वाळवंटी टोळ धाडीवर नियंत्रणाची गरज

jalgaon-digital
4 Min Read

जिल्ह्यातील शेतकरी भयभीत; राहुरी कृषी विद्यापीठाने सुचविल्या उपाययोजना

राहुरी (तालुका प्रतिनिधी)- सध्या देशात टोळधाडीने धुडगूस घातला आहे. राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाणा, पंजाब, दिल्ली, मध्यप्रदेश याबरोबरच आता महाराष्ट्रात शिरकाव केला असून पिके फस्त करण्यास सुरूवात केली आहे. या टोळधाडीवर नियंत्रणाची गरज असल्याचे मत शेतकर्‍यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने वाळवंटी टोळ व त्याच्या नियंत्रणासंबंधी उपाययोजना सुचविल्या आहेत.

जिल्ह्यात टोळधाडीच्या प्रादुर्भावाबाबत शेतकर्‍यांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि या किडीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय योजने आवश्यक आहे. आधीच लॉकडाऊनमुळे शेतीस मोठा फटका बसला आहे. त्यात आता टोळधाडीचे नवीन संकट शेतकर्‍यांपुढे आले आहे. वाळवंटी टोळ ही जागतिक व आंतरराष्ट्रीय दृष्ट्या महत्व प्राप्त असलेली महत्वाची कीड असून ही कीड तांबूस रंगाची असून अत्यंत खादाड व नुकसान करणारी आहे. तसेच ती मोठ्या प्रमाणात पिकांचे व इतर वनस्पती तसेच झाडाझुडपांचे नुकसान करू शकते. ही कीड साधारणपणे दोन प्रकारच्या अवस्थेत आढळून येते.

पहिली अवस्था म्हणजे एकाकी अवस्था जिच्यामध्ये ही कीड एकटी किंवा विरळ असते. अनुकूल हवामानात ही कीड समूहाने किंवा थव्यात आढळते आणि या अवस्थेला समूह अवस्था किंवा थव्याची अवस्था असे म्हणतात. थव्याच्या अवस्थेत ही कीड मोठे अंतर भ्रमण करू शकते व मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करू शकते.
वाळवंटी टोळ या किडीची पिल्ले एकत्र येऊन मोठ्या थव्याने मार्गात येणार्‍या वनस्पतींचा पूर्णपणे फडशा पाडत पुढे सरकतात. सायंकाळचे वेळी ही कीड झाडाझुडपांमध्ये वास्तव्यास राहते.

पूर्ण वाढ झालेले प्रौढ टोळ हे अतिशय चपळ व खादाड असतात. हे प्रौढ झाडाची हिरवी पाने, फुले, फांद्या व इतर भाग पूर्णपणे खाऊन टाकतात व पिकांचे अतोनात नुकसान करतात. एका दिवसात टोळ त्यांच्या वजनाएवढे अन्न खात असते. एक चौरस किमी क्षेत्रात जर टोळधाड असेल तर त्यामध्ये जवळजवळ 3 हजार क्विंटल टोळ असतात. बाल्यावस्थेतील पिल्ले त्यांच्या वजनापेक्षा 6 ते 8 पटीने जास्त अन्न खातात. तांबूस टोळ पूर्णावस्थेत पोहोचल्यावर पिवळ्या रंगाचे हेातात. असे पिवळे टोळ अंडी घालण्यास अनुकूल अशा ओलसर रेताड जमिनीच्या शोधात फिरतात. टोळाचे थवे ताशी 12 ते 16 किमी वेगाने उडतात.

साधारणपणे 10 हजार प्रौढ टोळ प्रती हेक्टर किंवा 5 ते 6 पिल्ले प्रती झुडुप याप्रमाणे किडीची आर्थिक नुकसान पातळी दिसून येताच शेतकरी बांधवांनी गरजेनुसार या किडीच्या व्यवस्थापनासाठी खालील उपाय योजनांचा अवलंब करावा. अंडी घातलेल्या जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास पिल्लांना अटकाव करून नियंत्रण करता येते. अंडी सामूहिकरीत्या नष्ट करावीत. या किडीची सवय थव्याने एका दिशेने दौडत जाण्याची असल्यामुळे पुढे येणार्‍या थव्याच्या वाटेवर 60 सेमी रुंद व 75 सेमी खालीचे चर खोदल्यास त्यात या किडीच्या पिल्लांना पकडता येते.

शेतात प्लास्टीकच्या बाटल्या, टिनाचे डबे, वाद्य वा इतर साहित्याचा वापर करून मोठा आवाज काढल्यास या कीडीस तुमच्या शेतात बसण्यापासून परावृत्त करता येईल.
संध्याकाळी वा रात्रीचे वेळी ही कीड झाडाझुडपावर जमा होत असल्यामुळे अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवुन धूर केल्यास या कीडीचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो.

प्रतिबंधात्मक आणि पर्यावरणास अनकूल असा उपाय म्हणजे या किडीच्या थव्याच्या स्थितीत पिल्लांची संख्या जास्त असल्यास 5 टक्के निंबोळी अर्क किंवा अ‍ॅझाडीरेक्टीन (1500 पीपीएम) 45 मिली प्रती 15 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. विषारी आमिषाचा वापर – गहू किंवा भाताचे तूस यामध्ये फिप्रोनिल 5 एस.सी. 3 मिली मिसळावे व त्यामध्ये किडीस आकर्षित करण्यासाठी मळी मिसळून रात्री किडीने आश्रय घेतलेल्या झाडाच्या आजूबाजूस किंवा प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये प्रतिहेक्टरी 20-30 किलो याप्रमाणे फेकून द्यावे, जेणेकरून आमिष खाल्यावर किडीचा नाश होईल.

आर्थिक नुकसान पातळी लक्षात घेऊन गरजेनुसार रासायनिक कीडनाशकाचा वापर करावा. केंद्रीय किटकनाशक मंडळ व नोंदणी समितीने शिफारस केलेप्रमाणे क्लोरपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 24 मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5 ई.सी. 10 मिली किंवा मॅलॅथिऑन 50 ई.सी. 37 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. रासायनिक किटकनाशकांची फवारणी करताना औषधाच्या पाकीटावरील सूचनांचे कटाक्षाने पालन करावे, अनेक रसायनांचे एकत्र मिश्रण करणे शक्यतो टाळावे व फवारणी करताना सुरक्षा साधनांचा वापर करावा. असे आवाहन राहुरी विद्यापीठाने केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *