देवळा : वाजगावच्या शोभा देवरेंनी पपई पिकातून साधली उन्नती

jalgaon-digital
2 Min Read

वडाळीभोई । राजेंद्र व्यवहारे
देवळा तालुक्यातील वाजगाव येथील शोभा देवरे यांनी पपई फळ पिकाच्या लागवडीतून आर्थिक उन्नती साधली आहे. तालुक्यात पारंपरिक कांदा पीक घेतले जाते. परंतु शोभा देवरे यांनी रामेश्वर येथील भाऊ जगन्नाथ पगार, हरी पगार, दगडू पगार यांच्याकडून प्रेरणा घेत पपई लावण्याचा निर्णय घेतला.

दिंडोरी येथील नर्सरीतून तैवान 786 जातीची 1240 पपई रोपे आणून एक एकर जागेत पपईची लागवड केली. पपई विक्रीतून त्यांना अंदाजे पाच ते साडेपाच लाख रुपयाचे उत्पन्न झाले. अतिपावसामुळे फळांचे व झाडाचे नुकसान झाले. फळगळ, पानगळ यामुळे उत्पन्नावर परिणाम झाला नसता तर त्यांना 10 ते 12 लाख उत्पन्न अपेक्षित होते. पपई लागवडीसाठी त्यांनी बाराशे चाळीस रोपे सोळा रुपये प्रमाणे 20000 रुपये, ठिबक सिंचनाचा खर्च अंदाजे 40 ते 45 हजार, अंतर मशागत 25000, शेणखत रासायनिक खत 30000, मजुरी 30000 अशाप्रकारे 1 लाख 30000 पर्यंत खर्च आला. यासाठी त्यांना मुलगा गौरव, मुलगी प्रांजली व पती प्राथमिक शिक्षक सुनील देवरे यांनी मदत केली. लहानपणापासूनच त्यांना शेतीची आवड असल्याने त्या नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात.

पपईच्या एका झाडाला अंदाजे 50 ते 80 फळे येतात. एक फळ एक ते तीन किलो वजनाचे असते. पपईला सध्या 20 ते 25 रुपये किलो बाजारभाव आहे. पपई फळ घेण्यासाठी जम्मू-काश्मीर, दिल्ली, राजस्थान येथून व्यापारी थेट बांधावर येतात. देवळा तालुक्यात देवळा, रामेश्वर, विठेवाडी, लोहणेर, वाजगाव याठिकाणी पपई पिकाची लागवड केली आहे. जिल्ह्यात मालेगाव, सटाणा, दिंडोरी या तालुक्यात पपई फळबागा आहेत.

कृषिकन्या असल्यामुळे मी पती प्राथमिक शिक्षक असतानाही त्यांची वडिलोपार्जित शेतीत नवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली. भावांचा पपई फळबागेचा अनुभव होता. त्यामुळे मी या नवीन प्रयोगात यशस्वी झाले.
-शोभा देवरे, वाजगाव

देवळा येथील पारंपरिक कांदा पिकापेक्षा काही शेतकर्‍यांनी पपई, टरबूज या नवीन फळपिकांची लागवड करून वेगवेगळे प्रयोग करत आहे. त्यातून त्यांची उन्नती झाली आहे. इतर शेतकर्‍यांनी यांच्यापासून प्रेरणा घ्यावी.
-सचिन देवरे, तालुका कृषी अधिकारी, देवळा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *