर पायाची चाचणी घेण्यासाठी शासनाने 5 लाख रुपयांची तरतूद करून चाचणी पूर्ण होऊन हे काम मार्गी लागणार, असे दिसताच केवळ हा बंधारा तनपुरे यांच्या फायद्यासाठीच आहे, त्याचे भांडवल करून मुंबई येथे तत्कालीन कृषीमंत्री यांची भेट घेऊन या बंधार्‍याच्या कामास खोडा घातला.

देसवंडी येथे बंधारा झाल्यास त्याचा फायदा देसवंडी, तमनर आखाडा, राहुरी बुद्रुक, राहुरी खुर्द, पिंपरी अवघड, तांदूळवाडीसह अनेक भागाला होऊन शेतीस फायदा होणार आहे. तसेच देवनदी व मुळा नदीच्या संगमावर देसवंडी येथे असलेल्या चिदंबर महास्वामी मंदिरामुळे येथे सुंदर पर्यटन स्थळ होऊं शकते, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीत सत्तातंर होऊन राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे आमदार होताच देसवंडी बंधार्‍याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या. सत्तेवर राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेचे सरकार आल्याने देसवंडी बंधारा होणारच या आशेवर बसलेले शेतकरी गेल्या तीन-चार महिन्यांपासून पाठपुरावा करीत होते. अखेर या बंधार्‍याच्या प्रश्नावर तनपुरे पितापुत्रांनी जलसंपदा विभागाचे मंत्री अधिकारी यांची शुक्रवारी बैठक घेऊन त्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चालना दिल्याची माहिती तनपुरे यांनी पत्रकारांना सांगितली.

- Advertisment -

ताज्या बातम्या