Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

नागरिकांचे आरोग्य धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष; पाथर्डी परिसरात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ

Share

नवीन नाशिक । वार्ताहर

पाथर्डी परिसरात असलेल्या प्रशांत नगर, वासन नगर, स्वामी समर्थ नगर, दामोदर नगर व इतर भागात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून मनपा प्रशासनकडून त्याची गांभीर्याने दखल घेण्यात न आल्याने रहिवासीयांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मनपाच्या अनेक भूखंडावर वाढलेल्या गवतामुळे तसेच परिसरात असणार्‍या विविध कारणांमुळे अस्वच्छतेत भर पडली आहे. भूखंडावरील गवत न काढले गेल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच फवारणी व मनपाकडून करण्यात येणार्‍या विविध योजना यांची कमतरता दिसून येत असल्याने डेंग्यूच्या डासांची संख्या वाढल्याचे रहिवाशांनी सांगितले आहे.

मनपा सेवकांना स्वच्छता करत असताना पुरवण्यात येणार्‍या साधनांची कमतरता दिसून आल्याने त्यांनाही आजाराची भीती वाटत आहे. सेवकांंची असलेली कमतरता व साधनांची उपलब्धता यामुळे मनपा प्रशासनाकडून आरोग्य विभागाकडून पाहिजे तशी दखल घेण्यात येत नसल्याने परिसरातील नागरिकांच्या रहिवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याची प्रतिक्रिया देण्यात येत आहे.

अनेक रुग्णालयात, क्लिनिकमध्ये रुग्णांची संख्या वाढत असून त्यामध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. मनपा प्रशासनाकडून, ठेकेदाराकडून धुराची मशीनद्वारे फवारण्यात येणारे धूर, इतर साहित्याची कमतरता आहे. डासांचा प्रादुर्भाव कमी व्हावा, तिच्यावर नियंत्रण मिळावे, यासाठीची उपायोजना करण्यात येत नसल्याने नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. नगरसेवकांकडूनही नागरिकांच्या समस्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत रहिवाशांनी व्यक्त केले आहे.

माहिती अधिकार अभियान केंद्रातर्फे ही मनपाला निवेदन देण्यात आले असून विभागात प्रभागात, नागरी वस्तीत जवळच्या ठिकाणी, लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणी, उद्यानामध्ये ठिकाणी डासांच्या उत्पत्तीमुळे डेंग्यू या जीवघेण्या आजाराचे प्रमाण वाढले असून तापाने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आजारी पडल्याचे पत्र अनिल गायकवाड यांनी मनपाला दिले आहे. प्रभागातील सफाई सेवकांंना मिळणार्‍या सुविधांची, सेवकांंची कमतरता लक्षात आणून दिली असून ठोस पावले उचलून प्रतिबंधक उपाय योजना करण्याचे सांगण्यात आले आहे. सुविधांअभावी सफाई सेवकांंचेही आरोग्य धोक्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे. विविध प्रसारमाध्यमांद्वारे जनजागृती करून डेंग्यूविषयीची माहिती नागरिकांनापर्यंत पोहोचून खबरदारी घेण्याची सूचनाही पत्रातून करण्यात आली आहे.

रिसरात विविध भूखंडावरील वाढलेल्या गवतांमधून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी आरोग्य विभागाकडून धूर फवारणी, पाण्यांच्या तपासण्या वाढलेले गवत काढण्याचे काम मनपा प्रशासनाकडून करण्यात यावे. परिसरात वाढलेल्या रोगांना आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करावी.
– वैभव फेंडर (अध्यक्ष, जयस्तुते फाऊंडेशन)

परिसरातील विविध कॉलनीत गवताचे साम्राज्य वाढले असून त्यातून डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. तर विविध कारणांनी ही उपाययोजना न करण्यात आल्याने डासांच्या नियंत्रणाला आळा घालण्यात मनपाला अपयश आले आहे. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. रहिवाशांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू असून आरोग्य विभागाकडून परिसरात मोहिमा राबविण्यात याव्यात.
– विक्रांत चेवले (रहिवासी)

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!